सिडकोच्या घरांची प्रतीक्षा संपली

10 Jul 2024 12:56:34

सिडको
 
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई, तळोजा आणि द्रोणागिरी नोडमधील 3 हजार, 322 घरांसाठी सोडत जाहीर करण्यासाठी अखेर सिडकोला मुहूर्त मिळाला आहे. या सोडतीची अर्जदार बराच महिन्यांपासून प्रतीक्षा करीत होते. मात्र, सोडतीची तारीख अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आता सिडकोतर्फे घरांची सोडत मंगळवार, दि. 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सिडको भवनात काढण्यात येणार आहे.
 
याबाबतची माहिती देणारे वृत्त शेअर करत सिडकोने ही माहिती दिली आहे. सिडकोने नवीन वर्षात प्रजासत्ताक दिनी 3 हजार, 322 घरांची विक्री योजना जाहीर केली होती. अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. 16 एप्रिल 2024 होती. त्यानंतर दि. 19 एप्रिल रोजी संगणकीकृत सोडत काढण्यात येणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर दि. 7 जून ही तारीख निश्चित करण्यात आली.
 
पण विधानपरिषदेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही तारीख पुन्हा पुढे ढकलण्यात आली. आता सोडतीची तारीख विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर म्हणजेच दि. 12 जुलैनंतर निश्चित करण्यात आली आहे. सिडकोची सोडत दि. 16 जुलै रोजी होणार आहे. विजेत्यांच्या नावांची यादी सोडतीनंतर त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाईल. अयशस्वी अर्जदारांना दि. 29 जुलै 2024 रोजी ठेव रकमेचा परतावा मिळेल.
 
सिडकोने नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधली आहेत. मुंबईच्या आजूबाजूच्या भागात घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करणे कठीण होत आहे. त्यामुळे सिडको स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देते. सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरी येथील 3 हजार, 322 घरांसाठी लॉटरी काढली आहे.
 
Powered By Sangraha 9.0