परी जीव अज्ञानी तैसेचि ठेले।

05 Jun 2024 22:02:30
Encourage Knowledge Sharing

आजवर अनेक सत्पुरुष, संत, महात्मे यांनी आपल्या तपश्चर्येतून, साधनेतून गवसलेले ज्ञान, कोणताही आडपडदा न ठेवता जनसामान्यांसाठी सांगत आले आहेत. त्याने या जगातील लोक ज्ञानी व्हायला हवे होते. पण, तसे तर दिसत नाही. येथील अज्ञानी जीव आहे तिथेच आहेत, असे स्वामींनी या श्लोकाच्या पहिल्या भागात सांगितले आहे. श्रेष्ठांनी आपले आत्मज्ञान लोकांना स्पष्टपणे सांगितले आहे.

समर्थ रामदासस्वामींनी आतापर्यंतच्या श्लोकांतून भक्तीची भाषा वापरून द्वैत तत्त्वज्ञानानुसार भक्ताचा ’मी’, त्या परमेश्वराला जाणण्याचा कसा प्रयत्न करतो, यावर भाष्य केले आहे. अविनाशी परब्रह्म रामाचे स्वामित्व मान्य केल्यामुळे साधकाची देहबुद्धी कमी होते. त्याला ऐहिक गोष्टीचे आकर्षण अथवा आसक्ती उरत नाही. ऐहिक जीवनातील आसक्ती, मोह, स्वार्थ यांच्या प्रभावाखाली माणूस वावरत असतो. त्यामुळे तो ब्रह्मतत्त्वापासून वेगळेपण अनुभवता या वेगळेपणामुळे, ऐहिक स्वार्थ आसक्ती मोह माणसाला घेरतात, अशाश्वत प्रापंचिक गोष्टीतून भय निर्माण होते. परंतु, या जीवनातील स्वार्थ, अहंकार व देहबुद्धी नाहीशी झालेल्या साधकाला कशाचीही भीती उरत नाही. भयातीत झालेल्या या साधकाला ‘संत’ म्हणतात. या कारणाने संत भयातीत असतात, हे आपण यापूर्वीच्या श्लोकातून जाणून घेतले आहे. सामान्य भाषेत लोक ज्याला ‘देव’ म्हणतात, त्या परब्रह्मवस्तूपर्यंत पोहोचण्यासाठी अथवा त्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी साधक देवाविषयी शरणागताची भावना पक्की करून भगवंतावर भक्तिप्रेमाचा वर्षाव करतो, संत भगवंतावर अलोट भक्तिप्रेम करतात.
 
भगवंत हेच आपले सर्वस्व आहे, आपले ध्येय आहे, असे मनापासून ठरवल्याने संत भगवंताशी एकरूप होऊन जातात. साधक भगवंतावरील भक्तिप्रेमाचा अभ्यास करून एकरूप झाल्यावर संतपदाला पोहोचतो. आपल्या संतांनी सामान्यजनांना नेहमीच भगवंताच्या भक्तिप्रेमाचा संदेश दिला आहे. त्यासाठी संतांनी अभंगरचना करून भक्तांना भक्तिरसात तल्लीन केले. तरीही, आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय साधक खर्‍या अर्थाने परब्रह्म ओळखू शकत नाही आणि अखंड समाधानाची स्थिती अनुभवू शकत नाही, असे अध्यात्मशास्त्र सांगते. संतांनी आत्मियतेने भक्तिप्रेमातून देवाला आपलंसं करून घेऊन आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याचे दिसून येते. संत तुकाराम महाराजांसारखे असामान्य भक्तभक्तीचा डांगोरा पिटतात आणि भगवंताच्या भक्तिप्रेमाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवतात. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात की -
 
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिका।
पंडित वाचकां ज्ञानियांसि।
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त।
तरी भक्तिसुख दुर्लभ त्यां॥
 
