मुंबई : वर्ग 'क'ची सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नवा कायदा आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस म्हणाले की, "स्पर्धा परिक्षांमध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून राज्य सरकार नवीन कायदा तयार करणार आहे. याशिवाय वर्ग 'क' ची सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. तसेच या अधिवेशनात पेपरफूटीविरोधात कायदा मांडण्यात येणार आहे," अशी घोषणा त्यांनी केली.
हे वाचलंत का? - पेपरफुटीविरोधात राज्य सरकारचं मोठं पाऊल!
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्रात नवीन शासन आल्यानंतर ऑगस्ट २०२२ पासून आम्ही पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारने ७५ हजार नवीन पदं भरण्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या सगळ्या पदांची भरती सुरु केली असून त्याच्या परीक्षा घेतल्या आणि अतिशय पारदर्शी पद्धतीने या परीक्षा पार पडल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात नवीन रेकॉर्ड आमच्या शासनाने तयार केला आहे."
"ऑगस्ट २०२२ नंतर आतापर्यंत ५७ हजार ४५२ तरुणांना प्रत्यक्ष नियुक्तीपत्र आम्ही दिलेलं आहे. याव्यतिरिक्त सगळी प्रक्रिया पुर्ण झालेल्यांची संख्या १९ हजार ८५३ एवढी आहे. म्हणजेच आम्ही ७५ हजार भरतीप्रक्रिया करण्याची घोषणा केली होती आणि ७७ हजार ३०५ लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. याव्यतिरिक्त अंतिम टप्पात असलेल्या ३१ हजार २०१ एक पदांची प्रक्रिया पुढच्या ३ ते ४ महिन्यात पूर्ण करणार आहोत. याचाच अर्थ अडीच वर्षांच्या टर्ममध्ये १ लाख ८ हजार नोकऱ्या सरकारने दिलेल्या असून हा एक रेकॉर्ड आहे. आम्ही हे सगळं काम पारदर्शी पद्धतीने करत आहोत," अशी माहिती त्यांनी दिली.