महाराष्ट्रातील एकमेव प्रदेशनिष्ठ वृक्षाची उरली केवळ १०० झाडे; 'नष्टप्राय' श्रेणीत नोंद

02 Jul 2024 10:32:48


Croton gibsonianus

 


मुंबई (अक्षय मांडवकर) - जगात केवळ हरिश्चंद्रगडावर आढळणाऱ्या 'क्रोटन गिब्सोनियानस' (Croton gibsonianus) या वृक्ष प्रजातीला 'इंटरनॅशनल युनियन फाॅर काॅन्झर्वेशन आॅफ नेचर'ने (आययूसीएन) आपल्या लाल यादीत 'नष्टप्राय' श्रेणीत स्थान दिले आहे (Croton gibsonianus). या वृक्षाची केवळ १०० झाडे उरली असून त्यांचा आढळ नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गडावर आहे (Croton gibsonianus). त्यामुळे या वृक्ष प्रजातीच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. (Croton gibsonianus)



महाराष्ट्र हे राज्य वृक्ष जैवविविधतेने समृद्ध आहे. असे असले, तरी यामधील बऱ्याच प्रजाती या प्रदेशनिष्ठ आणि दुर्मीळ आहेत. महाराष्ट्रातील एकमेव प्रदेशनिष्ठ वृक्ष प्रजाती म्हणजे 'क्रोटन गिब्सोनियानस'. याला 'सह्याद्री क्रोटन' नावाने देखील ओळखले जाते. ही प्रजात महाराष्ट्र आणि त्यातही हरिश्चंद्रगड सोडल्यास जगात कुठेही आढळत नाही. 'आययूसीएन'च्या 'वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप'ने या प्रजातीला आता 'नष्टप्राय' श्रेणीत स्थान दिले आहे. कारण, या प्रजातीची प्रदेशनिष्ठता आणि अंत्यत अल्प प्रमाणात उरलेली तिच्या झाडांची संख्या.



बाॅम्बे प्रेसिडेन्सीचे पहिले वनसंरक्षक अलेक्झांडर गिब्सन यांनी १८३९ साली या झाडाचे नमुने सर्वप्रथम गोळा केले होते. ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञ जोसेफ निम्मो यांनी या नमुन्यांचा अभ्यास करुन त्याचे नामकरण गिब्सन यांच्या नावावरुन 'क्रोटन गिब्सोनियानस', असे केले. तसेच भीमाशंकर येथून शोधलेल्या नव्या प्रजातीचे नामकरण 'क्रोटन लाॅयनस', असे केले. त्यानंतर १८८७ ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञ जे.डी.हुकर यांनी अनावधाने कर्नाटकात आढळणाऱ्या एका वेगळ्या प्रजातीला 'क्रोटन गिब्सोनियानस' म्हणून ओळखले. पुढच्या काळात कर्नाटकात आढळणारी प्रजात ही 'क्रोटन गिब्सोनियस' आणि हरिश्चंद्रगड व भीमाशंकर येथे आढळणारी प्रजात ही 'क्रोटन लाॅयनस' म्हणून प्रचलित झाली.



२०२१ साली वनस्पतीशास्त्रज्ञ मयुर नंदीकर यांनी या दोन्ही प्रजातींवर सखोल अभ्यास केला. त्यामधून त्यांच्या असे लक्षात आले की, कर्नाटक आणि केरळमध्ये आढळणारी 'क्रोटन गिब्सोनियानस' ही पूर्णपणे वेगळी प्रजात असून हरिश्चंद्रागडावर आढळणारी प्रजात ही मूळ 'क्रोटन गिब्सोनियनस'ची प्रजात आहे. त्यामुळे त्यांनी १८० वर्षानंतर हरिश्चंद्रगडावरुन 'क्रोटन गिब्सोनियानस' या प्रजातीचा पुनर्शोध लावला आणि कर्नाटक आणि केरळमध्ये आढळणाऱ्या प्रजातीचे नामकरण 'क्रोटन चक्रवर्ती', असे केले.




अधिवास संवर्धनाची गरज 
'क्रोटन गिब्सोनियानस' या वृक्षाची नर आणि मादी फुले ही वेगवेगळ्या फांदीवर येतात. या वृक्षांचे परागीभवन नेमक्या कोणत्या कीटक जातीकडून होते, याची देखील नोंद आमच्याकडे नाही. त्यामुळे या वृक्षावर अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच हे वृक्ष हरिश्चंद्रगडावर उंच ठिकाणी आढळते. या अधिवासाला आता वाढते पर्यटन, वणवा यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वृक्षाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. - मयुर नंदीकर, सदस्य, आययूसीएन-वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप

 



वृक्षाची वैशिष्ट्ये

- हरिश्चंद्रगडावर निम-सदाहरित जंगलामध्ये हे वृक्ष आढळते.

 


- गडावरील मोठ्या ओढ्यांमध्ये हे वृक्ष सापडते.

- समुद्रीसपाटीपासून साधारण एक हजार ते बाराशे मीटरवर वाढते.
- वृक्षाची वाढ साधारणपणे २ ते ३ मीटरपर्यंत होते.

 


- दिवाळीनंतर झाडावरची पाने गळण्यास सुरुवात होते.


- मार्च महिन्यात या झाडाला फुलं येऊन, मे ते जून महिन्यात त्याला फळं धरतात.


- मोठ्या पावसात फळं गळून पडतात.


Powered By Sangraha 9.0