जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत असणार्या दुबईत आता जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळही आकारास येत आहे. प्रारंभिक टप्पा 2030 मध्ये पूर्ण झाल्यावर हे विमानतळ दरवर्षी 260 दशलक्ष प्रवासी हाताळेल. ‘पर्यटनासह विकास’ हे धोरण स्वीकारत दुबई भावी पिढ्यांसाठी प्रकल्पांतून जागतिक केंद्र बनण्याच्या प्रयत्नात आहे.
दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर व अबुधाबीखालोखाल आकाराने दुसर्या क्रमांकाची अमिरात. दुबई हे एक जागतिक शहर असून, मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापार केंद्र व वाहतूक केंद्र. यासोबतच दुबईत हवाई वाहतुकीला विशेष प्राधान्य आहे. जगातील सर्वात महागडे आणि प्रशस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ दुबईत आकार घेते आहे. गेल्या वर्षी, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने 86.9 दशलक्ष प्रवाशांना हाताळले. अमिरातीमध्ये पर्यटनाला चालना मिळते आहे. गेल्या वर्षी 17.15 दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी अमिरातीला भेट दिली. 2019 मध्ये ही संख्या 16.73 दशलक्ष होती. दुबईची अर्थव्यवस्था आणि पर्यटन विभागानुसार, वर्ष 2023 हे दुबईसाठी आतापर्यंतचे सर्वोत्तम वार्षिक पर्यटन आकडेवारी दर्शविणारे होते.
हे पाहता, आर्थिक अजेंड्याचा एक मुख्य भाग म्हणून ही आकडेवारी सुधारण्यावर देशाचा भर आहे. यासह गुंतवणूकदारांना आणि जगभरातील पर्यटकांना पर्यटन क्षेत्राकडे आकर्षित करायचे आहे. मात्र, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या विकासात अडथळा ठरते आहे. या विमानतळाचे विस्ताराचे पर्याय हे आजूबाजूच्या परिसरातील घरे आणि जवळपासच्या महामार्गांमुळे मर्यादित आहेत. हे विमानतळ शहराच्या केंद्रापासून तीन मैलांपेक्षा कमी अंतरावर आहे. हे पाहता आता शहराबाहेर अल मकतूम विमानतळाच्या मोठ्या विस्तारासह दुबईच्या विमानतळाला पर्याय ठरणार आहे. इतकेच नाही तर हे नवीन विमानतळ जगातील सर्वात महागड्या विमानतळांपैकी एक असेल.
हे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प दुबईच्या नैर्ऋत्येस 20 मैलांवर असलेल्या विद्यमान अल मकतूम (-l Maktoum International -irport) आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार आहे. अल मकतूम हे विमानतळ 2010 मध्ये कार्गो ऑपरेशन्ससाठी आणि 2013 मध्ये प्रवासी उड्डाणांसाठी उघडण्यात आले. हे विमानतळ मूळत: मालवाहू उड्डाणांसाठी बांधले गेले होते. परंतु, 2022 मध्ये या विमानतळावर अंदाजे 8,77,400 व्यावसायिक प्रवासी मिळाले. या विमानतळास भरपूर पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. हे नवे विस्तारित विमानतळ आकारमानाने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाचपट असेल.
नवीन दुबई विमानतळ 70 स्क्वेअर किलोमीटरमध्ये विस्तारलेलं असेल. यात 400 एअरक्राफ्ट गेट्स आणि पाच समांतर रन-वे असतील तसेच कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. असा अंदाज आहे की, हे विमानतळ दरवर्षी 12 दशलक्ष टन कार्गो हाताळेल. अमिरातीचे अध्यक्ष एच.एच. शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम म्हणाले की, अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वात मोठी प्रवासी क्षमता हाताळणारे विमानतळ असेल. प्रारंभिक टप्पा 2030 मध्ये पूर्ण झाल्यावर हे विमानतळ दरवर्षी 260 दशलक्ष प्रवासी हाताळेल. पुढील 10 वर्षांत दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व संचालन हळूहळू अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतरित होईल.
या विमानतळाच्या मुख्य इमारतीचे काम सुरू आहे. अंदाजे 34.85 बिलियन (-ED 128 अब्ज) म्हणजेच जवळपास रु. 2.9 लाख कोटींच्या अंदाजे खर्चासह अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प दुबई एव्हिएशन कॉर्पोरेशनचा एक धोरणात्मक उपक्रम आहे. अंदाजित किंमत पाहता हे जगातील सर्वात महागडे विमानतळ आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ लंडनस्थित फर्म लेस्ली जोन्स आर्किटेक्चर दुबईच्या नवीन विमानतळाची रचना करत आहे. या कंपनीने जगभरातील विमानतळांची रचना केली आहे. दोहा ते हाँगकाँग आणि लंडन हीथ्रो टर्मिनल 5 यासारख्या विमानतळाची रचना या कंपनीने केली आहे. पुढील 10 वर्षांत हे विमानतळ 150 दशलक्ष प्रवासी हाताळण्याच्या क्षमतेसह सज्ज असेल.
शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम पुढे म्हणतात की, दुबईच्या नवीन विमानतळाभोवती एक संपूर्ण शहर तयार केल्याने 10 लाख लोकांना रोजगार आणि घरे मिळतील. हे लॉजिस्टिक आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांचे आयोजन करेल. आम्ही भावी पिढ्यांसाठी एक नवीन प्रकल्प तयार करत आहोत. दुबई हे विमानतळ, बंदर, शहर नियोजन आणि कनेक्टिव्हिटी पाहता जागतिक केंद्र असेल. तर, शहर नियोजक आणि विकासक दुबई साउथच्या म्हणण्यानुसार, अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात मोठे विमानतळ असेल, अशी अपेक्षा आहे.