विधानपरिषद निवडणूकीचं संपूर्ण गणित!

13 Jul 2024 19:01:13
 
Election
 
एकीकडे राज्यात विधिमंडळ पावसाळी अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे विधानपरिषदेतील ११ रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीचीही तयारी सुरु झालीये. लोकसभेप्रमाणे निश्चितच विधानपरिषदेची निवडणूकही महायूती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे. या निवडणूकीकरिता महायूती आणि महाविकास आघाडीने आपले उमेदवारही दिलेत. सुरुवातीला या निवडणूकीकरिता महायूतीने ९ उमेदवार तर महाविकास आघाडीने २ उमेदवार दिले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, महाविकास आघाडीने एक अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. त्यामुळे यूती आणि आघाडीतील घटक पक्षांच्या आमदारांचं संख्याबळ पाहता कुणाचं पारडं जड आहे? आणि निवडणूकीत त्यांना आपल्या मित्रपक्षांचं किती पाठबळ मिळणार? याबद्दल जाणून घेऊया.
 
विधान परिषदेच्या ११ सदस्यांची मुदत २७ जुलै संपत आहे. येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेतील या ११ रिक्त जागांसाठी निवडणूक होणारे. या निवडणूकीसाठी भाजपने पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी घोषित केलीये. शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तर राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे मैदानात आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी दिलीये. तर, उबाठा गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शेकापच्या जयंत पाटील यांनीही अर्ज दाखल केलाय. जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठींबा दिलाय. याशिवाय दोन अपक्ष उमेदवारसुद्धा या निवडणूकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत.
 
उद्या म्हणजेच ५ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने ही निवडणून बिनविरोध होणार की, चुरशीची हे स्पष्ट होणारे. निवडणूक चुरशीची झाल्यास पुन्हा एकदा महायूती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. विधानपरिषदेत जाणारे सर्व ११ सदस्य हे विधानसभेच्या आमदारांद्वारे निवडले जातात. सध्या विधानसभेत भाजपचे १०३, शिवसेना ३७ आणि राष्ट्रवादीचे ३९ आमदार आहेत.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेसचे ३७, उबाठा गटाचे १५ आणि शरद पवार गटाचे १३ असे एकूण ६५ आमदार आहेत. त्यामुळे या संख्याबळानुसार, महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ आमदार सहज निवडून येऊ शकतील, असं चित्र होतं. परंतू, महाविकास आघाडीने अतिरिक्त उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची होणारे. त्यामुळे या निवडणूकीत इतर छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणारे.
 
या निवडणूकीतील मुख्य बाब म्हणजे हे मतदान गुप्त पद्धतीने होत असतं. त्यामुळे या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवली जाते. सध्या विधानसभेत आमदारांचं संख्याबळ २७४ इतकं आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी २३ मतांची गरज आहे.
 
महायुतीकडे राज्यातील इतर छोट्या पक्षांचे ९ आणि १३ अपक्ष असे मिळून एकूण २०१ आमदारांचं बळ आहे. तर महाविकास आघाडीकडे शेकाप आणि अपक्ष मिळून ६५ आमदार त्यांच्या पाठीशी आहेत. आघाडीला आपले तीनही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची गरज आहे. त्यामुळे इतर छोटे पक्ष आणि अपक्षांवर त्यांची मदार आहे. उबाठा आणि शरद पवार गटाची एकत्रित मते मिळवून मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील या दोघांपैकी एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे नेमकी कुणाची विकेट जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0