दयावंतांचा सद्गुण-परिमळ,करी नित्य विशुद्ध भूमंडळ!

10 Jul 2024 22:04:01
human mind


सध्याच्या काळात वातावरणातील प्रदूषणाबरोबर मानवी मनाचे प्रदूषण हा एक महत्त्वाचा विषय आहे. सभोवतालचे प्रदूषण कमी करायचे असल्यास, आपल्याला आधी स्वत:ला सर्वार्थाने शुद्ध करावे लागेल. त्यासाठी मानवाला स्वत:मधील अविचारांचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाच्या प्रकाशाचा आधार घ्यावाच लागेल. त्याचवेळी मानवी मनातील अविचारांचे प्रदूषण संपेल, ते कसे याचा या लेखातून केलेला उहापोह..
नू मर्तो दयते सनिष्यन्
यो विष्णव उरु गायाय दाशत्।
प्र य: सत्राचा मनसा यजात
एतावन्तं नर्यम् आ विवासात्॥
(ऋग्वेद-7/100/1)

अन्वयार्थ

(य: )जो (सन् इष्यन्) देण्याच्या, त्याग करण्याच्या इच्छेने (दयते ) जगावर दया करतो, (स: मर्त:) अशा मानवाने, श्रेष्ठ सत्पुरुषाने (एतावन्तं नर्यम्) एवढ्या अधिक- सकल नरांना, अखिल मानव समाजाला (नु) निश्चितच, लवकरच (आ+विवासात् ) पूर्णपणे सुगंधित करावे. (य:) ज्याने की (उरु+गायाय ) बहुस्तुत अशा (विष्णवे) सर्वव्यापक अशा विष्णू भगवंताप्रती (दाशत्) समर्पित व्हावे.( य:) असा जो की (सत्राचा मनसा) सत्यनिष्ठ मनाने (प्र+ यजाते) निरंतर उत्कटतेने , तत्परतेने यजन करतो, अनवरतपणे साधना करतो, त्यानेच जगाला सुगंध द्यावा.

विवेचन :

आज सारे जग नानाविध दुर्गंधांनी ग्रसित झाले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे केवळ मानवाचेच नव्हे तर, पशु-पक्षी व किड्या- मुंग्यांचेही जगणे असह्य झाले आहे. प्रदूषणाचा हा महाभयंकर भस्मासुर इतके उग्ररूप धारण करतोय की, यामुळे आज सारे भूमंडळ भयाक्रांत झाले आहे. पृथ्वी, पवन, पाणी, पावक, पोकळी या पंच तत्त्वांना बसलेला प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस तितकाच घट्ट होतोय. सृष्टीतील सर्व जड व चेतन तत्वे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याने, सर्व जीवांवर त्रिविध दुःखांचा वज्रपात होत आहे. याला जबाबदार निसर्ग किंवा इतर प्राणी नसून, फक्त मानवच आहे. आपल्या शारीरिक मल-मूत्रांद्वारे व विपरीत आहार- विहाराच्या उन्मुक्त जीवनशैलीतून, मानवानेच प्रदूषणाचा महापर्वत उभा केला आहे.त्यामुळे एकूणच सृष्टीविनाशाची धोक्याची घंटा, आम्हांस चिंताग्रस्त करतेय. या प्रदूषणाला दूर करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ व वैज्ञानिक नवनवे शोध लावत आहेत, तर वेगवेगळ्या माध्यमाने प्रशासनिक व्यवस्था देखील कार्यरत आहे. इतके होऊन देखील माणूस मात्र पर्यावरणाच्या रक्षणाबाबत दक्ष न राहता ,निसर्गनियमांचे पदोपदी उल्लंघन करतो आहे.

असे हे भयावह प्रदूषण निर्माण होण्याचे कारण बाहेर नसून, आपल्यातच दडले आहे. मानवाच्या अंतरंगात दडलेली अनिष्ट प्रवृत्ती हेच यामागचे मूलभूत कारण आहे. आज माणसाची मने अतिशय प्रदूषित झाली आहेत. त्याच्या अंतरंगात दुर्विचारांचा दुर्गंध इतका साचला आहे की, त्याला दूर करण्यासाठी झटपट औषध निर्माण करणे कठीण झाले आहे. पण या दुष्प्रवृत्तींचे सद्वृत्तीत रूपांतरण होण्याकरिता एकच उपाय आहे, तो म्हणजे सद्विचार ! आचार्य भर्तृहरी म्हणतात-


संसारदीर्घरोगस्य सुविचारो हि महौषधम्!
या संपूर्ण जगाला अविचारांचा दीर्घकालीन महाभयंकर रोग जडला आहे. त्यावर सद्विचार हेच सर्वात मोठे औषध आहे. हे विचार ईश्वरीय पवित्र वाणी वेदांशिवाय अन्य कोठून मिळणार ? सदरील मंत्रात वाढत्या सर्व प्रकारच्या प्रदूषणावर आणि दुर्गंधावर उपाय सांगताना म्हटले आहे-

