इंडी आघाडीचं ठरलं!, राहुल गांधीच असणार विरोधी पक्षनेता!

08 Jun 2024 17:05:08
rahul gandhi opposition leader




नवी दिल्ली :       लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून एनडीए तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करणार आहे. इंडी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा राहुल गांधी यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली असून यात राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशभरात ९९ जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे पक्षाच्या संसदीय गटाचा नेता कनिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षाचा नेता असेल त्यानुसार राहुल गांधी यांच्या नावावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी दि.०८ जून रोजी लोकसभेत राहुल गांधी यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर केला आहे.




काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, कार्यकारिणी समितीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी योग्य व्यक्ती आहेत, अशी चर्चा असल्याचेही समोर आले आहे.

लोकसभा २०२४ मध्ये काँग्रेसच्या जागांची संख्या ५२ वरून ९९ वर पोहोचली असून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. २०१४ मध्ये सत्तेबाहेर राहिल्यानंतर काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या १० वर्षांत काँग्रेसला हे पद मिळू शकले नाही, कारण दोन्ही सभागृहात त्यांच्या जागा कमी झाल्या. २०१४ आणि २०१९ एकूण जागांच्या १० टक्क्यांपेक्षा कमी होत्या.





Powered By Sangraha 9.0