विधानपरिषद निवडणूकीच्या एक दिवस आधी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना थेट आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिल्याची माहिती पुढे आली होती. काँग्रेसच्या अतिरिक्त १२ मतांपैकी आपल्याला हवी ती मतं मिळाली नाही आणि निकाल विरोधात गेला तर ठाकरेंनी थेट महाविकास आघाडी सोडण्याची धमकीच देऊन टाकली. त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीसाठीही उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जागा महाविकास आघाडीकडून मागून घेतल्याचं सांगण्यात येतंय. यात ते २५ जागा मागणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जागांवर दावा सुरू केला, यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस सुरू होण्याची चिन्हं पुन्हा एकदा दिसताहेत. तर आता विधानसभेसाठी ठाकरेंची नवी मागणी काय आहे? आणि त्यांनी कुठल्या जोरावर मुंबईतील २५ जागा मागितल्या? याबद्दल जाणून घेऊया.
मुंबईत एकूण ३६ आमदार आहेत. यात भाजपचे सर्वाधिक १६ आमदार आहेत. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने १४ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर त्यातले ६ आमदार शिंदेंकडे तर ८ आमदार ठाकरेंसोबत गेले. याशिवाय काँग्रेसने मुंबईत केवळ ४ जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार अजित पवारांकडे आहे. दरम्यान, आता महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरु केली असून उबाठा गट मुंबईतील २५ जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आलीये. उबाठा गट मुंबईतील सर्वाधिक जागांवर दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. पण काँग्रेस आणि शरद पवार गट हे मान्य करणार की, लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जागावाटपावरून मविआत वाद होईल? हा मोठा प्रश्न आहे.
आता उद्धव ठाकरेंनी कुठल्या जोरावर या जागा मागितल्या? याची प्रमुख कारणं पाहूया. एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक सध्या अजितदादांसोबत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ताकद असण्याचा दावा करणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष मुंबईत स्वतःची ताकद लावणार नाही हे त्यांना कळून चुकलंय. आता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेस दक्षिण मुंबईसह मुंबईतील इतर ठिकाणांवर आपला दावा सांगू शकते. मात्र, काँग्रेसचे मुंबईत कमकुवत झालेले बलाबल पहाता उद्धव ठाकरे या गोष्टीचा महाविकास आघाडी म्हणून फायदा घेण्याच्या तयारीत आहेत. शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वाटाघाटीत कायम अपयशी ठरल्याचं वारंवार दिसून आलंय. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा आता खासदारकीमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढलंय. काँग्रेस हायकमांडनेही त्यांच्या या विजयाची दखल घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष मुंबईतील आपला दावा सहजासहजी सोडणार नाही.
धारावी-अदानीच्या मुद्द्यावर मुंबईतील इतर जागा मिळवण्याची तयारी काँग्रेस करणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळाव्यात किंवा काँग्रेसने त्या सोडाव्यात यासाठी शरद पवार मुंबईतील राजकारणापासून दूर राहतील, अशीही चर्चा आहे. जिंकेल त्याची जागा असं संजय राऊत कितीही म्हणत असेल तरीही या सुत्राप्रमाणे उद्धव ठाकरे शिंदे गटात असलेल्या विद्यमान आमदारांच्या तसेच भाजप विरोधात उभे असलेल्या आमदारांच्या जागाही मागून घेऊ शकतात. याशिवाय ज्या जागांवर निसटता विजय झाला त्या जागांसाठीही ठाकरेंचा आग्रह असणारे. मुंबईतील या खेळीने उद्धव ठाकरेंनी मविआत आपण मोठे भाऊ असल्याचं दाखवून दिलंय. शिवाय उर्वरित ठिकाणीही उद्धव ठाकरे मुंबई पॅटर्न वापरू शकतात. त्यामुळे मविआतील धूसफुस पुन्हा चव्हाट्यावर येणार, हे येत्या काळात नाकारता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे, अलिकडेच “माझ्या नशिबात असेल तर मी मुख्यमंत्री होईन,” असं वक्तव्यं नाना पटोलेंनी केलं होतं. अर्थात काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद असावं ही इच्छा नानांची असली तरीही ती शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंची मुळीच नाही. यंदाच्या जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळणार नाही याची खबरदारी शरद पवार घेतीलच पण त्याची सुरुवात आता उद्धव ठाकरेंनी मुंबईपासूनच केल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेस पक्षाला बळ मिळावं ही इच्छा ना पवारांची आहे, ना ठाकरेंची कारण तसं झालं तर त्याचे परिणाम दोन्ही पक्ष ओळखून आहेत. त्याची प्रचिती ठाकरे आणि पवारांनी लोकसभा निवडणूकीत घेतली आहेच. सांगली लोकसभेवेळीही अशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली होती. आता यंदा विधानसभेलाही हा सामना रंगणार का, ते लवकरच कळेल.