मर्त: एतावन्तं नर्यम् आविवासात् !
मर्त: म्हणजेच माणूस ! जो नेहमीच जन्ममृत्यूच्या चक्रातून या भूतलावर आवागमन करत असतो, तो मानव ! जो की नेहमी मरणधर्मा आहे, तो माणूस होय. अशा या मानवाचे कर्तव्य आहे की त्याने, या जगातील प्रत्येक मानवाला सर्वार्थाने व शीघ्रगतीने सुगंध प्रदान करावा. हा सुगंध सद्गुणांचा व सद्विचारांचा असावा . जे गुण आपल्याकडे आहेत, ते इतरांना द्यावेत. जे ज्ञान आपल्याकडे आहे, ते इतरांना वितरित करावे. अंतरंगी दडलेल्या अज्ञानामुळे, भ्रमामुळे किंवा अनिष्ट वृत्तीमुळे आज आपल्या परिसरात बाह्य प्रदूषण वाढत आहे. यासाठी या दुर्गंधांना नाहीसे करण्याचा मूलभूत उपाय म्हणजे सुगंध होय. हे कार्य सहजासहजी सोपे नव्हे ! कारण लोकांच्या जीवनात अज्ञान, अविद्या, विकृती, नाना प्रकारच्या अंधश्रद्धा, गैरसमज आणि वाईट सवयी इतक्या घट्टपणे चिकटून बसल्या आहेत की, त्यांना दूर करणे अशक्यप्राय झाले आहे. म्हणून ही विविध दुरितांना दूर करण्याची आणि परिसराला सुगंधित करण्याची जबाबदारी, तथाकथित सुशिक्षितांपेक्षा सदाचारी व शुद्ध अंत:करणे असलेल्या प्रामाणिक संत जनांची व सुधारकांची ! जे स्वतः नाना प्रकारच्या दुर्गंधाने ग्रासलेले आहेत व प्रदूषण वाढविणार्‍यांच्या रांगेत उभे आहेत असे दुर्दैवी पामर, मानव समूहाला प्रदूषणापासून दूर करूच शकत नाही. कारण पात्रता अंगी असलेलेच सुजन असे कार्य करू शकतात. अशा सत्पात्री सत्पुरुषांची गुणवैशिष्ट्ये सांगतांना मंत्रांश अभिव्यक्त होतो -

य: सनिष्यन् दयते,(स:)मर्त: आ- विवासात् !
जो दातृत्व व त्यागाच्या भावनेने सर्वांवर दया करतो, अशा महन्मानवाने सकल मानव समाजाला सर्वदृष्टीने सुगंध प्रदान करावा. प्रत्येक सत्कार्याच्या मुळात दयाभावना असते. म्हणूनच तर दया धर्म का मूल है! असे म्हटले जाते. दयेच्या मुळात देखील, दानशीलता व त्यागाची भावना असली पाहिजे. केवळ मुखाने दया व्यक्त होत नसते. ती प्रत्यक्ष कृतीत उतरली पाहिजे. दु:खी जगाला पाहून अनेक जण दयेच्या गोष्टी करतात. अंतरंगातील कळवळा शब्दांनी व्यक्त करतात. पण प्रत्यक्षमात्र काहीच करीत नाहीत. अशी दया म्हणजे केवळ शाब्दिक जाल होय. संतांच्या हृदयात कृतियुक्त दया दाटलेली असते. म्हणूनच ते आपले समग्र जीवन दीन- दुःखीतांचे दुःख नाहीसे करण्यासाठी अर्पण करतात. यासाठीच तर तुकोबाराय म्हणतात -

धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी!
ज्यांच्या हृदयात दयाभावना अंतर्भूत असते, ते या जगात धन्य मानले जातात. त्यांचे तन-मन-धन हे सर्व काही रंजल्या-गांजल्या दीन-दुखितांसाठी समर्पिलेले असते. त्यांची आर्तवेदना पुढील शब्दात अभिव्यक्त होत असते -

बुडती हे जन न देखवे डोळा,
येतसे कळवळा म्हणोनिया!!
जे जे आपणांकडे आहे, ते ते इतरांना देण्याचा प्रयत्न करावा. त्यागाच्या भावनेतून आपल्याकडील अन्नधान्य,पैसा,ज्ञान,धन,वस्त्रे व इतर वस्तू गरजवंतांना देण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच, दयेला कृतिशीलतेची जोड देणे होय. याहीपेक्षा उत्तमोत्तम आदर्श विचारांचे दान देऊन, अज्ञ समाजबांधवांना ज्ञानतत्त्वांनी सुगंधित करणे, हे अधिक श्रेयस्कर ! कारण शास्त्रात म्हटले आहे-

