शीख समाज कोणत्याही स्थितीत दुखावला न जाता, या खलिस्तानवादी विचारधारेला वेगळे पाडण्याची गरज आहे. ज्या विदेशी शक्ती अशा खलिस्तानवादी विचारधारेला आपल्या देशात आश्रय देत आहेत, त्यांनाही भारताने सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे.
खलिस्तानी समर्थक भारतातही मोठ्या प्रमाणात सक्रिय असून, त्यांच्या समर्थनार्थ शीख समाजाचे नेते उघडपणे भूमिका घेऊ लागल्याचे दिसते. देशाच्या एकात्मतेचा विचार करता, ही काहीशी काळजी करण्यासारखी स्थिती. कॅनडा, अमेरिका या देशांमध्ये खलिस्तानी समर्थक उघडपणे भारतविरोधी भूमिका घेऊन आंदोलने करताना दिसत आहेत. त्या देशातील राजकीय नेतृत्व अशा भारतविरोधी कृत्यांना पायबंद घालू शकलेले नाही. विदेशात अशी स्थिती असतानाच शिखांच्या सुवर्ण मंदिरातील काही धार्मिक नेते उघडपणे खलिस्तानवाद्यांचे समर्थन करताना दिसतात. स्वत:ला ‘प्रतिभिंद्रनवाले’ समजणारा अमृतपाल सिंह हा तुरुंगात असतानाही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाला. याचा अर्थ खलिस्तान चळवळीला समर्थन देणारा वर्ग पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. शेजारी असलेला पाकिस्तान तर कित्येक वर्षांपासून खलिस्तानवाद्यांना खतपाणी घालत आला आहे. खलिस्तानी चळवळीचा मोठा फटका देशास बसला आहे. तो इतिहास लक्षात घेऊन ही फोफावत असलेली विषवल्ली वेळीच उखडून फेकून देण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात अलीकडेच घडलेले उदाहरण खूप काही सांगून जाणारे आहे.
‘अकाल तख्ता’चे एक जथेदार ग्यानी रघुबीरसिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना, खलिस्तानवादी गजिंदरसिंह खालसा, हरदीपसिंह निज्जर आणि परमजीतसिंह पंज्वार यांच्या प्रतिमा सेंट्रल शीख म्युझियममध्ये ठेवाव्यात, असे आवाहन शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला केले आहे. भारत सरकारला हव्या असलेल्या अतिरेक्यांच्या सूचीत या तिघांचा समावेश आहे. गेल्या 13 जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात ग्यानी रघुबीरसिंह यांनी ही मागणी केली. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि दल खालसा यांनी सुवर्ण मंदिरालगत असलेल्या एका गुरुद्वारामध्ये आयोजित कार्यक्रमात ही मागणी केली. ज्या तीन जणांच्या प्रतिमा लावण्याची मागणी करण्यात आली, त्या सर्वांचा ग्यानी रघुबीरसिंह यांनी ‘हुतात्मा’ असा उल्लेख केला. या तिघांनी जो ‘त्याग’ केला तो लक्षात घेऊन त्यांच्या प्रतिमा लावण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या कार्यक्रमास शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष हरजिंदर धामी, तख्त दमदमासाहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीतसिंह आणि अन्य नेते उपस्थित होते. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने काढलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात ही माहिती देण्यात आली होती. धार्मिक स्थळांचा आधार घेऊन खलिस्तानवादी चळवळीस कसे प्रोत्साहन दिले जात आहे, त्याची कल्पना यावरून यावी. स्वतंत्र खलिस्तानची मागणी करण्यासाठी अशा लोकांकडून धार्मिक स्थळांचा वापर केला जात आहे. अशा तत्त्वांना वेळीच वेगळे पाडण्याची गरज आहे. हा सर्व अत्यंत संवेदनशील विषय आहे. शीख समाज कोणत्याही स्थितीत दुखावला न जाता, या खलिस्तानवादी विचारधारेला वेगळे पाडण्याची गरज आहे. ज्या विदेशी शक्ती अशा खलिस्तानवादी विचारधारेला आपल्या देशात आश्रय देत आहेत, त्यांनाही भारताने सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे.
मुस्लिमांची वाढती दादागिरी!
