राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा होणार SNDT महिला विद्यापीठाचा १०९ वा वर्धापन दिन!

02 Jul 2024 11:32:21
 
SNDT
 
मुंबई : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) महिला विद्यापीठाचा १०९ वा वर्धापन दिन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. शुक्रवार, ५ जुलै रोजी विद्यापीठाच्या चर्चगेट प्रांगणातील सर सीताराम आणि लेडी शांताबाई पाटकर सभागृहात सकाळी ११.०० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 
या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील तर प्रमुख अतिथी म्हणून महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षण-संवर्धक पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे उपस्थित राहतील. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू, प्रा. उज्वला चक्रदेव, प्रा. रुबी ओझा (प्र-कुलगुरू), प्रा. विलास नांदवडेकर (कुलसचिव) आणि विद्यापीठातील इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
 
प्रथेनुसार यावर्षीही या कार्यक्रमात विद्यापीठातील अध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस ‘महर्षी कर्वे उत्कृष्ट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ देण्यात येईल. याच समरोहात जीवनातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या पाच माजी विद्यार्थिनींना सन्मानित केले जाईल.
 
स्त्री शिक्षणातील विद्यापीठाचे १०८ वर्षांचे महत्वपूर्ण योगदान हे देशातील स्त्रियांसाठी व संपूर्ण भारतीय समाजासाठी अभिमानाची बाब आहे. १९१६ सालापासून या विद्यापीठाने लाखो स्त्रीयांना शिक्षित केल्यामुळे प्रगतीशील समाजाची निर्मिती झाली आहे. सध्या ७०,००० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या ३९ विभाग, १३ संस्था आणि ३०६ संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेल्या आणि ‘संस्कृता स्त्री पराशक्ती’ हे बोधवाक्य असलेल्या या विद्यापीठाचे शिक्षणातून महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0