‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाकडे भारताची झेप

18 Jul 2024 21:39:48
hyperloop technology bharat project


जगभरात ‘मास ट्रान्झिट सिस्टीम्स’साठी नवतंत्रज्ञानाची चाचपणी सुरू असताना, भारतात आशियातील पहिला ‘हायपरलूप’ ट्रॅक चाचणीसाठी सज्ज होतोय. इतकेच नव्हे, तर एका स्पर्धेअंतर्गत हा ट्रॅक जगभरातील युवा संशोधकांनाही आपल्या ‘पॉड्स’सह चाचणीसाठी आमंत्रित करतोय. ही सर्वार्थाने भारताच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडविणारी घटनाच म्हणायला हवी. भारताची ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाच्या दिशेने यशस्वी घोडदौड सुरू आहे. त्यानिमित्ताने ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाचा आढावा घेणारा हा लेख...


‘हायपरलूप’ तंत्रज्ञान नेमके काय?

‘हायपरलूप’ ही लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी एक हाय-स्पीड वाहतूक व्यवस्था आहे. यामध्ये ‘व्हॅक्यूम ट्यूब’मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिकली लेव्हिटेटिंग ‘पॉड’चा समावेश असतो, ज्यामुळे घर्षण आणि एअर ड्रॅग दूर होते. विद्युत चुंबकीय पद्धतीने हे ‘पॉड’ रुळांवरून पुढे सरकतात. ही क्रिया अतिशय वेगाने होत असल्याने आणि कोणतेही प्रत्यक्ष घर्षण नसल्याने याद्वारे ताशी एक हजार किमी वेगानेही प्रवास करता येतो. वाहतुकीचा हा प्रकार विमानाच्या दुप्पट वेगाने गंतव्य स्थानावर पोहोचवेल. 24 तास संचालनासाठी ऊर्जा संचयन होत असल्याने विजेचा वापर कमी होतो. एकूणच ‘हायपरलूप’ हे सौर किंवा विद्युत ऊर्जेवर चालणार्‍या वाहतुकीचे शाश्वत माध्यम असेल.

आज जगभरातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये स्मार्ट शहरे भरभराटीस येऊ लागली आहेत. अशा स्मार्ट सिटीमध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र, राज्य सरकारे प्रयत्नशील दिसतात. अशा स्मार्ट शहरांमध्ये गुंतवणुकीचा विचार करताना, सिंगापूर आणि पश्चिम जावाच्या धर्तीवर ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनावर भर देण्यात आला आहे. तसेच उद्योगांच्या भरभराटीसाठी उच्च दर्जाच्या, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, वाहतूक साधनांसाठी संशोधन, चाचण्या सुरू आहेत. बुलेट ट्रेन, हायस्पीड रेल ट्रान्झिट, मोनोरेल, मॅगलेव्ह अशा विविध प्रवासी वाहतूक पर्यायांमध्ये ‘हायपरलूप’ आणि ‘ट्यूब-ट्रान्सपोर्ट’ हे वेगवान प्रवासासाठी जगभरात चर्चेत असणारे तंत्रज्ञान.

भारतात ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाची चर्चा सर्वप्रथम सुरू झाली, ते महाराष्ट्र सरकारने केलेल्या एका सामंजस्य करारामुळे. २०१८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाला जोरदार पाठिंबा दर्शवला. फडणवीस यांनी त्यावेळी चाचणी ट्रॅकला भेटही दिली. मात्र, त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाला ‘ब्रेक’ लावला. त्याचवेळी भारतात ‘आयआयटी मद्रास’मधील युवा संशोधक मात्र भारताला ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानात जागतिक ओळख देण्यासाठी प्रयत्नशील होते. आज जग ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाची योजना आखत असतानाच, भारत मात्र वेगाने प्रगती करत असल्याचे दिसते. भारतात आयोजित होणारी ‘जागतिक हायपरलूप स्पर्धा’ हे त्याचेच द्योतक म्हणता येईल.


‘आयआयटी मद्रास’ आणि ‘टीम आविष्कार’

