पंकजा मुंडेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज!

02 Jul 2024 18:33:30
 
Pankaja Munde
 
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. तसेच यावेळी सदाभाऊ खोत, परिणय फुके आणि अमित गोरखे यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "हे सगळं माझ्या कार्यकर्त्यांच्या निष्पाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. त्यांनी सगळ्या संघर्षात कधीच माझी साथ सोडली नाही. माझ्या पराभवानंतर काही लोकांनी जीव दिला. ते माझ्या फार जिव्हारी लागलं. पण ते आज असते तर या जल्लोषात सहभागी झाले असते. कार्यकर्त्यांचं प्रेमाला ही आजची संधी मी समर्पित करते," असे त्या म्हणाल्या.
 
हे वाचलंत का? -  प्रभावती बावनकुळे अनंतात विलीन!
 
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान, भाजपने सोमवारी पंकजा मुंडे, योगेश तिलेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत या पाच जणांना उमेदवारी जाहीर केली. या निवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून या सर्वांनी आपला अर्ज दाखल केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0