“रितेश देशमुखच्या रुपात तरुणांना नवीन...” बिग बॉस ५च्या होस्टबद्दल नेहा शितोळेने व्यक्त केलं मत

13 Jul 2024 14:22:26

ritesh deshmukh 
 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
 
मुंबई : मराठी बिग बॉस सीझन दोनचा विजेता शिव ठाकरे झाला होता. पण त्याच्या सोबतीने अभिनेत्री-लेखिका नेहा शितोळे देखील त्याच्यासोबत बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पडली होती. आताही मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन २८ जुलैपासून कलर्स मराठीवर सुरु होणार असून अभिनेता रितेश देशमुख या सीझनचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहे. यावरच आपले मत मांडत अभिनेत्री नेहा शितोळे हिने मांडले आहे. ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा या भागात तिने बिग बॉसच्या घरातील आठवणींना उजाळा देखील दिला होता.
 
अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस सीझन ५ चा होस्ट असणार असून नक्कीच नव्या सीझनमध्ये काहीतरी नवी धमाल पाहायला मिळणार असे नेहा शितोळे म्हणाली. पुढे ती म्हणाली की, “रितेश देशमुख मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनचं होस्टिंग करणार आहे. अर्थात त्यामुळे महेश मांजरेकर यांची खुप आठवण आणि त्यांना मिस करणार आहोत. कारण, महेश मांजरेकर यांच्या रुपाने बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्याला घरातील एक मोठी व्यक्ती, तिचा धाक, दरारा आणि तरीही ती माया हे अनुभवता आलं. मुळात कला हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि समाजात जे घडतं ते कलेच्या माध्यमातून मांडलं जातं. त्यामुळे सध्या समाजात युथफुल एनर्जी दिसून येते. त्यामुळे त्यांना एखादी बाब त्यांच्याच शैलीत समजावून सांगणारी एक व्यक्ती म्हणून तरुणांचं प्रतिनिधित्व रितेश देशमुख या सीझनमध्ये करेल. रितेश देशमुख हा सुसंस्कृत कुटुंबातील व्यक्ती आणि कलाकार आहे. त्यामुळे जर का ती व्यक्ती नव्या स्पर्धकांना काही चार गोष्टी समजूतीच्या सांगत असेल तर त्यात काही हरकत नसावी”.
 
दरम्यान, नेहा शितोळे हिने नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटातील अभिनेता कमल हासन यांच्या भोवती फिरणारा एक छोटा सीन लिहिला होता. तसेच, सध्या ती आगामी काही चित्रपटांच्या लेखनातही व्यस्त आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0