चंद्रकांत खैरेंच्या पराभवला अंबादास दानवे कारणीभूत?

07 Jun 2024 19:11:25
 
Khaire & Danve
 
लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यात उबाठा गटाला अपेक्षेपेक्षा जास्त जागाही मिळाल्यात. पण या निकालात मात्र, उबाठा गटाला आपला बालेकिल्ला असलेल्या एका जागेवर जोरदार फटका बसला. ती जागा होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी दारूण पराभव केलाय. परंतू, चंद्रकांत खैरेंनी मात्र आपल्या पराभवाचं खापर त्यांच्याच पक्षातील नेते अंबादास दानवे यांच्यावर फोडलंय. एवढंच नाही तर त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही म्हटलंय. त्यामुळं उबाठा गटातील अंतर्गत वाद यानिमित्तानं पुन्हा एकदा पुढे आलाय. तर चंद्रकांत खैरेंच्या पराभवामागे खरंच अंबादास दानवेंचा हात आहे का? खैरेंना पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत का? आणि खैरेंनी दानवेंवर आरोप करण्यामागे नेमकं कारण काय? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करुया.
 
दिनांक १३ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान पार पडलं. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उबाठा गटाच्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली होती. तर महायूतीकडून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना उमेदवारी मिळाली होती. याशिवाय एमआयएमचे इम्तियाज जलीलसुद्धा मैदानात होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. परंतू, या मतदारसंघात खरा सामना हा शिवसेना विरुद्ध उबाठा असाच होता.
 
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात १९९९ पासून तर २०१९ पर्यंत गेली ४ टर्म चंद्रकांत खैरेंच्या रुपाने उबाठा गटाचा खासदार होता. त्यामुळे हा मतदारसंघ उबाठा गटाचा बालेकिल्ला मानला जायचा. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन शिवसेना नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे या मतदारसंघात शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर यावेळी पुन्हा एकदा उबाठा गटाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली होती. परंतू, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. यावेळी ४ टर्म खासदार असलेल्या चंद्रकांत खैरेंना मागे टाकत शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी विजय मिळवला. एवढंच नाही तर एमआयएमचे इम्तियाज जलील हेसुद्धा चंद्रकांत खैरेंपेक्षा जास्त मतं घेत दुसऱ्या क्रमांकावर होते. संदीपान भुमरेंनी तब्बल १ लाख ८० हजार मताधिक्याने चंद्रकांत खैरेंचा दारूण पराभव केलाय. त्यामुळे उबाठा गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आणि हा पराभव पचवणं उबाठा गटाला जड जाताना दिसतंय.
 
लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर चंद्रकांत खैरेंनी चक्क आपल्या पराभवाचं खापर अंबादास दानवेंवर फोडलंय. ते म्हणाले की, "हा मनाला लागणारा पराभव आहे. पक्षांतर्गत धोका झाल्याचा मला संशय आहे. याबद्दल मी पक्षप्रमुखांना सगळं सांगणार आहे. खरंतर आमचे दोन जिल्हाप्रमुख आहेत. त्यातले एक जिल्हाप्रमुख आजारी झालेत. ते उठलेच नाहीत. तर दुसरे जिल्हाप्रमुख विरोधी पक्षनेते आहेत. ते इथे यायचे दहा मिनिटं बसायचे आणि निघून जायचे. मग मी एकटा पडलो. मी एकटा सगळं काम करत होतो. विरोधी पक्षनेता आता मोठा माणूस झालाय. तो अजून मोठा होवो. पण त्यांनी जिल्हाप्रमुखपद सोडलेलं नाही. त्यामुळे त्यांनी जास्त लक्ष देऊन काम करायला हवं होतं. मी माझी कैफियत उद्धव साहेबांना सांगणारच," असं म्हणत खैरेंनी अंबादास दानवेंवर गंभीर आरोप केलाय.
 
मुळात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हा वाद फार आधीपासून सुरुये. लोकसभेचं तिकीट मिळण्यावरून सुरु झालेला हा वाद आता एकमेकांवर निकालाचं खापर फोडण्यापर्यंत येऊन ठेपलाय. खरंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंना लोकसभेची उमेदवारी हवी होती. खैरे आणि दानवेंमध्ये तिकीटावरून रस्सीखेच सुरु आहे, अशा आशयाच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या. परंतू, खैरेंनी यावर सारवासारव केल्याचंही पाहायला मिळालं. एवढंच नाही तर अंबादास दानवेंनी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप केला होता. यावर चंद्रकांत खैरेंनी "मी अंबादास दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते. मी त्यांना घेऊन चालायचो. त्यावेळी माझे पदाधिकारी चिडायचे. तुम्ही त्यांचंच ऐकता असं म्हणायचे. अंबादास दानवे लहान आहेत. ते माझे शिष्य आहेत," असं स्पष्टीकरण दिलं होतं.
 
त्यानंतर आता निकाल लागल्यावर चंद्रकांत खैरेंनी दानवेंनाच आपल्या पराभवाला जबाबदार धरलंय. त्यामुळं खैरे विरुद्ध दानवे हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय. याशिवाय चंद्रकांत खैरेंनी याबाबत उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचंही म्हटलंय. त्यामुळे उबाठा गटातील दोन वरिष्ठ नेत्यांमधील हा वाद सोडवणं उद्धव ठाकरेंना कितपत सोप्पं जाईल हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0