‘युरोपियन हायपरलूप वीक’ (एकथ) मध्ये भारतीय संशोधक चमूने भारताची मान उंचावली. हा उपक्रम एक प्रतिष्ठित वार्षिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे, जो जगभरातील विद्यापीठातील विद्यार्थी, पाहुणे वक्ते आणि कंपन्यांना ‘हायपरलूप’ तंत्रज्ञान, त्याची व्यवहार्यता आणि ‘स्केलेबिलिटी’ यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आणतो. ‘आयआयटी मद्रास’ची ‘आविष्कार हायपरलूप टीम’ म्हणजे 50 विद्यार्थ्यांचा गट. त्यांनी या युरोपियन ‘हायपरलूप’ सप्ताहात तांत्रिक श्रेणींमध्ये जागतिक स्तरावर पहिल्या तीन संघांमध्ये स्थान पटकाविले. त्यांनी विस्तृत संशोधन आणि नावीन्यपूर्ण डिझाईन्सचे यावेळी प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, त्यावेळी अनेक पुरस्कार श्रेणींमध्ये नामांकन मिळालेला तो एकमेव गैर-युरोपियन संघ होता. या टीमने ’गरुड’ नावाने ‘प्रोटोटाईप पॉड’ तयार केला. इतकेच नाही, तर या टीमने सातत्याने जागतिक पातळीवर आपले स्थान पहिल्या पाचमध्ये ठेवत चमकदार कामगिरी केली.
याच संघाने आता भारतातील वाहतुकीचे भविष्य बदलण्याची तयारी दर्शविली आहे. ‘युरोपियन हायपरलूप वीक २०२३’ मध्ये या संघाने चेन्नई आणि बंगळुरूदरम्यान ३५० किमी लांबीच्या ‘हायपरलूप कॉरिडोर’साठी त्यांच्या योजनांचे अनावरण केले. त्यांच्या योजनेनुसार बंगळुरू ते चेन्नई प्रवासाचा कालावधी अवघ्या ३० मिनिटांवर येऊ शकतो. संघाच्या यशामुळे त्यांना भारत सरकारसह विविध भागधारकांकडून आणि ‘अर्सलोरमित्तल’ (ArcelorMittal ), ‘एल अ‍ॅण्ड टी’, ‘ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया’ यांसारख्या उद्योग क्षेत्रातील भागीदारांकडून पाठिंबा आणि निधी उपलब्ध झाला आहे. भारत आणि आशियातील पहिला ‘हायपरलूप’ चाचणी ट्रॅक ‘आयआयटी मद्रास’च्या १६३ एकर डिस्कव्हरी कॅम्पसच्या बाहेरील थायूर येथे तयार करण्यात आला आहे. या साईटवर ४०० मीटर ‘व्हॅक्यूम ट्यूब’च्या फॅब्रिकेशनसाठी ‘अर्सलोरमित्तल ' (ArcelorMittal ) या स्टील उत्पादक कंपनीने जवळजवळ ४०० टन स्टीलचा पुरवठा केला. याच ट्यूबमध्ये ‘पॉड्स’ची २०० किमी प्रतितास वेगाने चाचणी केली जाईल. चेन्नई ते बंगळुरू अशी ‘हायपरलूप’ प्रणाली तयार करणे, हे या संघाचे अंतिम लक्ष्य आहे, जे ३५० किमीचा प्रवास १५ मिनिटांत पूर्ण करू शकेल. पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्यास हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होईल.


जगभरात ‘हायपरलूप’च्या चाचण्या

इलेक्ट्रिक कार कंपनी ’टेस्ला’ आणि अंतराळ प्रवास कंपनी ’स्पेसएक्स’नेही ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाची चाचणी केली आहे. ‘व्हर्जिन हायपरलूप’ची पहिली चाचणी दि. ९ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे ५०० मीटरच्या ट्रॅकवर एका ‘पॉड’आधारे करण्यात आली होती. यामध्ये एक भारतीय आणि अन्य प्रवासी सहभागी होते. यावेळी ‘पॉड’चा वेग १६१ किलोमीटर प्रतितास इतका होता.अशा या ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानावर संशोधन करणारा भारत हा एकमेव देश नाही. दुबई आणि अबूधाबीला ‘हायपरलूप’ने जोडण्यासाठी योजना विकसित केल्या जात आहेत. मेक्सिको सिटी आणि ग्वाडालजारादेखील नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आहे.


भारतातील ‘हायपरलूप’चे भविष्य

भारत ही सर्वात वेगाने वाढणारी जागतिक अर्थव्यवस्था तर आहेच. शिवाय भारतात मोठ्या संख्येने तरुण कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. म्हणूनच आज भारत जागतिक दर्जाचे उच्च-तंत्र अभियांत्रिकी कौशल्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे ‘हायपरलूप’ तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी भारत ही एक आदर्श बाजारपेठ ठरू शकते. भारतातील ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानातील प्रयोगांना सुलभ करण्यासाठी आणि वास्तविक जागतिक पातळीवरील त्याची व्यवहार्यता प्रमाणित करण्यासाठी आता ‘आयआयटी मद्रास’चे सेंटर जागतिक पातळीवर ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानावर संशोधकांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास प्रा. सत्य चक्रवर्ती, प्राध्यापक सल्लागार, ‘आविष्कार हायपरलूप’, ‘आयआयटी मद्रास’ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.


भारतात ‘हायपरलूप’ जागतिक स्पर्धा

भारतात पहिल्यांदाच ’ग्लोबल हायपरलूप स्पर्धा २०२५’चे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ४०० मीटर लांबीचा एक ट्रॅकही सज्ज होतोय. ‘आयआयटी मद्रास’कडून ही अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारताला ‘हायपरलूप’ तंत्रज्ञानाची ओळख करून देत असतानाच, नावीन्यपूर्ण संकल्पनांसह संशोधक युवकांना जागतिक व्यासपीठ प्रदान करेल. जगभरात ‘हायपरलूप’ संकल्पना प्रदर्शित करणे, त्याचा प्रसार करणे, वाहतुकीच्या क्षेत्रात परिवर्तनशील उपक्रमांना चालना देणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट. ४०० मीटरच्या ट्यूब ट्रॅकसह भारत या स्पर्धेच्या आयोजनातून जागतिक स्तरावर भारताचे तंत्रज्ञानआधारित संशोधन आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात महत्त्व अधोरेखित करेल.



Powered By Sangraha 9.0