लाडकी बहीण योजना काय आहे? कसा भरणार अर्ज? जाणून घ्या सविस्तर...

02 Jul 2024 18:51:58
 
Shinde
 
उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजनांचा जणू पाऊसच पडलाय. मुख्य म्हणजे यात महिलांच्या सन्मानासाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आलीये. मात्र, यातलीच एक महत्वाची आणि सर्वाधिक चर्चेत असलेली योजना म्हणजे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.' खरंतर अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर लगेचच या योजनेचे निकषही जारी करण्यात आलेत. तर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' नेमकी काय आहे? तिचे निकष कोणते? आणि या योजनेचा उद्देश, स्वरूप आणि लाभार्थी कोण आहेत? या सगळ्याबद्दलची विस्तृत माहिती जाणून घेऊया.
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्य सरकारने महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य, स्वावलंबन आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. खरंतर पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आधीपासून या योजनेची जोरदार चर्चा होती. मध्य प्रदेश सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'लाडली बहन' या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. तर या योजनेचा नेमका उद्देश काय आहे हे आपण जाणून घेऊया. राज्यातील महिला आणि मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणं, त्यांचं आर्थिक, सामाजिक पुर्नवसन करणं, राज्यातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणं, महिला आणि मुलींच्या सशक्तीकरणाला चालना देणं तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणं ही सगळी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्यात येतीये.
 
आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेचं स्वरुप नेमकं काय आहे, ते बघूया. या योजनेअंतर्गत पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार. राज्यातील २१ ते ६० वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असतील. आता लाभार्थी महिलांची पात्रता काय हवी? तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी. तिचं वय किमान २१ ते ६० वर्षे असावं. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचं बँक खातं असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावं. या सगळ्या निकषांमध्ये बसणारी महिला ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असेल.
 
आता कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही? तर ज्या महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम किंवा कंत्राटी स्वरुपात सरकारी विभागात कामाला आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे, अशा महिला या योजनेसाठी अपात्र असतील. याशिवाय जर एखाद्या महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलाय, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे आणि ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, अशा कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
 
या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आता महत्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? तर सर्वात आधी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासोबत लाभार्थी महिलेचं आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्म दाखला, कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, रेशनकार्ड आणि सदर योजनेच्या अटीशर्तींचे पालन करण्याबाबत हमीपत्र ही सगळी कागदपत्रे या अर्ज भरताना आवश्यक आहेत. विशेष म्हणजे, समजा जर एखाद्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर अंगणवाडी केंद्र किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये जसं ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्रे याठिकाणी जाऊन त्यांना अर्ज भरता येईल.
 
यासारख्या योजना राबवून महिलांच्या प्रगतीकरिता राज्य सरकारने निश्चितच मोठं पाऊल उचललंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे महिलांचं स्वावलंबन आणि सर्वांगिण विकासासाठी निश्चितच बळ मिळेल, अशी आशा आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0