खोटं प्रमाणपत्र सादर करुन दिलेली UPSC परिक्षा आणि नोकरीवर रुजू झाल्यानंतर सुरु झालेला राजेशाही थाट या सगळ्यामुळे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. याप्रकरणाचे रोज नवनवे पैलू उलगडत आहेत. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेत आता पूजा खेडकर यांच्या पालकांचीही एन्ट्री झालीये. अमाप संपत्ती आणि गैरव्यवहाराचे आरोप असलेलं खेडकर कुटुंब आता चांगलंच चर्चेत आलंय. पूजा खेडकर यांचा मनमानी कारभार आता त्यांना चांगलाच नडल्याचं समजतंय. पूजा यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची पूण्यातून वाशिममध्ये बदली तर करण्यात आली, पण त्यांच्या पुढच्या अडचणी आणि आरोपांचा विळखा मात्र झपाट्याने वाढताना दिसतोय. पूजा खेडकर यांच्यावर असलेल्या आरोपांविषयीची माहिती आपण मागच्या व्हिडीओत समजून घेतली होती. त्यानंतर आता पूजा यांच्या आई आणि वडीलांवर कोणते आरोप आहे? त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल झालेत आणि खेडकर कुटुंबाविषयी आतापर्यंत पुढे आलेल्या वादग्रस्त प्रकरणांची माहिती जाणून घेऊया.
UPSC ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पूजा दिलीप खेडकर यांची एक महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुण्यात नियुक्ती करण्यात आली. पूजा खेडकर यांनी दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले. याच आधारावर त्यांना विशेष सवलत मिळाली आणि त्या आयएएस झाल्या. त्यानंतर त्यांना सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण त्या एकदाही तिथे गेल्या नाहीत. पुण्यात रुजू होण्याच्या आधीच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला आणि स्वतंत्र केबिन, गाडी आणि निवासस्थानाची मागणी केली. मात्र, ट्रेनी अधिकाऱ्यांना या सुविधा देत येत नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं. तरीही त्यांच्या मागण्या सुरुच राहिल्या. या सगळ्यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिनही बळकावली. एवढंच नाही तर पूजा खेडकर यांनी स्वत:च्या खाजगी ऑडी कारला लाल दिवाही लावून मागितला. याशिवाय या खाजगी कारच्या मागे त्यांनी 'महाराष्ट्र शासन' असं लिहिलं होतं. ही कार घेऊन त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या. मात्र, आता ही कार पोलिसांनी जप्त केलीये.
या संपूर्ण घटनेच्या निमित्ताने पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यासुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. मनोरमा खेडकर यांचे दोन व्हिडीओ माध्यमांवर व्हायरल झालेत. यातला एक व्हिडीओ म्हणजे त्यांच्या घराची चौकशी करण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्या हातात पिस्तूल घेऊन एका शेतकऱ्याला धमकावताना दिसताहेत. मनोरमा खेडकर यांच्यावर मुळशीतील जमीन हडप केल्याचा आरोप आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच त्यांचा पिस्तुलाचा परवाना रद्द करण्याची नोटीसही बजावलीये.
पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे सनदी अधिकारी होते. यावेळी दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता ४० कोटी रुपये असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्याकडे ११० एकर जमीन आहे. पूजा खेडकर यांनी दृष्टीदोष असल्याचे प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सादर केलं होतं. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून त्यांना हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती पुढे आलीये. शिवाय पूजा यांच्या नावावर २२ कोटींची संपत्ती आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांनी ८ लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र कसं मिळवलं, हासुद्धा मोठा प्रश्न आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी चौकशी आणि कारवाई सुरु केलीये. पूजा यांच्या खाजगी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्यांच्यावर २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. केंद्राने या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन केली असून ही एक सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणारे. आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली, असं स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
या संपूर्ण प्रकरणानंतर आता पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आलीये. मात्र, एवढं सगळं घडल्यानंतरही पूजा यांच्या वडीलांनी आपल्या मुलीची पाठराखण केलीये. "माझ्या मुलीने काहीही चूक केलेली नाही. महिलेने बसण्यासाठी जागा मागणं चुकीचं आहे का? आम्ही आमची बाजू समितीसमोर मांडू," असं त्यांनी म्हटलंय. या सर्व प्रकारावर पूजा खेडकर यांना विचारले असता त्यांनीसुद्धा यावर बोलणं टाळलंय. तर दुसरीकडे विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर यांच्या आईचा फोन बंद असून त्या फरार झाल्याचंही सांगण्यात येतंय.
पूजा खेडकर यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईलच. पण देशभरातील तरुण-तरुणी आयएएस, आयपीएस आणि आयएफएस बनण्यासाठी जीव पणाला लावून मेहनत घेतात. परंतू, यासारख्या प्रतिष्ठित परिक्षांमध्ये असे प्रकार आढळून आल्यास वर्षानुवर्षे अतोनात मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.