एक तरुणी आयएएस अधिकारी बनते, शिकाऊ अधिकारी म्हणून तिची नियुक्तीही करण्यात येते. मात्र, शिकाऊ अधिकारी असताना वरिष्ठ अधिकारी असल्यासारखा आव आणून ती अवास्तव मागण्या करते. एवढंच नाही तर मागण्या मान्य न झाल्याने मनमानी करुन वरिष्ठांची केबिनही बळकावते. ही गोष्ट आहे पुण्याच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची.
पूजा खेडकर हे नाव गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये चर्चेत आलंयं. त्यांच्या मागण्या आणि मनमानी कारभारामुळे नुकतीच पुण्यातून वाशिममध्ये त्यांची बदली करण्यात आली आणि हे संपुर्ण प्रकरण बाहेर आलं. शिवाय या प्रकरणात दररोज नवनवीन बाबींचा खुलासाही होतोय. पूजा खेडकर यांची नियुक्ती कशी झाली? त्यांच्या मागण्या काय होत्या? आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, हे समजून घेऊया.
पूजा दिलीप खेडकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत त्यांनी ८४१ वा क्रमांक पटकावला होता. एक महिन्यापूर्वी सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्य म्हणजे पूजा खेडकर यांनी दृष्टिदोष प्रवर्गातून UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि मानसिक आजाराचे प्रमाणपत्र सादर केले. याच आधारावर त्यांना विशेष सवलत मिळाली आणि त्या आयएएस झाल्या. त्यानंतर त्यांना सहावेळा वैद्यकीय तपासणीसाठी बोलवण्यात आलं. पण प्रत्येक वेळी त्या अनुपस्थित राहिल्या.
आता पूजा खेडकर यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे ते जाणून घेऊया. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनात ज्येष्ठ अधिकारी आहे. तर त्यांचे आजोबादेखील प्रशासकीय सेवेत होते. पूजा यांची आई अहमदनगर जिल्ह्यातील भालगावच्या सरपंच आहेत. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाकडे प्रचंड संपत्ती असल्याचंही सांगितलं जातंय. पूजा खेडकर या ओबीसी नॉन-क्रिमी लियर श्रेणीतून आयएएस अधिकारी बनल्या. त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचे उत्पन्न आणि मालमत्ता ४० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. मग एवढी संपत्ती असताना पूजा खेडकर यांना नॉन-क्रिमी लियर प्रमाणपत्र कसं उपलब्ध झालं? असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येतोय.
पुण्यात रुजू होण्याच्या आधीच पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला आणि स्वतंत्र केबिन, गाडी आणि निवासस्थानाची मागणी केली. मात्र, ट्रेनी अधिकाऱ्यांना या सुविधा देत येत नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं. तरीही त्यांच्या मागण्या सुरुच राहिल्या. रुजू झाल्यानंतर ३ ते १४ जून या काळात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून कामकाजाची माहिती घेणं अपेक्षित होतं. मात्र, असं काहीही झालं नाही. पुण्यातील निवासी उपजिल्हाधिकारी महिला असल्यामुळे त्यांचं अँटी चेंबर वापरण्याची सूचना पूजा खेडकर यांना करण्यात आली. पण तिही त्यांनी मान्य केली नाही.
त्यानंतर पूजा खेडकर वडीलांना सोबत घेऊन आल्या आणि त्यांनी व्हीआयपी सभागृहात जागा शोधली. मात्र, ती जागाही त्यांना आवडली नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांनाच सुनावलं. या सगळ्या घडामोडीनंतर शेवटी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये पूजा खेडकर यांची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, हे जिल्हाधिकारी काही काळ बाहेर असताना पूजा खेडकर यांनी त्यांच्या अँटी चेंबरमधलं सर्व सामान काढलं आणि स्वत:चं सामान तिथे नेऊन ठेवलं. एवढंच नाही तर स्वत:च्या नावाची नेमप्लेटही तयार करवून घेतली. या सगळ्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी चेंबर पूर्ववत करण्याचे आदेश दिलेत. पण यानंतर पूजा खेडकर यांच्या वडीलांनी तिथल्या तहसीलदारांना फोन करून खडेबोल सुनावले.
हे प्रकरण इथेच थांबत नाही तर पूजा खेडकर यांनी स्वत:च्या खाजगी गाडीला लाल दिवाही लावून मागितला. शिवाय त्यांच्या खाजगी गाडीवर 'महाराष्ट्र शासन' असं लिहिण्यात आलंय आणि सरकारी कार्यालयात त्या स्वतःची ऑडी कार घेऊन यायच्या. पूजा खेडकर यांच्या या अवाजवी मागण्या आणि त्यांच्या वागणूकीला कंटाळून अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र दिले. त्यात पूजा यांच्या या सर्व मागण्यांचा स्पष्टपणे उल्लेखही करण्यात आला. त्यानंतर आता त्यांची वाशिम जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आणि हे प्रकरण सर्वत्र चर्चेत आलं.
मात्र, आता बदली झाल्यानंतर हळूहळू या प्रकरणातील धक्कादायक खुलासे उघड होताहेत. याविषयी पूजा खेडकर यांना विचारले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्या घराची चौकशी करण्यासाठी पोलिस त्यांच्या घरी गेले असता त्यांच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केली. त्यांचा हा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झालाय. आता या सर्व प्रकरणाची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतलीये. केंद्राने या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन केली असून ही एक सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणारे. मात्र, पूजा खेडकर यांची केवळ बदली करून चालणार नाही, तर त्यांच्या नियूक्तीसंबंधी उघड होत असलेल्या धक्कादायक माहितींमुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होते? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.