मराठा आरक्षणाबाबत मविआचे पुतना मावशीचे प्रेम!

10 Jul 2024 17:41:14
 
MVA
 
मुंबई : मराठा आरक्षणाबाबतचे महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले, अशी टीका भाजप आमदार प्रविण दरेकरांनी केली आहे. मंगळवारी मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. या पार्श्वभूमीवर आता दरेकरांनी विरोधकांवर टिकास्त्र डागले आहे.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाविषयी मार्ग काढावा आणि निर्माण झालेली जातीय तेढ संपवावी, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. मराठा आरक्षण आणि ओबीसी विषय सोडवावा अशी भुमिका उद्धव ठाकरे मांडतात. महाराष्ट्रातील वातावरण सलोख्याचे व्हावे यासाठी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली होती. परंतू, विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते जाणीवपूर्वक या बैठकीला उपस्थित नव्हते. हा प्रश्न असाच भिजत राहावा आणि त्याआधारे महाराष्ट्रात जातीय संघर्ष राहावा, महाराष्ट्र पेटत राहावा, त्या पेटलेल्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजावी, अशा प्रकारचा नीच विचार मविआच्या नेत्यांच्या मनात असल्याचे कालच्या अनुपस्थितीवरुन दिसून आले," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "मराठ्यांबद्दल कळवळा दाखवणाऱ्यांचा जाणीवपूर्वक बैठकीला दांडा का?" शंभुराजे विरोधकांवर बरसले!
 
ते पुढे म्हणाले की, "प्रकाश आंबेडकरांनी विरोधी पक्षांची नेमकी काय भुमिका आहे ती लेखी स्वरूपात मागवा, त्यांचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ द्या, असे बैठकीत सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्व पक्षांकडून लेखी भुमिका मागवण्याचे ठरवले. त्यामुळे आज आम्ही विधानपरिषदेत हा विषय मांडला. काल शरद पवार, उद्धव ठाकरे नेमके का अनुपस्थित होते? काँग्रेसचे नेते का येऊ शकले नाहीत? याचा अर्थ त्यांना हे वातावरण असेच धगधगते राहावे असे वाटून यातून आपला काही स्वार्थ साधता येतोय का?" असा सवाल त्यांनी केला.
 
"काल आणि आज महाराष्ट्रातील जनतेसमोर त्यांचे खरे रूप समोर आले. शरद पवार, उद्धव ठाकरे यांची ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काय भुमिका आहे? यातून काय मार्ग काढायला हवा? हे सांगावे. चर्चेपासून पळ काढू नका. जितके पळाल तितका तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल," असा घणाघातही दरेकरांनी यावेळी केला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0