केईएममधील तंबाखू बंद क्लिनिक अद्ययावत होणार

08 Jun 2024 19:35:54

kem
मुंबई, दि.८: प्रतिनिधी सुमारे वीस वर्षांहून अधिक काळ राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयात तंबाखू बंद क्लिनिक द्वारे तंबाखू व्यसनाधीन रुग्णांवर उपचार आणि समुपदेशन केले जात आहे. हे क्लिनिक आता अद्ययावत करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
दरम्यान, जागत‍िक पर्यावरण द‍िनान‍िम‍ित्त रुग्णालयातील फुप्फुस औषध व‍िभाग आण‍ि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या संयुक्त व‍िद्यमाने रुग्णालयात व्याख्यान संपन्न झाले. तंबाखू सेवन करण्याची सवय ही इतर अनेक व्यसनांसाठी कारणीभूत ठरते. त्यातून अनेक रोगांना आमंत्रण दिले जाते. किशोरवयीन आणि तरुण पिढीमध्ये देखील हे व्यसन आढळून येते. एका सर्वेक्षणानुसार, सन २०१६-१७ मध्ये भारतातील वय वर्षे १५ आणि त्याहून अधिक वयाच्या एकूण २८ कोटी ७ लाख व्यक्ती तंबाखूचे सेवन करतात. याच सर्वेक्षणानुसार ५ पैकी १ प्रौढ (म्हणजे अंदाजे २० कोटी) व्यक्ती धूररहित तंबाखूचे सेवन करतात. तर १० पैकी १ प्रौढ (१० कोटींहून अधिक) तंबाखूचे सेवन करतात.
केईएममध्ये तंबाखू बंद क्लिनिक द्वारे औषधोपचार
राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील मानसोपचार विभागामध्ये सन १९९१ पासून 'ड्रग डेडिक्शन सेंटर ऑफ एक्सलन्स' हा विभाग सुरू आहे. तसेच २० गत वर्षांपासून प्रत्येक बुधवारी सकाळी 'तंबाखू बंद क्लिनिक' संचालित केले जात आहे. तंबाखू अधीन झालेल्या रुग्णांना तंबाखू सोडण्यास मदत करण्यासाठी निकोटीन रिप्लेसमेंट, फार्माकोथेरपी (व्हॅरेनिकलीन/बुप्रोपियन), समुपदेशन आणि वर्तन सुधारणा सेवा इत्यादी उपक्रम या माध्यमातून राबवले जातात. तसेच केंद्र शाळा, महाविद्यालये आणि समुदायामध्ये तंबाखू वापर प्रतिबंधासाठी स्वतंत्रपणे तसेच स्वयंसेवी संस्था, पोलिस आदींच्या सहकार्याने अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात.
बजाज इलेक्ट्रिकल फाऊंडेशन लावणार हातभार
केईएम रुग्णालयाच्या या उपक्रमाला हातभार लावण्यासाठी बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे. बजाज इलेक्ट्रिकल फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर फंड) द्वारे केईएम रुग्णालयातील तंबाखू बंद क्लिनिक अधिक अद्ययावत केले जाणार आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि बजाज फाऊंडेशनच्या विशेष कार्यकारी अधिकारीमधुरा तळेगावकर यांनी या संयुक्त उपक्रमासाठी एक वर्षाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याद्वारे 'तंबाखू बंद क्लिनिक' द्वारे रुग्णांना अधिक अद्ययावत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवणे शक्य होणार आहे.
‘फुप्फुसाचे आरोग्य’ व‍िषयावर व्याख्यान
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाव‍िद्यालय आण‍ि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयातील सभागृहात, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘फुप्फुसाचे आरोग्य’ विषयावर व्याख्यान पार पडले. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि व‍िव‍िध वैद्यकीय शाखेचे १८६ व‍िद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग नोंदवला. दरम्यान, व‍िद्यार्थ्यांमधील पर्यावरण विषयक ज्ञान, जागरुकता तपासण्यासाठी तसेच ती आणखी वाढव‍िण्यासाठी 'पर्यावरणव‍िषयी जागरूकता’ या विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
Powered By Sangraha 9.0