निवडणुक कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार १५ लाखांचे सानुग्रह अनुदान!

02 Jul 2024 18:38:57
bmc news


मुंबई
: निवडणुक कर्तव्यावर असताना पालिका कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आता १५ लाख सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यापूर्वी ही रक्कम १० लाख रुपये एवढी होती. दरम्यान आता सानुग्रह अनुदानात ५ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये निवडणूक कर्तव्यावर असताना जखमी अथवा मृत झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात आला. यात मृत पावणाऱ्या कमर्चारी आणि अधिकाऱ्यांच्या वारसांना १० लाख रुपये आणि दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटमध्ये मृत पावल्यास २० लाख रुपये तसेच कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास ५ लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान आता महापालिकेच्या मंजुरी घेतलेल्या ठरावामध्ये सुधारणा करण्यात आली असून निवडणुक कर्तव्यावर असताना कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपये आणि कायमस्वरुपी जखमी झाल्यास साडेसात लाख रुपये ऐवढी सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्यात येणार असल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Powered By Sangraha 9.0