गावोगावी जाऊन लोकांना भेटून चिथावण्याचे कष्ट करण्यापेक्षा वारीनिमित्त एकत्र जमलेल्या लोकांना चिथावणे सोपे, या विचाराने काही वर्षांपासून विठोबाशी, वारीशी काही देणेघेणे नसलेल्या विचारांचे लोक आणि संस्था वारीला जातात. तिथे त्यांचा स्वार्थी, विद्वेषी अजेंडा राबविण्याचा प्रयत्न करतात. यावर ‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’ अशी भाववृत्ती असलेला वारकरी समाज काय करतोय, या सगळ्याचा मागोवा घेणारा हा लेख.
दि. 1 जुलै रोजी वारकर्यांचा मुक्काम पुण्याला होता. हजारो वारकरी स्त्री-पुरुष होते. ते नामस्मरणात दंग होते. पांडुरंगाचे दर्शन होणार, वारी सफल होणार या आनंदात होते. इतक्यात तिथे काही लोकांनी पत्रके वाटली. त्यांचे पथनाट्य सुरू झाले. संतविचार, वारी, विठोबा यांवर बोलता बोलता चार-दोन ओळींनंतरच त्यांनी प्रश्न केला, ‘महागाई किती वाढली?’ आणि मग त्यांचे पूर्ण पथनाट्य हिंदू धर्म आणि राज्य, केंद्र सरकारविरोधात हळूहळू सुरू झाले. ‘टिपीकल डफली गँग’ ज्या पद्धतीने विद्वेषी बोलते, त्या पद्धतीने त्यांचे पथनाट्य सुरू झाले. देवाच्या नामस्मरणात रमलेले वारकरी त्यांचे खूप काही लक्ष देऊन ऐकत होते असे नाही. मात्र, वारकर्यांनी आपले म्हणणे ऐकावे, त्यांच्यात विद्वेष माजावा, हिंदू धर्म विषमतावादी आहे, आताचे सत्ताधारी धर्मभेद करतात. मात्र, पंढरीचे गुणगान करणारे 51 मुस्लीम संत आहेत, असे म्हणत त्यांनी ‘गंगा-जमना तहजिब’चे गोडवे गायला सुरुवात केली. हे सगळे पंढरीच्या वारीत अपेक्षित नव्हते किंवा पंढरीची वारी त्यासाठी नाहीच! त्यामुळेच वारीत असलेल्या हिंदू युवकांनी या पथनाट्य करणार्याला अडवले आणि विचारले, “हे काय चालले आहे? याचा आणि विठूरायाचा, आम्हा भक्तांचा आणि पंढरपूरचा काय संबंध?” त्यावर पथनाट्य करणारे म्हणाले, “महागाई जातीभेदाचा विषमतेचा प्रश्न आहे, यावर आम्ही जनतेमध्ये जागृती करत आहोत.” यावर हिंदू युवकांनी ते पथनाट्य बंद पाडले आणि त्यांना सांगितले, “निघायचे. तुमचे पथनाट्य राजकारण पाहायला येथे वारकरी आलेले नाहीत. ते विठोबाला भेटण्यासाठी चालले आहेत. बंद करा,निघा आता!” त्यांनी असे म्हटल्याबरोबर त्या पथनाट्यवाल्यांनी त्यांचे चंबुगबाळे आवरले.
वारीत गेल्या काही वर्षांपासून हे प्रकार खूप घडताना दिसत आहेत.
आताच एकजात सगळ्या निधर्मी पुरोगामींना वारीचे वेध का लागावे? बरं, वारीत जाऊन यांना सांगायचे काय असते, तर देशात, धर्मात किती विषमता आहे, अराजकता आहे, जातीभेद आहे, हिंदू धर्मात स्त्रियांना गुलामी करावी लागते वगैरे वगैरे. पण, यांना कोण सांगणार, हे वारी करणारे श्रद्धाळू ज्या पांडुरंगाला भजतात, त्याचे भक्त संत ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकोबा ते सावतामाळी, गोरा कुंभार ते चोखामेळा ते मुक्ताई, जनाई या महिलाही आहेत. ज्या वारीत जातपात पाहिली जात नाही, लिंगभेद केला जात नाही, त्या वारीत जाऊन हे असले लोक विषमतेवर बोलतात? समता, संविधान वगैरेचे नाव घेऊन जाणारे लोक वारीत काय बोलतात? काय करतात? ‘अवघा भेदाभेद अमंगल’ असे जिथे मानले जाते, त्या वारीमध्ये वारकर्यांच्या जन्मजात हिंदू धर्माबद्दल संस्कृतीबद्दल द्वेष माजवणार्या लोकांचा उद्देश काय असेल, हे काय सांगायला हवे?