सर्वदानेषु ब्रह्मदानं विशिष्यते !
असंख्य सत्पुरुषांनी व समाजसेवकांनी अज्ञानाने व अंधश्रद्धेने गांजलेल्या समाजाच्या अंतरंगात, ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली. सत्यज्ञानाने त्यांच्या जीवनात सुगंध निर्माण केला. त्यांच्या अंतरंगातील दया ही, ज्ञानदानाने अभिव्यक्त झाली. म्हणूनच ते खर्‍या अर्थाने प्रदूषणनिवारक ठरले. महर्षी दयानंद सरस्वती यांनी हजारो वर्षांपासून निर्माण झालेले अविद्येचे मेघमंडळ भेदून, वेदांचा पुन्हा प्रकाश केला. यथार्थ सत्यज्ञानाविना अंधारात खितपत पडलेल्या देशबांधवांना, वेदविद्येने सुगंधित करण्याचा प्रयत्न केला. इतरही महापुरुषांनी विश्व सुधारण्याच्या कार्यात आपले जीवन समर्पित केले आहे. अशा महापुरुषांच्या आदर्शांना जीवनाचे अंग बनवत, सर्व प्रकारच्या दानाने व त्यागमय जीवनाने जगाला सुगंधित करून धन्य व्हावे.

जगाला सुगंध प्रदान करणार्‍या सत्पुरुषांचे वैशिष्ट्य सांगताना मंत्रात पुढे म्हटले आहे--

य: उरु गायाय विष्णवे दाशत्!
जो सर्व जगाला सद्विचारांनी व आपल्या सत्कर्मांनी सुगंधित करू इच्छितो, त्याने आपले हे कार्य ईश्वराला समर्पित होऊन करावे. विष्णू म्हणजेच संपूर्ण चराचरात व्यापक असलेला प्रभू परमेश्वर ! त्याचे गुणगान सर्व जीवसमूह सदोदित करतात. यस्य विश्व उपासते! असा तो ईश्वर सर्वांच्या मनात शुभकार्याविषयी सत्प्रेरणा निर्माण करतो. सार्‍या जगाला सर्वदृष्टीने सुगंधित करण्याच्या पवित्र कार्यात, आपल्या भक्तांना नेहमीच शक्ती व सामर्थ्य प्रदान करण्याचे काम तो बहुस्तुत भगवंत करीत असतो. यासाठीच त्याने आपले हे पवित्र कार्य ,ईश्वराला समर्पित करूनच करावे. यामुळे त्याच्या कार्यात नेहमीच सफलता प्राप्त होते.

मानवसेवेचे व्रत धारण करणार्‍या सज्जनां विषयी शेवटी म्हटले आहे,

य: सत्राचा मनसा प्र यजात!
विश्व सुधारणेचे कार्य म्हणजे सेवायज्ञ होय. ज्याप्रमाणे यज्ञात विविध सुगंधित पदार्थांची श्रद्धेने आहुती दिली जाते. त्याप्रमाणे या मांगल्यमय यज्ञात देखील ’सत्राचा’, म्हणजेच पूर्णपणे सत्यनिष्ठा हवी. असत्याचा किंवा स्वार्थाचा थोडाही लवलेश असता कामा नये. त्याबरोबरच ’मनसा’ म्हणजेच तन्मयता हवी ! पवित्र मनाने केले जाणारे कार्य निश्चितच यशस्वी ठरते.
इतकेच नव्हे तर या जागतिक सुगंधीकरणाच्या कार्यात ’प्र’म्हणजेच प्रकृष्टता, उत्कृष्टता किंवा निरंतरता या बाबींचा अंतर्भाव व्हावा. एखादे कार्य हाती घेतले की, ते पूर्ण होण्याकरिता कर्मकुशलता हवी . कौशल्यपूर्ण रीतीने केलेले कार्य, निर्विघ्नपणे पार पडते. तसेच अशा कार्यात उशीर देखील लागतो. फलप्राप्तीसाठी प्रतीक्षा करावी लागते. कारण जगात चांगले रुजणे फार अवघड असते. याउलट वाईट गोष्टी रुजण्यास वेळ लागत नाही. त्या लवकरच फोफावतात. बाह्यप्रदूषण नष्ट होऊन पर्यावरणाचे रक्षण होणे सोपे, पण वैचारिक प्रदूषण नाहीसे होऊन सद्विचारांचा सुगंध दरवळण्यास मात्र फार वेळ लागत असतो. यासाठी सहनशीलता बाळगणे व कर्मफळाची अपेक्षा न ठेवणे, हेच बरे!

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
9420330178
Powered By Sangraha 9.0