शरद पवारांची खेळी अंगलट! शेकापचा गेम

13 Jul 2024 19:13:31
 
Pawar
 
लोकसभेच्या विजयाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीने पदरात पुरेसे संख्याबळ नसताना विधान परिषदेच्या निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार उतरवला. महायुतीचे, विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार गळाला लागतील, या आशेने शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली ही चाल खेळली गेली. विधिमंडळ राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेले शेतकरी कामकाज पक्षाचे जयंत पाटील एकीकडे, तर सर्वपक्षीय संबंध गाठीशी असलेले मिलिंद नार्वेकर दुसरीकडे. विधानसभेत शेकापचे नामोनिशाण नसताना, जयंत पाटलांनी अनेकदा विधान परिषदेवर निवडून येण्याची किमया साधली. त्यामुळे यावेळेस महायुतीचा पराभव अटळ असल्याचे आडाखे दिग्गज विश्लेषकांनी बांधले. मात्र, गणितीय राजकारणात माहीर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अचूक डाव टाकत महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला. विधानपरिषदेत महायूतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आणि शरद पवारांनी पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने आणि विशेषत: शरद पवारांनी जयंत पाटलांचा गेम केला का? आणि जयंत पाटलांच्या बाबतीत नेमकं काय घडलं? हे आपण जाणून घेऊया.
 
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपने पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरवले होते. तर शिवसेनेने भावना गवळी व कृपाल तुमाणे आणि राष्ट्रवादीने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेसने प्रज्ञा सातव आणि उबाठा गटाने गटाने मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली होती. याशिवाय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हेसुद्धा मैदानात होते. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा जाहीर केला होता.
 
विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पण विधानपरिषदेत गुप्त मतदान असल्याने मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता असते. त्यात महाविकास आघाडीने संख्याबळ नसतानाही एक अतिरिक्त उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक निश्चितच चुरशीची झाली होती. त्यामुळे यात कुणाचातरी गेम होणार हे निश्चित होतं आणि तसंच झालं. शेकापच्या जयंत पाटलांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
 
या निवडणूकीकरिता भाजपचे १०३, शिवसेनेचे ३७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३९ आणि इतर काही अपक्ष आमदार महायुतीच्या बाजूने होते. त्यामुळे अंदाजे २०० आमदारांचा महायुतीला पाठिंबा होता. तर दुसरीकडे उबाठा गटाकडे १५, काँग्रेसकडे ३७ आणि शरद पवार गटाकडे १३ आमदार होते. अशावेळी संख्याबळानुसार भाजपचे ५, शिवसेननेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आमदार हमखास निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
 
तर महाविकास आघाडीमध्ये केवळ काँग्रेसकडे १४ अतिरिक्त मतं होती. त्यांनी स्वतःच्या उमेदावाराला निर्धारित कोट्यापेक्षा अधिकची दोन मतं राखून ठेवल्यामुळे त्यांच्याकडे १२ मतं शिल्लक राहिली. त्यातील ९ मते मिलिंद नार्वेकरांना तर ६ मतं जयंत पाटील यांना देण्याचं ठरलं. उबाठा गटाची १५ आणि काँग्रेसची ९ मतं मिळून मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी पहिल्या पसंतीच्या २४ मतांची जुळवणी करण्यात आली. परंतू, नार्वेकरांची गाडी २२ वर अडकली. जयंत पाटील यांच्यासाठी शरद पवार गटाची १३ अधिक शेकाप १, काँग्रेस ६ आणि अपक्षांची मिळून २३ मते जुळवण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र मिलींद नार्वेकरांकडे जाणारी दोन मतं आणि जयंत पाटलांसाठी राखीव असलेली काँग्रेसची सर्व सहा मतं फुटली. विशेष म्हणजे शरद पवार गटाच्या दोन मतांनीही वाऱ्याची दिशा बदलल्यानं जयंत पाटील यांना मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. जयंत पाटलांना १२ मतं मिळाली आणि शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.
 
याऊलट भाजपच्या पाचही उमेदवारांनी तीन अतिरिक्त मतं घेत दणदणीत विजय मिळवला. २०२२ च्या विधान परिषद निवडणुकीतील पराभवाचा बदला घेऊन देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याची विशेषतः पवार आणि ठाकरेंची रणनीती होती. परंतू, लोकसभेला मिळालेल्या यशामुळं महायुतीमधील अनेक आमदार आपल्यासोबत येतील, ही त्यांची धारणा फोल ठरली. शिवाय जयंत पाटलांच्या पराभवानंतर त्यांनी शरद पवारांचं एक मत फुटल्याचाही दावा केलाय. त्यामुळे शरद पवारांनी रचलेल्या डावात जयंत पाटलांचा नाहक बळी गेला.
 
 
Powered By Sangraha 9.0