काँग्रेस स्वबळावर विधानसभा लढवणार?

13 Jul 2024 19:07:45
 
Patole
 
एकीकडे राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे तर दुसरीकडे, सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणूकीचे वेध लागलेत. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने अनेकांनी निवडणूकीची तयारीही सुरु केलीये. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकदेखील महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असताना आता काँग्रेसने एक गुगली टाकलीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा एक संभ्रम निर्माण करणारं वक्तव्य केल्याने सर्वत्र चर्चांणा उधाण आलंय. आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस सर्व जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. त्यामुळे आता साहाजिकच महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तर लोकसभेतील विजयाने हुरळून गेलेली काँग्रेस विधानसभेत खरंच स्वबळावर लढणार का? आणि स्वबळावर लढणं काँग्रेसला फायद्याचं ठरेल की, जड जाईल? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
 
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला ३० जागांवर विजय मिळाला. त्यामुळे लोकसभेतील विजयाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभेचीही तयारी सुरु केल्याचं समजतंय. लोकसभेत महाविकास आघाडीच्या जागावाटपात उबाठा गटाने सर्वाधिक म्हणजे २१ जागा लढवल्या. तर काँग्रेसने १७ आणि शरद पवार गटाने १० जागा लढवल्या होत्या. यापैकी काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. तर उबाठा गटाने २१ पैकी ९ आणि शरद पवार गटाने १० पैकी ८ जागा जिंकल्या. त्यामुळे या निकालानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कायमच मित्रपक्षांना डिवचणारी वक्तव्य करताना दिसले, असो...
 
पण आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि नाना पटोलेंचं चर्चेत येण्याचं कारण मात्र वेगळंच आहे. आम्ही विधानसभेच्या सर्व जागांवर लढणार असल्याचं पटोलेंनी म्हटलंय. माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, " प्रत्येक ठिकाणी पक्षसंघटनेचं संघटनात्मक काम असायला हवं. तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असायला हवा. त्यादृष्टीने आम्ही २८८ जागांवर उमेदवारीची मागणी केली आहे. जागावाटपामध्ये मेरिटच्या आधारावर ज्या ज्या जागा सुटतील त्याप्रमाणे आमची आघाडी होणार आहे. त्यामुळे तयारी करणं काही चुकीचं नाही. आमच्या सगळ्या आघाड्यांनी त्या पद्धतीने तयारी करणं सुरु केलंय," असं म्हणत त्यांनी एकप्रकारे स्वबळावर लढण्याचा इशारा दिला का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.
 
पण काँग्रेसला स्वबळावर लढणं खरंच फायद्याचं ठरेल का? २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने ४८ जागांपैकी केवळ एक जागा जिंकून आपलं खातं उघडलं होतं. याऊलट भाजपने २३, शिवसेनेने १८, राष्ट्रवादी काँग्रेसने ५ आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला होता. मात्र, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन गट झाल्याने यावर्षीच्या लोकसभेचं चित्र फार वेगळं होतं. यावेळी काँग्रेस, उबाठा गट आणि शरद पवार गटाने एकत्र येत महाविकास आघाडी म्हणून निवडणूका लढवल्या. यात काँग्रेसने १३ जागांवर विजय मिळवला. पण निश्चितच यूतीमध्ये असल्याने काँग्रेसला हा विजय मिळाल्याचं राजकीय जाणकार सांगतात. यावेळी उबाठा आणि शरद पवार गटाची सहानुभूती काँग्रेसच्या पथ्यावर पडल्याचं दिसतंय. त्यात आता विधानसभेत स्वबळावर लढणं काँग्रेसला कितपत परवडणार आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. एकीकडे आम्ही आगामी निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत असं म्हणणं आणि दुसरीकडे, एकट्या काँग्रेसने सर्व जागांवर लढण्याची तयारी दर्शवणं, या दोन्ही गोष्टींत मोठा विरोधाभास दिसून येतोय. त्यामुळे पटोलेंच्या या वक्तव्याने मविआत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये.
 
एवढंच नाही तर, गेल्या काही वर्षात काँग्रेसची देशभरात वाताहत झालीये. हिंदुवुरोधी भूमिका, जातपात आणि भावनिक राजकारण यामुळे काँग्रेस सध्या अस्तित्वाची लढाई लढतीये. शिवाय मागच्या काही दिवसांत राज्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. यासाठी राज्याचं नेतृत्व म्हणजेच नाना पटोलेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय. शिवाय नाना पटोले महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना कायमच डिवचताना दिसतात. त्यात आता त्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलाय. त्यामुळे काँग्रेसच्या या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा परिणाम होऊ शकतो. या सगळ्यामुळे आगामी निवडणूकीत महाविकास आघाडीची भूमिका काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
 
 
 
Powered By Sangraha 9.0