जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू!

08 Jun 2024 13:06:24
J&K Assembly Election 2024


नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुकीनंतर आता केंद्रशासित असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात निवडणुक आयोगाने दि. ७ जून रोजी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. आयोगाने केंद्रशासित प्रदेशात निवडणुक चिन्ह वाटपासाठी नोंदणीकृत गैर-मान्यताप्राप्त पक्षांकडून अर्ज स्विकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. अलीकडेच सीईसी राजीव कुमार यांनी स्पष्ट केले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाला केंद्रशासित प्रदेशात या वर्षी ऑक्टोबरपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत.

दरम्यान एका अधिकाऱ्याने सांगितले की, निवडणूक चिन्हे (राखीव अधिकार आणि वाटप) आदेशानुसार, कोणताही नोंदणीकृत गैर-मान्यताप्राप्त पक्षांकडून सभागृहाचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधी निवडणूक चिन्हासाठी अर्ज करू शकतो. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा विसर्जित करण्यात आली आहे. त्यामुळे आयोगाने एक निवेदन जारी करून निवडणूक चिन्हासाठी अर्ज मागवले आहेत.

तसेच मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची स्वत: ची निवडणूक चिन्हे आहेत. त्यामुळे नोंदणीकृत गैर-मान्यताप्राप्त पक्षांना उमेदवार उभे करण्यासाठी निवडणूक चिन्हासाठी अर्ज करावा लागतो. लोकसभा निवडणूक-२०२४ मध्येही अमित शहा म्हणाले होते की, विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू- काश्मीरला पुर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. त्यामुळे विधानसभा निवडणुक होताच सरकार राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. त्यानंतरच आरक्षण देता येईल. (आरक्षण देण्यासाठी) सर्व जातींची स्थिती जाणून घेतली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या मुदतीपूर्वी आम्ही प्रक्रिया पूर्ण करू, असे ही शाह म्हणाले होते.


Powered By Sangraha 9.0