लंडनमधील वाघनखे शिवरायांचीच!

11 Jul 2024 17:12:05

Sudhir mundatiwar
मुंबई : लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ मध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत. याच वाघनखांनी शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, असे सांगून सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘वाघनखे शिवरायांची आहेत कि नाहीत?’ या वादाला शासनाच्या वतीने पूर्णविराम दिला. दि. १९ जुलै रोजी राज्यशासनाच्या सातारा येथील संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनाकरता ठेवण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ मध्ये असलेली वाघनखे शिवरायांची नसल्याचे वक्तव्य केले होते.
 
आमदार रणधीर सावरकर यांनी माहितीच्या सूत्राच्या अंतर्गत (पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन) सरकारने याविषयी निवेदन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर याविषयी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे जगासाठी आदर्श राजकर्ते आहेत. महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा काढला, तेथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यासाठी अनेक शिवभक्तांनी शासनाला निवेदन दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला.
 
या शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवले. ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ मध्ये असलेली वाघनखे शिवरायांचीच असल्याचे काही संदर्भ शिवप्रेमींनी शासनाला दिले आहेत. ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’च्या संकेतस्थळावरही ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे संदर्भ देण्यात आले आहेत. १८ व्या शतकातही ही वाघनखे छत्रपती शिवरायांची असल्याची वृत्ते ब्रिटनमधील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ही वाघनखे मिळावीत, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारताचे पंतप्रधान, ब्रिटनचे पंतप्रधान आणि ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ यांच्याशी पत्रव्यवहार केला.
 
प्रथम ही वाघनखे १ वर्षासाठी देण्यात येणार होती; मात्र त्यानंतर ३ वर्षाकरता देण्याचा निर्णय ‘व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअम’ने घेतला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांमधील ९९ टक्के जणांनीही ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचे मान्य केले आहे. त्यांना याविषयी शंका असेल, त्यांनी राज्यशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले. वाघनखे आणण्यासाठी किती खर्च झाला?शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडे देण्यात आले, अशी चर्चा झाली; मात्र वाघनखे आणण्यासाठी एकही पैशाचे भाडे देण्यात आलेले नाही आणि यासाठी कुणी भाडे मागितलेही नाही.
 
वाघनखे आणण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे म्हटले गेले; मात्र एका दिवसाच्या जाण्या-येण्याचा १४ लाख ८ हजार रुपये इतकाच खर्च झाला आहे. वाघनखे ठेवण्यासाठी ७ कोटी खर्च येणार आहे, असे म्हटले जात आहे; मात्र हा खर्च ज्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रे ठेवण्यात येणार आहेत, त्या संग्रहालयाच्या डागडुजीचा आहे. वर्ष २०२३ हे शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष नसल्याचे म्हटले गेले. याचा अभ्यास करूनच वर्ष २०२३ मध्ये २ ते ६ जून या कालावधीत शिवरायांचा ३५० वा राज्याभिषेक साजरा करण्यात आला. वर्ष २०२४ हे शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५१ वे वर्ष आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
 
शिवराज्याभिषेकाची पुस्तिका प्रसिद्ध करणार
दि. १९ जुलै रोजी सातारा येथील संग्रहालयात सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन घेता येणार आहे. या दिवशी छत्रपतची शिवाजी महाराजांचे वंशज, सरदार आणि त्यांच्या वंशजांना निमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या संग्रहालयाचे उद्घाटनही या वेळी होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे आदर्श राजे होते. शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने त्यांची थोरवी सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम आम्ही केले. लवकरच शिवराज्याभिषेकाची माहिती देणारी पुस्तिका शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0