"कोकण आणि ठाण्यातून ठाकरे हद्दपार!"

08 Jun 2024 18:41:16
 
Thackeray
 
मुंबई : ठाण्यापासून तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरे यांना एकही जागा मिळाली नाही. कोकण आणि ठाण्यातून ते हद्दपार झाले आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. भाजपच्या विधिमंडळ बैठकीत ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे असा खोटा प्रचार केला गेला. पण त्यांना सहानुभूती असती तर ती मुंबई आणि कोकणात दिसायला हवी होती. मात्र, ठाण्यापासून तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे यात उबाठाला एकही जागा मिळाली नाही. मुंबईत मिळालेल्या जागा त्यांना कुणाच्या भरवशावर मिळाल्या हेदेखील आपल्याला माहिती आहे. त्यांना मराठी माणसाने मत दिलेलं नाही."
 
हे वाचलंत का? -  आपली लढाई ३ नव्हे, तर ४ पक्षांशी! फडणवीसांनी सांगितलं 'त्या' चौथ्या पक्षाचं नाव
 
"मराठी माणसाने त्यांना मत दिलं असतं तर दक्षिण मुंबईतील वरळीमध्ये त्यांना फक्त ६ हजार मतं का मिळाली आहेत? त्यांनी शिवडीमध्ये ३० ते ४० हजार मतांची लीड घ्यायला हवी होती. विक्रोळी, भांडूपमध्ये ६० हजार मतांची लीड घ्यायला हवी होती. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. तर ते केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी याबाबतची कबुलीदेखील दिली आहे," असे ते म्हणाले.
 
"मराठवाड्यात मराठा समाजाचा नरेटिव्ह तयार केला गेला. मराठा समाजाला आपण दोनवेळा आरक्षण दिलं. पण ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला, त्यांच्याकडे मतं गेलीत. याचा अर्थ हेदेखील टिकणार नाहीत. या नरेटिव्हमध्ये ते काही प्रमाणात यशस्वी झालेत," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0