सूर निरागस हो....

15 Jul 2024 20:53:11
music composer samir saptiskar


इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन पारंपरिक नोकरीची वाट न धरता, संगीतासाठीच आपले अवघे जीवन समर्पित करणार्‍या संगीतकार समीर सप्तीसकर यांच्याविषयी...

वैयक्तिक जीवनात किंवा व्यावसायिक आयुष्यात, बर्‍या-वाईट प्रसंगांत माणसाचं मन शांत करण्याचा एक रामबाण उपाय म्हणजे ‘संगीत’. भारतीय संस्कृतीत संगीतकलेचे अनन्यसाधारण महत्त्व. याच संगीताचा पिढीजात वारसा अनेकांनी आपलासा केला आणि जागतिक स्तरावरही भारतीय संगीताचे सूर घुमू लागले. असेच एक संगीतकार समीर सप्तीसकर यांच्या सूरमय प्रवासाविषयी आपण जाणून घेऊयात...

समीर सप्तीसकर यांचा जन्म आणि संपूर्ण बालपण हे मुंबईच्या दादरचं. येथील डॉ. अँटोनिया डिसिल्व्हा शाळेत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, सर्वसामान्य कुटुंबात डॉक्टर किंवा इंजिनिअर हे दोन पर्याय समोर उपलब्ध असतात, त्यापैकी इंजिनिअरिंग क्षेत्राची निवड करुन समीर यांचा शैक्षणिक प्रवास सुरुवात झाला. मुंबईतील भगुबाई महाविद्यालयातून त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पण, शिक्षण घेत असताना त्यांना पुढे संगीत क्षेत्रातच आपलं करिअर घडवण्याची तीव्र इच्छा होती. आपल्या इच्छेचा पाठपुरावा करत त्यांनी महाविद्यालयात असताना चार मित्रांसोबत एक म्युझिक बॅण्ड सुरू केला. त्यांच्या मित्रांना गिटार, की-बोर्ड वाजवण्याचे प्रशिक्षणदेखील समीर यांनीच दिले. वाद्यवादनाविषयी समीर यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे, कोणताही क्लास किंवा शिक्षकाकडून वाद्य शिकण्याचे प्रशिक्षण समीर यांनी घेतले नाही. बालपणापासून उपजतच त्यांना की-बोर्ड वाजवता येत होता. परंतु, गिटार, माऊथ ऑर्गन, बासरी या वाद्यांचे वादनकला आणि शिक्षण त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थात यू-ट्युबवरून शिकले.

संगीत क्षेत्र आपलेसे करावे, अशी समीर यांची इच्छा होतीच; मात्र त्यांच्या आईवडिलांना त्यांनी केवळ छंद म्हणून तो जोपासावा आणि पैसे कमावण्यासाठी रीतसर नोकरी करावी, अशी इच्छा होती. पण, आपल्याला फक्त समजतं, हे मनाशी पक्कं करून स्वत:च्या अर्थार्जनाची सोय करण्यास सुरुवात केली. समीर यांनी लग्नसराईत किंवा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी जे बॅण्ड वाजवले जातात, त्या बॅण्डमध्ये वाद्य वाजवून तिथून पैसे गोळा केले आणि त्यातून त्यांनी पहिली गिटार खरेदी केली. पुढे, संगीतनिर्मिती तर करायची आहे, पण खिशात पैसे नसल्याकारणाने कोणत्या स्टुडिओत जाऊन किंवा अन्य वादकांना सोबत घेऊन म्युझिक कंपोझ करणं शक्य नव्हतं. अशावेळी पुन्हा एकदा समीर यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही मोफत सॉफ्टवेअर्सचा शोध लावला. जिथे आपल्याला हवी ती वाद्ये वाजवता येऊ शकतात आणि त्यातून आपण आपलं स्वत:चं संगीत निर्माण करू शकतो. याचाच उपयोग करून त्यांनी गाणी तयार करण्यास सुरुवात केली.

अभिनय असो किंवा संगीत, कोणत्याही कलेची सुरुवात रंगभूमीपासूनच होते. समीर यांनीदेखील नाटकांकडे आपला मोर्चा वळवला आणि महाविद्यालयांच्या एकांकिकांना संगीत देण्यास सुरुवात केली. त्यांनी ज्या पहिल्या एकांकिकेला संगीत दिलं, ती म्हणजे ‘अनन्या’, ज्यामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी हिने प्रमुख भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे, या एकांकिकेसाठी त्यांना पारितोषिकदेखील मिळालं आणि त्यांना संगीतासाठी ‘सवाई’ स्पर्धेच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. तर असा समीर यांचा संगीतकार म्हणून प्रवास एकांकिकांपासून सुरू झाला. त्यानंतर, त्यांनी आपल्या मित्रांसमवेत ‘ब्रेकअप के बाद’ हे गाणं लिहिलं आणि त्याला संगीत दिलं. अनपेक्षितपणे त्या गाण्याला तरुणाईचा इतका अप्रतिम प्रतिसाद मिळाला की, पुढे मित्रांनी मिळून ‘से द बॅण्ड’ हा त्यांचा संगीत बॅण्ड तयार केला आणि त्याअंतर्गत त्यांनी ‘गच्ची’, ‘रोमिओ-ज्युलिएट’, ‘भजन एक्स’ अशी गाणी तयार केली.

कालांतराने सुदैवाने एक निर्मात्याने समीर यांना पैसे देत ‘ब्रेकअप के बाद’ या गाण्याचा व्हिडिओ म्युझिक अल्बम तयार करावा, असे सुचवले आणि समीर यांन ती संधी साधत तो अल्बम तयार केला. पुढे त्यांना दिग्दर्शक आणि सिनेमेटोग्राफर संजय जाधव यांनी त्यांच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटात ‘जिंदगी... जिंदगी’ हे गाणं संगीतबद्ध करण्याची संधी दिली आणि समीर यांचा चित्रपटांचा नवा प्रवास संगीतकार म्हणून सुरू झाला. ‘दुनियादारी’ चित्रपटानंतर ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘एफ यू’, ‘झिपर्‍या’ अशा मराठी चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यांना त्यांनी संगीत दिलं. चित्रपटांनंतर समीर यांनी ‘काहे दिया परदेस’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘चुकभूल द्यावी घ्यावी’, ‘तुझं माझं ब्रेकअप’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ अशा मराठी मालिकांची शीर्षकगीतेही संगीतबद्ध केली.

समीर यांनी ज्यावेळी संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली, त्यावेळी केवळ ‘उडत्या चालीची गाणी करणारा संगीतकार’ याच दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिले जात होते. संगीत क्षेत्रात कुणाचीही आर्थिक मदत न घेता, स्वकष्टाने समीर यांनी आज नाटक, चित्रपट आणि मालिका क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. समीर यांनी तंत्रज्ञानालाच आपला गुरू बनवून तिथून वाद्ये आणि संगीताचे ज्ञान आत्मसात करत संगीत क्षेत्राला नवी गाणी देऊ केली.
समीर सप्तीसकर यांच्या पुढील संगीतमय प्रवासाला ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0