दिल्ली दारू घोटाळ्यातून कमावलेल्या पैशाचा गोवाच्या निवडणुकीत वापर? ईडीच्या खुलाशाने केजरीवालांच्या अडचणी वाढल्या

11 Jul 2024 13:37:06
 kejriwal
 
नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने बुधवार, दि. १० जुलै २०२४ अरविंद केजरीवाल यांची दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात त्यांच्या जामीन याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची विनंती नाकारली. यापूर्वी उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना ट्रायल कोर्टातून दिलेला जामीन रद्द केला होता. याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, ज्याची न्यायालयाने दखल घेतली आहे.
 
या आरोपपत्रात काय आहे याबाबत इंडिया टुडेच्या वृत्तात अनेक खुलासे झाले आहेत. अहवालानुसार, ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे की दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात १०० कोटी रुपयांची लाच घेण्यात आली होती, त्यापैकी ४५ कोटी रुपयांचा थेट फायदा आम आदमी पक्षाला झाला. हा पैसा हवालाद्वारे गोव्यात पाठवण्यात आला आणि त्यानंतर निवडणूक प्रचारात वापरण्यात आला.
 
आरोपपत्रानुसार, केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने गुन्ह्यातील ४५ कोटी रुपये पक्षाच्या प्रचारासाठी वापरले आणि ही वस्तुस्थिती लपविण्याच्या कारवायांमध्ये गुंतले आहेत. आरोपपत्रात ईडीने अरविंद केजरीवाल यांचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून घेतले असून त्यांना आरोपी क्रमांक ३७ बनवले आहे.
 
रिपोर्टनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरोपी विनोद चौहान यांच्या व्हॉट्सॲप चॅटची संपूर्ण माहिती दिली. बीआरएस नेते के कविता यांचे पीए विनोद यांच्या माध्यमातून गोवा निवडणुकीत आम आदमी पार्टीला २५.५ कोटी रुपये पाठवल्याचा आरोप आहे. विनोद चौहान यांचे अरविंद केजरीवाल यांच्याशी चांगले संबंध असल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे.
 
आरोपी विनोद चौहानच्या मोबाईल फोनमधून हवाला नोट नंबरचे अनेक स्क्रीनशॉट जप्त करण्यात आल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे. विनोद चौहान हा गुन्ह्यातील रक्कम दिल्लीहून गोव्यात हवालाद्वारे हस्तांतरित करत असल्याचे या स्क्रीनशॉट्समधून दिसून येत आहे. चरणप्रीत सिंग तिथे त्या पैशाची व्यवस्था करत होता.
  
ईडीने आरोपपत्रात त्याचा जवाबही नोंदवला आहे. यासोबतच विजय नायर याचीही या प्रकरणात महत्त्वाची भूमिका असल्याचे अंमलबजावणी संचालनालयाने आरोपपत्रात नमूद केले आहे. या प्रकरणात तो केजरीवाल यांच्या सूचनेनुसार काम करत होता. मात्र, या प्रकरणात अडकल्यानंतर नायर यांनी हा सारा खेळ अरविंद केजरीवालच चालवत असल्याचे सांगितले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0