भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे बेलापूरमध्ये उत्साहात उद्घाटन

11 Jul 2024 17:59:55
भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे बेलापूरमध्ये उत्साहात उद्घाटन 
 
भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे बेलापूरमध्ये उत्साहात उद्घाटन
कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती
नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या बेलापूर सेक्टर 15 येथील भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी स्थायी समिती सभापती डॉक्टर जयाजी नाथ, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शीर्के, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते भगवानराव ढाकणे, सी व्ही रेड्डी, गोपाळराव गायकवाड, आदी मान्यवरांसह संपूर्ण बेलापूर विधानसभा क्षेत्रातून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक, युवा, महिला, स्थानिक पक्षाची जिल्हा कार्यकारणी, मोर्चा सेल, मंडळ, प्रकोष्ट स्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेलापूर मध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू झाल्याने या सर्वांनी आनंद व्यक्त केला. बेलापूर मध्ये जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता होती, अशा प्रतिक्रिया यावेळी देण्यात आल्या.
 
उद्घाटन प्रसंगी प्रस्तावना करताना जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या शुभहस्ते भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कोरोनाच्या संकटात नवी मुंबईकर आणि नवी मुंबई शहराचे संरक्षण करण्यासाठी लोकनेते आमदार नाईक पुढे आले आणि त्यांनी प्रशासनाकडून जनतेच्या हिताची आवश्यक कामे करून घेतली. लोकनेते आमदार नाईक यांच्यासमवेत सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने कोरोना काळात जनतेची सेवा केली. आपल्या जिल्हाध्यक्ष पदाला लवकरच एक वर्ष पूर्ण होत असून या एक वर्षाच्या कालावधीमध्ये पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या केवळ पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या खंबीर साथीमुळे पूर्ण करू शकल्याची भावना जिल्हाध्यक्ष नाईक यांनी व्यक्त केली. बेलापूरमध्ये भाजपा जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता होती. हे कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असून यापासून हाकेच्या अंतरावर नवी मुंबई महापालिका मुख्यालय, कोकण भवन, पोलीस आयुक्त कार्यालय आणि सिडको महामंडळाचे कार्यालय आहे. त्यामुळे या कार्यालयाशी संबंधित नागरिकांचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडविता येणार आहेत.
 
बेलापूरचे हे कार्यालय जिल्हाध्यक्ष म्हणून माझे नाही किंवा फक्त पक्षाचेही नाही हे कार्यालय सर्व कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे हे कार्यालय हक्काचे ठिकाण बनेल असा विश्वास व्यक्त करून जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी एवढ्या मोठ्या संख्येने जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेले कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनतेचे आभार व्यक्त करत आपल्या कार्याला बळ दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
 
लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे श्रेय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जाते असे नमूद करून पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी दिलेल्या निस्वार्थी योगदानाबद्दल त्यांचा नेहमी आदर करा, असा सल्ला दिला. 25 वर्षाच्या महापालिकेतील सत्ता काळामध्ये आपण तीन वेळाही महापालिका मुख्यालयात गेलो नाही परंतु कोरोना काळात लोकहितासाठी 79 वेळा महापालिकेत गेलो. महापालिका आयुक्तांबरोबर आजवर घेतलेल्या बैठकांमधून जन सामान्यांचे प्रश्न सुटले. लवकरच जनसंवाद हा उपक्रमही सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहनही लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
अवतरण....
 
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम सुरू आहे. भविष्यात हे काम अधिक जोमाने करणार आहे. बेलापूरचे जनसंपर्क कार्यालय जनसामान्यांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे हक्काचे ठिकाण बनेल.
 
- संदीप नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष
 
 
Powered By Sangraha 9.0