"उगाच ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्या आधुनिक आनंदीबाई बनू नका!"

07 Jun 2024 18:17:27
 
Supriya Sule
 
मुंबई : उगाच ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्या आधुनिक आनंदीबाई बनू नका, असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रीया सुळेंना लगावला आहे. संसद भवन परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे भव्य पुतळे हटविण्यात आल्याचा आरोप सुप्रीया सुळेंनी केला होता. यावर आता चित्राताईंनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "आपले महापुरूष तुमच्यासाठी केवळ प्रचारात मिरवण्याची गोष्ट असेल. आमच्यासाठी ते प्रातःस्मरणीय आहेत. त्यामुळे संसदेच्या प्रांगणातले पुतळे हटवले जात असल्याचं असत्य पसरवून उगाच ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्या आधुनिक आनंदीबाई बनू नका. हे पुतळे नवीन जागी हलवले जाताहेत, हटवले जात नाहीत."
 
हे वाचलंत का? -  एनडीए सरकार पाच वर्ष पूर्ण करेल : उपमुख्यमंत्री अजित पवार
 
"आत्मनिर्भर भारताच्या स्वाभिमानाची खूण म्हणजे नवीन संसद भवन आहे. ज्यावर तुम्हीच बहिष्कार घातला होता, कारण तुम्हाला इंग्रजांनी उभारलेले जुने संसद भवन प्रिय होते. आता मात्र तुम्हाला जळजळतय. आता सहन न झाल्यानेच खोट्या बोंबा मारणं आणि थापा मारणं सुरू केलं आहे. या थापांचा बाप कोण हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे," असे त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "भारतीय जनता पक्षाचा विचार आणि संस्कार आत भिनलेले असतात आणि विरोधकांचे विचार हे प्रचार आणि फार फार तर वचननाम्यापुरतेच झळकतात. म्हणूनच तर स्टंटबाजीत तुमच्याकडून श्रद्धेय बाबासाहेबांचा फोटो फाडला जातो. शिवरायांचा खोटा इतिहास नव्याने लिहिण्यात काँग्रेसचा हात तर कोणीच धरू शकत नाही. लवकरच संसदेत पाऊल ठेवाल तेव्हा या महापुरूषांसमोर नतमस्तक होऊन खोटं बोलल्याचं प्रायश्चित्त घ्याल, अशी अपेक्षा आहे," असेही त्या म्हणाल्या.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0