पक पक पकाक, काकस्पर्श या चित्रपटांतून अगदी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात नाव कमवणारा अभिनेता म्हणजे सक्षम कुलकर्णी. अभ्यास आणि कला या दोन्हींची पकड मजबूत असणार्या सक्षमचा ‘अल्याड पल्याड’ हा भयपट लवकरच भेटीला येणार आहे. आणि याच निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’ने त्याच्याशी साधलेला सुसंवाद
'पक पक पकाक; हा चित्रपट खरं तर मला नशीबाने मिळाला. मला आठवतं की हंगामा चॅनलवर त्यावेळी फिक्श्नल शो असायचे, आणि त्यात मी ’ओवी’ या एका हिंदी मालिकेत काम करत होतो. आणि तेव्हाच दिग्दर्शक गौतम जोगळेकर ’पक पक पकाक’ साठी लहान मुलगा शोधत होते. पण त्यांना हवा तसा मस्तीखोर, प्रेमळ असा मुलगा मिळत नव्हता. माझ्याकडे ती भूमिका येण्याआधी, जवळपास २००-२५० मुलांचं ऑडिशन घेऊन झालं होतं. आणि मग मला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं. दिग्दर्शकांनी मला एका कागदावर काही संवाद लिहून दिले, आणि पाठ करुन सादर कर असं म्हणाले. त्यावेळी मी इयत्ता आठवीत होतो. मी त्यांनी जे सांगितलं तसं केलं, आणि ऑडिशन नंतरच्या अवघ्या दहाव्या मिनिटाला दिग्दर्शकांनी माझ्या आई-वडिलांना ’पक पक पकाक’साठी माझी निवड झाल्याचं सांगितलं. गंमत अशी झाली की, माझी आई मी ज्या शाळेत शिकत होतो त्याच शाळेत शिक्षिका होती; त्यामुळे सहामाही परीक्षा असल्यामुळे, आम्ही सक्षमला शुटसाठी पाठवू शकत नाही असं ते म्हणाले. पण जेव्हा त्यांना समजलं की चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आहेत, त्यावेळी खरं तर त्यांना मी नेमका किती मोठ्या चित्रपटाचा भाग होणार आहे याचा आवाका समजला, आणि त्यांनी आणि शाळेने देखील मला परवानगी दिली. अखेर मी ‘पक पक पकाक’ या चित्रपटाचा अविभाज्य भाग झालो, अशी पहिल्या चित्रपटाची विशेष आठवण सक्षमने सांगितली.
शाळेच्या आठवणीत जरा रमताना, सक्षमने वेशभूषा स्पर्धेच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, पहिल्यांदा मी देशासाठी युद्धात लढलेला जवान बनलो होतो, आणि लढताना त्याचा पाय गेला असल्यामुळे मी कुबड्या देखील घेतल्या होत्या, आणि माझ्या बाबांनी मला सैनिक म्हणून मला माझ्या देशाबददल काय वाटतं? देशाप्रती माझं काय देणं लागतं, असे सगळे संवाद मला लिहून दिले होते. आणि दुसरीत भाग घेतलेल्या या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला होता. त्यामुळे माझ्या आई-वडिलांनाही हे समजलं होतं की, अभ्यासात मी बर्यापैकी हुशार असलो तरी, माझा कल हा अधिक नाटक, अभिनय यात आहे. आणि त्यानुसार मग माझी अधिक प्रगती व्हावी यासाठी मला सुट्ट्यांमध्ये नाट्य शिबिरांना पाठवण्याची सुरुवात झाली. मग तिथूनच माझं अभिनयाचं शिक्षण सुरु झालं.
२०१० साली आलेला ‘शिक्षणाचा आईचा घो’ या चित्रपटाबद्दलही आठवणी सक्षमने सांगितल्या. तो म्हणाला की, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासोबत ’शिक्षणाचा आईचा घो’ या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली. त्यातही अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे दडपण होतं, पण त्यांनी कधीच सिनियर असल्याचा आविर्भाव आणला नाही. त्या चित्रपटात एक दृश्य आहे जिथे माझ्या डोक्यात बॅट लागते, आणि त्यानंतर मी कोमात जातो. मला सांगायला आवडेल की त्या संपुर्ण सीनसाठी आम्हांला दिग्दर्शक मांजरेकरांनी काहीही मार्गदर्शन केलं नव्हतं. त्यांनी आम्हाला प्रसंग सांगितला आणि जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा, मी फक्त ते टीपतो असं ते म्हणाले होते. त्यावेळीही भरत जाधव यांनी मला पुढे करत, ’सक्षम, तु अभिनय कर, मी तुला साथ देतो’ असं सांगत तो संपुर्ण सीन शुट करण्यात आला होता.
आत्तापर्यंत मी ज्या ज्या भूमिका साकारल्या,त्यांनी मला माणूस म्हणून नक्कीच घडवलं आहे. कारण ती भूमिका जेव्हा एखादा कलाकार साकारतो, तेव्हा तो स्वत:ला विसरुन केवळ ती व्यक्तिरेकाच जगत असतो. त्यामुळे चांगले गुण जे अंगवळणी यायला हवे ते आपसुक येतात, आणि वाईट गुण ती भूमिका किंवा तो चित्रपट संपला की त्यासोबतच निघून जातात, असं देखील सक्षम म्हणाला. तसेच, ग्रीप्स नाट्यचळवळीचा तो एक महत्वपुर्ण भाग असून त्याबद्दल सांगताना तो म्हणाला की, जर्मनीत सुरु झालेला ग्रीप्स हा नाट्य प्रकार ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी मराठी रंगभूमीवर आणला, आणि त्यानुसार आम्ही आणि आमच्या आधीची पिढी नाटक प्रकारामुळे घडली. आणि ग्रीप्स नाट्य प्रकारात सामाजिक, राजकीय, भौगोलिक किंवा अन्य कोणतेही विषय जे प्रौढांनी मांडले तर त्यावरुन विवाद होण्याची शक्यता असते; त्यामुळे असे संवेदनशील विषय लहान मुलांच्या रुपात सादर केले जातात. आणि आनंदाची बाब म्हणजे, ज्यावेळी जर्मनीत ग्रीप्स नाट्य चळवळीला ५० वर्ष पुर्ण झाली, तेव्हा भारतातून नाटक बसवलं होतं आणि ते बर्लिनमध्ये आम्ही सादर करत भारत आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यामुळे असे नाट्यप्रयोग जेव्हा होतात त्यावेळी प्रत्येक कलाकार त्याच्या रोजच्या कामातून रिफ्रेश होतो, आणि अभिनय कौशल्य अधिक धारधार करत, नव्याने प्रेक्षकांसमोर स्वत:ला मांडत असतो, असे म्हणत नाटक हे कलाकाराला जगवते आणि जगायला शिकवते असे देखील सक्षम म्हणाला. सक्षम कुलकर्णीसह गौरव मोरे, अनुष्का पिंपुटकर यांच्या प्रमुख भूमिका असणारा ’अल्याड पल्याड चित्रपट १४ जून रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.