एकविसाव्या शतकातील एका पालक होऊ घातलेल्या दाम्पत्याची कथा दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातून मांडली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे लेखक निपुण धर्माधिकारी यांनीच या चित्रपटात प्रमुख भूमिकादेखील साकारली आहे.
‘एक दोन तीन चार’ चित्रपटाची संपूर्ण कथा पुण्यात घडते. विशेष म्हणजे, निपुण धर्माधिकारी स्वत: पुण्याचा असूनही, त्याने या चित्रपटात कराडमधील मुलाचे पात्र साकारले आहे, तर सम्या (निपुण धर्माधिकारी) आणि सायली (वैदेही परशुरामी) यांचं कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांवर प्रेम जडतं आणि प्रेमाचं रूपांतर अखेर लग्नगाठ बांधेपर्यंत जातं. सर्वसामान्य जोडीसारखं त्यांचंही जीवन सुरळीत सुरू असतं आणि अखेर नवरा-बायकोच्या जीवनात अपेक्षित आनंदाची बातमी अर्थात दोघेही आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी येते. पण, खरा गोंधळ तर इथूनच सुरू होतो. कारण, सायली आणि सम्याला एक-दोन नाही, तर चक्क एकाचवेळी चार मुलं होणार, असे तपासणीतून समजते. मग पुढे त्यांच्या जीवनात कशी ‘रोलर कोस्टर राईड’ निर्माण होते, यासाठी चित्रपट नक्की पाहावा लागेल.
दिग्दर्शक आणि लेखकाने अशा चार बाळांचे आई-वडील होऊ घातलेल्या त्या दाम्पत्याचं मानसिक-भावनिक विश्व कसं बदलतं, यावर विशेषत्वाने भर दिला आहे. कारण, आपण पालक होणार, याचा आनंद व्यक्त करायचा की आपल्याला एकाचवेळी चार मुलं होणार, ती किती सृदृढ असतील, याची चिंता करायची, अशा अनेक द्वंद्वांमधून, विवंचनांमधून सम्या-सायली यांची ही कथा पुढे सरकते. दिग्दर्शकाचं विशेष कौतुक करावं लागेल ते यासाठी की, त्यांनी पालक ते दोघेच होणार असल्याकारणामुळे कुठेही उगाच कुटुंबातील अन्य व्यक्तींचा हस्तक्षेप दाखवलेला नाही. मध्यंतरापूर्वी काही काळासाठी चित्रपटाची कथा जरा भरकटलेली वाटते; पण मध्यंतरानंतर प्रत्येक घटना जोडणारा संदर्भ बर्याच दृश्यांतून उलगडत जातो. याशिवाय, मूल होण्यापूर्वी बाळांसारख्या दिसणार्या बाहुल्यांसोबत सम्या आणि सायलीचं भावनिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न विशेष उल्लेखनीय वाटतो.
समाजात एक असा समज आहे की, अलीकडची नवी पिढी लग्न करायचा निर्णयही फार विचाराअंती घेते. मग, मुलं होण्याचा निर्णय तर त्याहूनही कठीण. अर्थात, त्याला अनेक कारणं आहेत. दाम्पत्य आपल्या करिअरमध्येच इतकी गुरफटून जातात की, एका नव्या जीवाला जन्म देणं फार अवघड होतं, असं बर्याचदा आजची पिढी म्हणते. पण, त्यांच्या आणि समाजाच्या विचारांना छेद देणारी या चित्रपटाची कथा. जिथे अगदी कमी वयात हे दोघे लग्न करतात आणि त्यातही आई-बाबा होण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतात. त्यामुळे आजच्या पिढीला एक वेगळा दृष्टिकोन प्रदान करणारा हा चित्रपट म्हणावा लागेल.
चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे झाल्यास, तरुण दाम्पत्याचं योग्य प्रतिनिधित्व निपुण धर्माधिकारी आणि वैदेही परशुरामी करतात. याशिवाय मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी यांची अगदी छोटेखानी भूमिका असली तरी त्यांनी चोख बजावली आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत तरुणाईच्या मनाला भिडणारं. उडत्या चालीचं संगीत कथेला, प्रसंगांना साजेसं आहे, याचंदेखील विशेष कौतुक.
चित्रपट :एक दोन तीन चार
दिग्दर्शक : वरुण नार्वेकर
कलाकार : निपुण धर्माधिकारी, वैदेही परशुरामी, करण सोनावणे, ऋषिकेश जोशी
रेटींग : ***