ब्रेकिंग! अंबादास दानवे निलंबित

02 Jul 2024 14:14:13
 
Danve
 
मुंबई : विधानपरिषद सभागृहात शिवीगाळ केल्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातून ५ दिवसांसाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्हे यांनी हा ठराव वाचून दाखवला.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी!
 
"दि. १ जुलै रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात चर्चा करत असताना प्रसाद लाड यांच्याप्रती आक्षेपार्ह, अशोभनीय आणि अश्लाघ्य अपशब्द वापरून विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली. तसेच त्यांनी सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे. त्यांच्या या बेशिस्त आणि असभ्य वर्तणाकडे दुर्लक्ष केल्यास सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल. त्यामुळे त्यांच्या वर्तणाची गंभीर दखल घेऊन अंबादास दानवे यांचे सदस्यत्व ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात यावे. तसेच या कालवधीत त्यांना सभागृह परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली," असे या ठरावात म्हटले आहे.
 
अंबादास दानवेंच्या निलंबनामुळे सभागृहात एकच गदारोळ माजला. दरम्यान, विरोधकांकडून या ठरावावर चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा प्रकारची चर्चा होत नाही. त्यामुळे चुकीचा पायंडा नको, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.  
 
 
 
Powered By Sangraha 9.0