मृत्यूचे रहस्य

10 Jul 2024 21:57:18
mrutyu rahasya


योगनिद्रा वा अवयवध्यान

पायाच्या बोटांपासून प्रत्येक अवयवावर क्रमश: थोडा वेळ ध्यान करीत डोक्यापर्यंत नेल्यास योगनिद्रा साधली जाऊ शकते. योगनिद्रेमुळे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक असे सर्व प्रकारचे लाभ होतात.


शारीरिक लाभ

प्रत्येक अवयवावर पूर्ण ध्यान दिल्याने आवश्यक तेवढ्या प्रमाणात त्या-त्या अवयवांमध्ये रक्तपुरवठा होऊन तेथील अनियमितता व रोग आपोआप नाहीसे होऊ लागतात. शेवटी, काही दिवसांनी शरीर पूर्ण निरोगी व प्रकृतिस्थ होते. योगनिद्रेने आम्लविकार, मधुमेह, रक्तदाब (उच्च व कमी) हृदयरोग, मूत्रविकार, यकृतविकार, मेंदूचे विकार, मस्तकपीडा, स्मिृतभ्रंश, अति खाणे, निद्रानाश, अतिनिद्रा, थकवा येणे, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता, बुद्धीशी संबंधित मूढता, विस्मरण, क्रोध, चिडचिड, घबराट, चांचल्य, स्थूलता आदी विकार नष्ट होऊ शकतात. आहार आपोआप कमी झाल्याने शरीर प्रमाणबद्ध व निरोगी राहते. शरीर व मन प्राकृतिक बनते.


मानसिक लाभ

ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे किंवा झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, त्यांच्यासाठी तर योगनिद्रा प्रयोगसिद्ध वरदान आहे. या उलट ज्यांना खूप जास्त झोप येते, त्यांची योगनिद्रेने निद्रा कमी होते, आहार कमी होतो, इच्छा कमी होतात. शरीरामध्ये खूप तरतरी येऊन दिवसभर शरीर चैतन्यमय राहते. झोप कमी, पण आवश्यक तेवढी पूर्ण झाल्याने काम करण्यास व साधना करण्यास वेळ मिळतो. विचार व अवाजवी इच्छा कमी झाल्याने मनाला शांती, समाधान व तृप्ती मिळते. मन अतिशय मजबूत होते, एकाग्रता व मनःशक्ती वाढते. दुबळ्या मनामुळे निर्माण होणारे त्रास व समस्या कमी होऊन 24 तास मन प्रफुल्लित राहते. कामामध्ये एकाग्रता वाढते. ज्याची आज प्रत्येक क्षेत्रात आवश्यकता भासते. गृहिणींपासून वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनाच एकाग्रतेची आवश्यकता आहे. अधिक जोम व शक्ती प्राप्त झाल्याने कार्यक्षमता वाढते. तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होते. स्मरणशक्ती वाढते. निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. ज्यांच्या एका निर्णयावर कोणाचे भवितव्य अवलंबून असेल, अशा निर्णय घेणार्‍या व्यक्तींना अचूक व न्यायपूर्ण निर्णय घेण्याची विलक्षण शक्ती प्राप्त होते. मन शांत व मजबूत झाल्याने माणूस व्यसनी असल्यास पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो. जातीधर्माच्या संकुचित भावना नष्ट होऊन मन विशालविशाल बनते. व्यसनी असल्यास व्यक्ती पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकते. प्रेम व परोपकाराची भावना वाढीस लागते.


आध्यात्मिक लाभ

योगनिद्रेच्या नियमित अभ्यासाने मी जड शरीर नसून त्या पलीकडील चैतन्य, निष्कल असा मी आत्मा आहे, ही मनाची निश्चिती होते. कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृती म्हणजे संस्कारात बदल झाल्यामुळे शरीरात होणारे बदल होय. त्यात घाबरायचे काही कारण नाही. साधक आत्मज्ञानप्राप्ती होऊन योगी बनतो. योगनिद्रेच्या अभ्यासाबरोबर प्राणायामाचा अभ्यास करून मार्गदर्शनाने केवल कुंभक साधल्यास शवासन साधू शकेल व जीवात्मा शरीराबाहेर पडून स्वत.चे शरीर पाहू शकतो.



योगनिद्रा कधी व कशी करावी?

