मगई’ भाषेमुळे झाली बाप-लेकाची भेट

08 Jun 2024 15:35:27
 
कल्याण
  कल्याण : बिहारमध्ये बोलल्या जाणार्‍या ‘मगई’ भाषामुळे कल्याण ‘आरपीएफ’ने नऊ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घालून दिली आहे. अर्जुन कुमार हा 19 वर्षीय तरुण हिमाचल प्रदेशातून बिहार येथे येत असताना बिहारला न जाता मुंबईला आला. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तो कुठे निघाला? आणि कुठे जात आहे? याचा त्याला थांगपत्ता नव्हता. कल्याण रेल्वे परिसरात एक तरुण मळकट फाटलेल्या कपड्यात फिरत होता. लोकांकडून पैसे मागून तो आपली तहान, भूक भागवत होता.
 
रेल्वे कॉलनीतील लोक त्याची परिस्थिती पाहून त्याला जेवण, पैसे, पाणी देत होते. कॉलनीतील एका व्यक्तीने आरपीएफच्या वरिष्ठ अधिकारी रिषी शुक्ला यांना त्याचा फोटा पाठविला. शुक्ला यांनी हा फोटो कल्याण आरपीएफचे प्रमुख राकेश कुमार यांना पाठविला. राकेश कुमार यांनी या तरुणाला आरपीएफ कार्यालयात आणले. राकेश कुमार हे बिहारचे असल्याने त्यांना माहिती पडले की, हा तरुण फक्त त्याचे नाव सांगतो.
 
तो बिहारमध्ये पटणा शहराच्या आजूबाजूला बोलली जाणारी मगई भाषा बोलतोय. यानंतर राकेश कुमार यांनी ज्या परिसरात मगई भाषा बोलली जाते. त्या भागातील 14 पोलीस अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्या तरुणाचे फोटो पाठविले. राकेश कुमार यांना माहिती मिळाली की, बिहारमधील दुल्हीन ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या गावात राहणारा गनौरी मोची याचा हा मुलगा आहे. ज्याची मानसिक स्थिती ठीक नाही. गनौरी हा हिमाचल प्रदेशला एका मोठ्या कंपनीत गार्डचे काम करतो. राकेश कुमार याने हिमाचलमध्ये राहणार्‍या गनौरी मोची यांना संपर्क साधला. गनौरी यांनी कल्याणला येत हा माझाच मुलगा असल्याचे निश्चित केले.
 
 
Powered By Sangraha 9.0