वाट ‘अरण्यवत’ची; कोकणातील पहिल्या निसर्ग निर्वाचन केंद्राबद्दल...

01 Jul 2024 13:12:50
aranyavat


कोकणात वन्यजीवांबद्दलची जनजागृती व्हावी आणि लोकशिक्षणामधून वन्यजीवांबद्दल गैरसमज दूर व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या कोकणातील पहिल्या निसर्ग निर्वाचन केंद्राबद्दल....



कोकण आणि वन्यजीवन हे नातं दृढ आहे. मात्र, या नात्याला अनेक समज, गैरसमज आणि अंधश्रद्धा यांचे कोंदण मिळाले आहे. थोडक्यात, कोकणी माणसात इथल्या वन्यजीवांबाबत अनेक समज आहेत. या समज-गैरसमजुतींचा वारसा लोकांना पिढ्यान्पिढ्या मिळत आलेला आहे, तर काहींचा स्वानुभवावर आधारलेला आहे. असे असूनही कोकणातील काही गावांनी वन्यजीव संवर्धनाचा विडा उचललेला दिसतो. या सगळ्यात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे, कोकणी माणसांमध्ये वन्यजीवांबद्दल असलेली अपुरी जागृती (aranyavat). वन्यजीवांबाबत पारंपरिक ज्ञानाचा खजिना असलेला कोकणी माणूस त्यांच्याविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेण्यामध्ये मागे राहिलेला दिसतो. यात अगदी शिकल्यासवरलेल्या चाकरमान्यांचादेखील समावेश आहे. लोकशिक्षण आणि जनजागृती या दोन गोष्टींची विसंगती आपल्याला कोकणात प्रामुख्याने दिसते (aranyavat). या गोष्टींसाठी वन्यजीवांची माहिती सहजसोप्या आणि रंजक पद्धतीने मांडणे आणि सांगणे आवश्यक आहे. यासाठीच गुहागर तालुक्यात तयार करण्याते आले आहे, कोकणातील पहिले निसर्ग निर्वाचन केंद्र, ‘अरण्यवत’ (aranyavat) .


‘अरण्यवत’ म्हणजे अरण्यात असल्यासारखे किंवा अरण्यासारखे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरजवळ गिमवी गावात वसलेले आहे, ‘अरण्यवत’ नावाचे एक अनोखे आणि आकर्षक निसर्ग निर्वाचन केंद्र. कोकणातील जैवविविधता आणि त्याचे संवर्धन याबद्दल स्थानिक शाळकरी मुलांमध्ये आणि कोकणात येणार्‍या पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हे या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट. पुण्यातील वास्तुविशारद अनिरुद्ध फडके यांनी या केंद्राची उभारणी केली आहे. फडके यांना कोकणाबद्दल अत्यंत जिव्हाळा आणि ओढ होती. त्यामुळे त्यांनी गिमवी गावात जमीन घेऊन घर बांधले. विकत घेतलेल्या दुसर्‍या जमिनीत आंबे ठेवण्यासाठी बांधलेले छोटे घर होते. फडके स्वतः पेशाने वास्तुविशारद असल्याने आणि त्यांना कोकणातील जैवविविधतेबद्दल आवड असल्याने त्यांनी या छोट्या घराचे विभाग करुन तिथे निसर्ग निर्वाचन केंद्र उभारण्याचा चंग बांधला. आकर्षक देखावे, ग्राफिक्स, मॉडेल्स आणि ऑडिओ-व्हिज्युअल या माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी 2022 साली ‘अरण्यवत’ची निर्मिती केली. ‘अरण्यवत’ हे चार दालनात विभागलेले आहे. संकटग्रस्त प्रजाती, पक्षी, कांदळवन आणि समुद्री परिसंस्था अशी प्रामुख्याने चार दालने आहेत. आकर्षक प्रकाशयोजना, डिजिटल स्क्रीन, प्रोजेक्टर अशा सुसज्ज व्यवस्था ‘अरण्यवत’मध्ये आहेत. ‘अरण्यवत’चा अनुभव घेतल्यानंतर कोकणात असे काही उभे राहू शकते, यावर विश्वास बसत नाही. अनेक शाळकरी मुलं ‘अरण्यवत’ला भेट देत असतात. स्कूलबससाठी सुरक्षित पार्किंग, मुलंमुलींसाठी स्वच्छ हँडवॉश आणि स्वच्छतागृहाची सोय, विकलांग मुलांसाठी स्वतंत्र मोठ्या स्वच्छतागृहाची सोय, सावलीखाली बसून वनभोजन घेण्याची सोय, समोरचे भव्य अंगण अशा व्यवस्था आहेत. ‘अरण्यवत’च्या माध्यमातून कोकणातील विविध संकटग्रस्त वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाविषयी अधिकाधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. तुम्ही गुहागर, चिपळूण किंवा संगमेश्वरला पर्यटनासाठी जात असाल तर ‘अरण्यवत’ला नक्की भेट द्या. चिपळूण-गुहागर रस्त्यावरील गिमवी गावात ‘अरण्यवत’ आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - 8262928697 किंवा 9850262561
वेबसाईट - https://www.aranyavat.org


'अरण्यवत'ची वैशिष्ट्ये


दालन पहिले
पहिल्या दालनात कोकण आणि येथील प्रमुख आकर्षणे आणि येथील धोक्यात असलेल्या परिसंस्थांबद्दल परिचय करुन देण्यात आला आहे. याशिवाय खवले मांजर, गिधाड यांसारख्या कोकणातील संकटग्रस्त जीवांची माहितीही देण्यात आली आहे. या दालनात प्रोजेक्टरच्या माध्यमातून मुलांना कांदळवन, प्रवाळ अशा अनेक परिसंस्थांबद्दल थोडक्यात माहिती देणारे माहितीपट दाखवले जातात.
दालन दुसरे
या दालनात पक्षी व पक्ष्यांबद्दल विस्तृतपणे माहिती देण्यात आली आहे. पक्ष्यांचे विविध प्रकार, त्यांच्या परिसंस्था, त्यांच्या घरटी बांधण्याच्या विविध पद्धती यांचे आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत. तसेच पक्ष्यांच्या चोचीच्या व पायांच्या अनेक प्रकारच्या रचना, पिसांच्या व पंखांच्या रचना व त्यांचे विविध उपयोग हे सर्व आकर्षक ग्राफिक्स, ऑडिओ - व्हिज्युअल उपकरणे, परस्परसंवादी (इंटरॅक्टिव्ह) देखावे व मॉडेल्सच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत.
दालन तिसरे
तिसर्‍या दालनामध्ये पाणथळ क्षेत्र, त्यांचे महत्त्व आणि तेथील नाजूक परिसंस्था, त्यातील विविध घटक, तसेच स्थलांतरित पक्षी यांबद्दलची माहिती आकर्षक ग्राफिक्स, भव्य देखावे व मॉडेल्सच्या माध्यमांतून मांडण्यात आली आहे.
दालन चौथे
या दालनात प्रामुख्याने समुद्री परिसंस्थांबद्दल माहिती आणि पर्यावरण संवर्धनाबद्दल माहिती देण्यात आली आहे. सागरी सस्तन प्राणी, प्रवाळ, शाश्वत मासेमारी, समुद्री कासव, नद्यांची परिसंस्था, प्रदूषण यांच्याबद्दलची माहिती आकर्षक ग्राफिक्स, ऑडिओ- व्हिज्युअल उपकरणे व मॉडेल्सच्या माध्यमांतून मांडण्यात आली आहे.


Powered By Sangraha 9.0