‘इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा’ ही घोषणा हिंदुस्थानातील तमाम देशभक्त नागरिकांच्या परिचयाची. पण, आता अमेठीमध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्या निमित्ताने एक नवीनच घोषणा समाजमाध्यमांद्वारे लोकांपुढे आली. गेल्या 14 जुलै रोजी काही इस्लामी धर्मांध गटांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये ‘हिंदुस्तान में रहना हैं, या हुसैन कहना हैं’ अशा घोषणा चक्क मुसाफिरखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर दिल्याचे वृत्त आहे. मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अशा आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. यासंदर्भात पोलिसांनी त्वरित कारवाई करून गुन्हा दाखल केला असून, अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. अशा घोषणा दिल्याबद्दल अभय चैतन्य मौनी महाराज यांनी, हा एक मोठा कट असून या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मोहरमच्या वेळी ‘या हुसैन’ अशा घोषणा दिल्या जातात, हे सर्वविदित आहे. पण, त्या आधी ‘हिंदुस्थान में रहना होगा...’ अशी शब्दरचना करून कोणत्या समाजास आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे? घोषणा देणार्यांनी अगदी पोलीस स्टेशनच्या बाहेर घोषणा दिल्याने अशा घोषणा देणार्यांना कोणाचाच धाक नसल्याचे दिसून आले. या घटनेनंतर अमेठीमधील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. मुस्लीम समाजातील काही धर्मांध देशामध्ये कशाप्रकारचे तणावाचे वातावरण निर्माण करू इच्छितात, त्याची कल्पना या घटनेवरून यावी.
महाराष्ट्रात ‘इसिस’शी संबंधित 50हून अधिक तरुण!
राष्ट्रीय तपास यंत्रणेने हाती घेतलेल्या एका शोधमोहिमेमध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढत असल्याचे आढळून आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या 15 फेब्रुवारी रोजी हरसूल येथे टाकलेल्या छाप्यामध्ये ‘इसिस’शी संबंधित मोहम्मद झोएब खान नावाच्या एका व्यक्तीस ताब्यात घेतले. या मोहम्मद खान याचे लीबियामधील ‘इसिस’च्या दहशतवाद्यांशी कसे संबंध आहेत, याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या आरोपपत्रामध्ये दिली आहे. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणात भरती करता यावे, यासाठी संबंधित व्यक्तींंना विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध करून दिले जात असल्याचेही राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. ‘इसिस’मध्ये तरुणांची भरती करण्यासाठी आणि ‘इसिस’चा विचार पसरविण्यासाठी 50 हून अधिक तरुणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेस आढळून आले आहे. हे तरुण छत्रपती संभाजीनगरच्या परिसरातील आहेत. स्फोटके कशी तयार करावीत, याचे प्रशिक्षणही या गटातील तरुणांना व्हिडिओच्या माध्यमातून दिले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. भारतामध्ये कोठे दहशतवादी हल्ले करायचे याची योजना करण्यात आल्याचेही या तपासातून उघडकीस आले आहे. ‘इसिस’चे एक जाळे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आले आहे. पण, ‘इसिस’चे आकर्षण असलेले अनेक धर्मांध तरुण राज्याच्या आणि देशाच्या अन्य भागांतही आहेत. त्यांचाही पूर्ण बंदोबस्त करण्याची गरज आहे. संबंधित राज्यांमधील पोलीस यंत्रणेने या दृष्टीने सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. केवळ राष्ट्रीय तपास यंत्रणेवर हे काम सोपवून चालणार नाही!
‘शीख फॉर जस्टिस’ संघटनेवरील बंदीमध्ये वाढ
कॅनडा आणि अमेरिकेमधून भारतविरोधी शक्तींना खतपाणी घालण्याचे काम करीत असलेल्या ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेवरील बंदी भारत सरकारने आणखी पाच वर्षांसाठी वाढविली आहे. खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंतसिंह पन्नू याने या संघटनेची उभारणी केली आहे. भारतविरोधी कृत्ये करण्यासाठी किंवा केल्याबद्दल या अतिरेकी संघटनेकडून मोठमोठी बक्षिसे घोषित केली जात असल्याचे आपण सर्व जण जाणतोच! या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय भारत सरकारने गेल्या 9 जुलै 2024 रोजी घेतला. या संघटनेचा सूत्रधार गुरपतवंतसिंह यास भारत सरकारने दि. 1 जुलै 2020 रोजी दहशतवादी घोषित केले आहे. भारत सरकारने या आधी ‘शीख फॉर जस्टिस’ संघटनेवर 2019 मध्ये बंदी घातली होती. पंजाबमध्ये फुटीरतावादी तत्त्वांना आणि अन्य देशविरोधी तत्त्वांना खतपाणी घालण्याचे काम ‘शीख फॉर जस्टिस’ ही संघटना करीत असल्याचे सरकारला आढळून आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ‘शीख फॉर जस्टिस’ आणि पन्नू याच्याविरुद्ध नव्याने गुन्हे नोंदविले आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे जे आंदोलन झाले होते, त्या आंदोलनास ‘शीख फॉर जस्टिस’ या संघटनेची उघड फूस होती, हे त्यावेळी दिसून आले आहे. या संघटनेचा प्रमुख असलेल्या गुरपतवंतसिंह याच्याकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. एकप्रकारे हे देश ‘शीख फॉर जस्टिस’च्या भारतविरोधी कारवायांकडे डोळेझाक करीत असल्याने तेथून ही संघटना भारतविरोधी कारवाया करीत आहे. त्या देशांकडूनही या संघटनेविरुद्ध ठोस कारवाई केली जाईल, यासाठी भारताने सर्व प्रकारचा दबाव आणण्याची आवश्यकता आहे.
9869020732