नाशिककरांचा पंढरपूर प्रवास होणार सुखकर

10 Jul 2024 13:47:13

Bus
 
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आषाढी वारीसाठी नाशिकमधील विविध आगारांतून तब्बल 300 बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रेसाठी नाशिकमधून जाणार्‍या भाविकांची प्रवासाची दगदग टाळण्यासाठी ही विशेष सेवा पुरविली जाणार आहे. आषाढी पंढरपूर यात्रा शनिवार, दि. 13 जुलै ते सोमवार, दि. 22 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीदरम्यान होणार असून यासाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
 
या आगाराच्या कक्षेत पंढरपूर येथे यात्रेला जाण्यासाठी आणि परत आपल्या मूळ गावी परतण्यासाठी ही सेवा पुरविली जाणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. या जादा वाहतुकीसाठी नाशिक विभागामार्फत 300 बसेसचे नियोजन करण्यात आले असून योजनेमुळे महामंडळाच्या तिजोरीत निश्चित भर पडणार आहे. एसटी महामंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे वारकर्‍यांचा प्रवास सुखकर होणार असून विठुरायाच्या दर्शनाची आस पूर्ण होणार आहे.
 
तसेच वृद्धांना या योजनेचा फायदा होणार असून प्रवासादरम्यान होणारी दगदग थांबणार आहे. आषाढी एकादशीला विठूनामाचा जयघोष करत दरवर्षी लाखो भाविक चंद्रभागेच्या तटावर जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाकडून नाशिकच्या विविध आगारांमधून पंढरपूर बससेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दि. 13 ते 22 जुलैदरम्यान 300 जादा बसेस सोडणार भाविकांची प्रवासाची दगदग टाळण्यासाठी पुरविणार सेवा
 
 
Powered By Sangraha 9.0