'क्यूआर कोड' मुळे कळणार डॉक्टरांची माहिती!

11 Jul 2024 18:41:36

Q.R
मुंबई : बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना आता क्यूआर कोड देण्यात येणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केला की संबधित डॉक्टराची संपुर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टर खरा आहे की बोगस हे रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लगेच कळू शकेल. बोगस डॉक्टरांमुळे अनेकदा वैद्यकीय क्षेत्राची बदनामी होते. बोगस डॉक्टरांबद्दल अनेकदा महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रारी आल्या होत्या त्यामुळेच हा उपक्रम राबवला जाणार आहे.
 
मुळात बोगसगिरीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एक समिती प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असते. मात्र तरीही बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघडकीस येतात. त्यामुळे 'आपल्या डॉक्टराला ओळखा' हा उपक्रम राबवून प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांना क्यूआर कोड दिला जाणार आहे. त्यासोबतच एक वेगळे अॅप देखील बनवण्यात येणार आहे. सध्या १ लाख ९० हजाराहून अधिक डॉक्टर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य आहेत. तरी क्यूआर कोडमुळे डॉक्टरांची माहिती, शिक्षण इत्यादी बाबी रुग्णांना माहिती पडतील. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0