वेताळवाडीचा हवामहल

07 Jun 2024 21:35:43
 Vetalwadi

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सोयगाव या तालुक्याच्या गावाजवळ एक नितांत सुंदर आणि खणखणीत बांधणीचा गिरिदुर्ग उभा आहे. या किल्ल्याचं नाव वेताळवाडी! बघताचक्षणी डोळे दिपून जावेत अशी आजच्या स्थितीतही भक्कम असणारी रेखीव तटबंदी, किल्ल्याचे बुलंद दरवाजे आणि त्यावरची शरभशिल्प, गडावरील प्रचंड आकाराचा बांधीव तलाव आणि दुर्गस्थापत्यातील अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला हा किल्ला म्हणजे जिल्ह्याचे एक अपरिचित दुर्गरत्न. पण, वेताळवाडी किल्ल्याचे सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे, त्याच्या बालेकिल्ल्यावर पश्चिम दिशेला उभारण्यात आलेला नितांतसुंदर हवामहल. अत्यंत रसिकतेने व अगदी योग्य जागा हेरून हा हवामहल बांधण्यात आलेला असून, याची रचना देवगिरी किल्ल्यावरील बारदरीसारखी करण्यात आली आहे.
 
या महालाच्या प्रवेशापाशी दोन कमानी असून, त्या एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत. तसेच याच्या पश्चिमेकडे असलेल्या दोन कमानीही एकमेकांना जोडून एखाद्या खिडकीसारखी त्यांची रचना करण्यात आली आहे. महालाच्या आतमध्ये छोट्या देवड्या तयार करण्यात आलेल्या असून, कदाचित संध्याकाळच्या वेळी दिवे लावण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे. या हवामहलाची बांधणी ही इथून समोर दिसणार्‍या सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी व संध्याकाळच्या वेळी इथला गार वारा अनुभवता यावा, यासाठी करण्यात आली असून आजही या ठिकाणाहून शब्दातीत करणारा सूर्यास्त पश्चिमेकडील थंड वारा अंगावर घेत अनुभवता येतो. वेताळवाडीच्या हवामहालाला कोणतेही छत नाही आणि म्हणूनच आजही इथे हवा खेळती राहते. सरत्या पावसाळ्यात वेताळवाडी किल्ल्याला भेट दिल्यास हिरवाकंच झालेला प्रदेश,खाली दिसणारे टुमदार वेताळवाडी गाव, शेजारीच दिसणारे वेताळवाडी धरण व त्याच्यामागे उभं असलेलं भव्य आणि प्रचंड वैशागड किल्ला हा नजरा अवर्णनीय आहे. एखाद्या निवांत संध्याकाळी या हवामहालात काही निवांत क्षण व्यतीत करून बघा....याच्या स्थापत्याची रसिकता नव्याने उलगडेल.


ओंकार ओक


Powered By Sangraha 9.0