“वारीत पाप केले असेल, तर आताच्या आता येशूच्या चरणी लीन व्हा, तुम्ही पापमुक्त दुःखमुक्त व्हाल” अशी पत्रके यंदाच्या वारीत वाटली गेली. भोळ्या-भाबड्या वारकर्यांना येशुस्तुती ऐकवण्याचे प्रकारही घडले. धर्मस्वातंत्र्य आहे, धर्मप्रचाराचेही स्वातंत्र्य आहे. पण, ज्यांना विठ्ठलाशिवाय काहीच प्रिय नाही, अशा वारकर्यांना येशू नाम घेण्यासाठी प्रलोभन देणे, हे कोणते धर्मस्वातंत्र्य? धर्मांतरासाठी ‘जिहाद’ आणि ‘क्रुसेड’ घेणारी काही मंडळी आजही तशीच आहेत, जशी ती शेकडो वर्षांपूर्वी होती. एक एक माणूस लबाडीने किंवा धाकदपटशाहीने किंवा बुद्धिभ्रमाने किंवा कसेही करून आपल्या धर्मात आलाच पाहिजे, हे त्यांचे साधे गणित. त्यांच्या धर्मांतराचे गणित आणखीन सोपे व्हावे, म्हणून अनेक बहुरुपी लोक वारीत घुसत आहेत. विठ्ठलाचा जयघोष केला, टाळ-मृदुंग वाजवले, जरा ठेका धरला, की आजूबाजूचे भोळे-भाबडे वारकरी स्त्री-पुरुष त्यांच्यात सामील होतात. या सामील होणार्यांमध्ये एकाजरी व्यक्तीला त्यांना चिथावता आले तरी बस!
संत ज्ञानेश्वरांवर अतिशय घाणेरडी टिप्पणी करणार्या आणि समाजात विद्वेष माजवण्याचा प्रयत्न करणारी म्हणून ओळख असणार्या सुषमा अंधारे हिला वारीमध्ये आताच ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शेख मोहम्मद विठ्ठला’ म्हणावेसे वाटले? यातलेच काही लोक सांगतात की, 51 मुस्लीम संतांनी पंढरीचा महिमा गायला आहे, हेसुद्धा मान्य. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संत तुकोबांच्या वशंजांना वारीसाठी छत्रपती संभाजी महाराजांची मदत का घ्यावी लागली? धर्मांध औरंग्या वारीवर हल्ला करेल, अशी भीती त्यांना होती. औरंग्या विठुरायाची मूर्ती तोडेल, तिची विटंबना करेल, या भीतीने त्याकाळी विठुरायाची मूळ मूर्ती दुसरीकडे हलवावी लागली होती, हासुद्धा इतिहास आहे ना?
चार दिवसांपूर्वी एका मुस्लीम व्यक्तीने त्याचा वारीतील अनुभव लिहिला. तो म्हणतो, ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या दिंडीत होतो. त्याचे म्हणणे, रामनवमी किंवा कावड वगैरे यात्रा या हिंदूराष्ट्रवाल्यांच्या आहेत आणि हिंसक आहेत, तर पंढरपूरची वारी शांत, सौम्य आहे. थोडक्यात त्याला असे म्हणायचे आहे की, पंढरपूरची वारी ही हिंदूराष्ट्रवाल्यांची नाही. तो पुढे म्हणतो, “तिथे सोबत तुषार गांधी, कवी अरूण म्हात्रे, फिरोज मीठीबोरवाला, शरद कदम वगैरे मान्यवर होते. तसेच, डॉ. पिल्लई होते. त्यांची कविता होती की, संत तुकाराम यांनी जातीधर्मातील अंतर मिटवले. अल्ला आणि विठ्ठल एकच आहेत.” अर्थात, सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे वगैरे सहभागी झालेल्या या वारीत हे असे सगळे होणारच!
वारीमध्ये काही वर्षांपासून निधर्मी पुरोगामी लोक मांडतात की, विठ्ठल आणि अल्ला वेगळा नाही. संत तुकाराम महाराजांचे ‘अल्ला खिलावे अल्ला पिलावे’ हे भजन म्हणणार्या मुस्लीम व्यक्तीचे भजनही गेल्यावर्षी चर्चेत होते. पण, मुद्दा असा आहे की, असे क्षणभर मानले की, संत तुकाराम किंवा वारीतल्या लाखो वारकर्यांनी मानलेच की, विठ्ठल आणि अल्ला एकच आहे, मग जगातले सोडा, या देशातले मुस्लीम मानतील का हे विचार? संत तुकारामांनी काय सांगितले, काय नाही, याचा वारकर्यांचा शब्दशः अभ्यास नसला, तरी ते वारकरी हिंदू धर्मसंस्कारांप्रमाणे सृष्टीतल्या चराचरांत देव आहे, असेच मानतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व देव एक आहेत आणि तो एक देवही सर्व देवांमध्ये आहे. पण, हे सत्य कुणीतरी देशात, राज्यात तर सोडाच, पण वारीला जाताना लागणार्या लगतच्या मुस्लीम वस्त्यांमध्येही मांडेल का? नाही मांडणार. मग हे सगळे पंढरपूरच्या वारीतच का? अर्थात, वारकर्यांना पंढरीच्या विठुरायाव्यतिरिक्त कसलेच वेध नाहीत आणि वारी पुढे स्वर्गही फिका आहे. ते स्वार्थी धर्मांधांच्या जाळ्यात फसणारच नाहीत. पण, भक्तांना फसवू पाहाणार्या दुष्टांना
बा विठ्ठला पाहातोयस ना ?
योगिता साळवी
9594969638