सकाळी उठल्यावर शौचमुखमार्जन करून प्रथम इष्टदेवतेचे वा गुरूंचे ध्यान करून प्रार्थना करावी. आधी षट्चक्रभेदन (ध्यान) करून मग योगनिद्रा प्रक्रियेला आरंभ करावा. योगनिद्रा रिकाम्या पोटीच करावी. योगनिद्रेसाठी आसन म्हणजे जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धूत वस्त्र टाकून पाठीवर उताणे झोपावे. पायांच्या टाचा जोडलेल्या व बोटे दूर, दोन्ही हात मांड्यांना चिकटलेले परंतु तळहात वर आकाशाकडे वळविलेले असावेत. डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे वा उजवीकडे कलते ठेवायला हरकत नाही. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ न देता पूर्ण शरीर सैल सोडावे. त्यानंतर अवयवध्यान सुरू करावे, मनात अन्य कुठलेही विचार येऊ न देता मनाचे पूर्ण एकत्रीकरण एकेका अवयवावर करावे. प्रत्येक अवयवावर स्पंदने जाणवतील व त्या स्पंदनांवर ध्यान एकाग्र होईल. प्रयत्नाने हळूहळू हे निश्चित साध्य होईल. योगनिद्रा करताना शरीराचा कोणताही भाग अंथरलेल्या आसनाबाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी. डोक्याखाली उशी घेऊ नये. काही दिवसांच्या अभ्यासानंतर योगनिद्रा लागते. योगनिद्रा आटोपल्यानंतर उठताना डावीकडे वळून सावकाश उठून बसावे. जर योगनिद्रा लागली व स्वतःहून उठायचे भान न राहिल्यास इतरांनी साधकाला स्पर्श करू नये, केवळ हाका मारून उठवावे.


योगनिद्रा लागली हे कसे ओळखावे?

जीवात्मा जागृत व शरीर झोपलेले, अशी अवस्था आली म्हणजे योगनिद्रा लागली, हे योगनिद्रा करणार्‍यास स्वतः समजू शकते, आपले घोरणे आपण स्वतः ऐकू शकतो. ही अवस्था येण्यास प्रत्येकाच्या क्षमतेनुसार कमीअधिक वेळ लागू शकतो. मात्र, इतर साधनांमुळे येणार्‍या अनुभवांपेक्षा हा अनुभव तुलनेने लवकर व निश्चितपणे येतो, असा सर्वांचा अनुभव आहे. शरीराच्या मायेपासून पूर्ण मुक्त होऊन मृत्यूची भीती नष्ट होते. हा लाभ कायम टिकवण्यासाठी रोज योगनिद्रा करणे आवश्यक आहे.


अवयवांची नावे याप्रमाणे आहेत.

उजवा पाय - उजव्या पायाचा अंगठा, तर्जनी (अंगठ्याजवळचे बोट), मध्यमा (मधले बोट), अनामिका, कनिष्ठिका (करंगळी), उजवा तळपाय, उजवी टाच, उजवा घोटा, उजवी पोटरी, उजवा गुडघा, उजवी मांडी व उजवी कंबर.

डावा पाय - वरीलप्रमाणे डाव्या पायाच्या अंगठ्यापासून डाव्या कंबरेपर्यंत.

उजवा हात - उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठिका, उजवा तळहात, उजवे मनगट, प्रकोष्ठ (मनगट व कोपर याच्या मधला भाग) उजवे कोपर, उजवा बाहू (दंड) व उजवा खांदा.

डावा हात - वरीलप्रमाणेच डाव्या हाताच्या अंगठ्यापासून डाव्या खांद्यापर्यंत.

मुख्य शरीर - मूलाधारचक्र (गुदद्वाराच्यावर शिवणीच्या ठिकाणी), नाभी, उदर (पोट), हृदय, उजवी छाती, डावी छाती, कंठ, हनुवटी, मुख, नाक, उजवा गाल, डावा गाल, उजवा कान, डावा कान, उजवा डोळा, डावा डोळा, भ्रूमध्य, कपाळ आणि शेवटी सहस्रार (जन्मलेल्या मुलाच्या डोक्याला जिथे हाड नसते तो भाग), याप्रमाणे उजव्या पायाच्या अंगठ्यापासून क्रमागत प्रत्येक अवयवाचे (सुमारे पाच सेकंद ) ध्यान करून शेवटी सहस्रार चक्रावर ध्यानस्त झाल्याने आपोआप योगनिद्रा लागते. योगनिद्रा व षटचक्र भेदन (ध्यान) यांचे ध्वनिफीत ’तरळवळज्ञ र्ींळीहुर’ या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

मानवाच्या सार्‍या दुःखाचे मूळ देहबुद्धीत आहे, असेच सर्व संतमंडळी सांगतात. ‘मी देह आहे’ या भावनेपासून सुरुवात करून ’मी ब्रह्म आहे’ या दिव्य भावनेतून स्थिर होण्याची क्रिया म्हणजे माणसाच्या अंतरंगातील प्रवासच आहे. हरिॐ तत्सत.
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)

योगिराज हरकरे
9702937357
Powered By Sangraha 9.0