तुकाराम महाराज म्हणतात की, पंडितांनी तसेच अनेक ग्रंथांच्या अभ्यासकांनी, ज्ञानी पुरुषांनी आत्मनिष्ठ होऊन भले मुक्ती मिळवली असो, पण भगवंताच्या भक्तिप्रेमात जे अपरंपार सुख आहे, त्या सुखाला ते पारखे झाले आहेत. मुक्तीपेक्षा तुकाराम महाराजांनी भक्तिप्रेम सुखाला जास्त महत्त्वाचे मानले. पुढे आणखी एका अभंगात तुकाराम महाराज ’हेचि दान देगा देवा.’ या अभंगात ते म्हणतात की, देवा, मला धन, संपत्ती इतकेच नव्हे, तर मुक्तीसुद्धा देऊ नको. कारण, धन, संपत्ती अथवा मुक्ती हे सारे तुझा विसर पाडायला लावणारे आहेत. सर्व भक्त देवाजवळ मुक्तीची इच्छा धरतात, हे खरे आहे. पण, मुक्ती मिळाली तर आम्हाला तुझ्या भक्तिप्रेमाला मुकावे लागेल! सामान्य साधकाला तुकारामांच्या या पराकोटीच्या भक्तिप्रेम भावनेची अनुभूती घेणे कठीण आहे. यासाठी समर्थ रामदासांनी भक्तीची भाषा वापरून, पुराणातील दाखले देऊन भगवंताचे गुणविशेष यापुढील श्लोकांतून स्वामी तत्त्वज्ञानाच्या भगवंताची अणुशक्ती अद्वैत विचारांतून म्हणजे वेदान्ताच्या भाषेतून मांडत आहेत. येथे स्वामींनी वेगळ्या भाषेचा प्रयोग केला असला, तरी त्यांच्या स्वानुभवात त्यामुळे फरक पडत नाही.
 
येथून पुढील पाच श्लोकांच्या शेवटची ओळ, ‘जुने ठेवणे मीपणे आकळेना।’ अशी आहे. हा पुरातन ज्ञानाचा ठेवा कसा आहे, हे जाणून घेऊन हे पूर्वापार चालत आलेले ज्ञान (जुने ठेवणे) आपल्याला कळत का नाही किंवा ते जाणण्याला आपण असमर्थ का आहोत, यावर समर्थ आपले विचार मांडणार आहेत. याबाबत देहबुद्धीच्या खोट्या ’मीपणा’मुळे हा पुरातन ज्ञानाचा ठेवा माणसाला जाणता येत नाही, असा अभिप्राय समर्थांनी व्यक्त केला आहे. ‘पुरातन ज्ञानाच्या ठेव्याचे आकलन माणसाला होत नाही’ या विचारगटातील मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक असा आहे-
 
जिवां श्रेष्ठ ते पण्ट सांगोनि गेले।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले।
देहेबुधिचें कर्म खोटे टळेना।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३७॥
 
आत्मज्ञानी पुरुषांनी आपल्या तपस्येतून, साधनेतून, अभ्यासातून जे ज्ञान मिळवते, ते सारे या जगातील लोकांना सांगून टाकले. व्यास, वाल्मिकी, शंकराचार्य, मध्वाचार्य इत्यादी महान विभूतींनी वेदातीत ज्ञान, आपले विचार जगाला दिले आहेत. या प्रज्ञावान पुरुषांनी आपल्या प्रतिभागुणांच्या जोरावर अद्वैत, द्वैताद्वैत तत्त्वज्ञानातील पुरातन ज्ञान लोकांसमोर मांडले. व्यासांनी लिहिलेल्या महाभारतातील युद्धप्रसंगीचा कृष्णार्जुन संवाद भगवद्गीतेच्या रूपात जगासमोर सादर केला. तो ज्ञानाचा ठेवा जगाला उपयोगी आहे. मराठी भाषेतील संत ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास आणि इतर संत यांनी आपापल्या ग्रंथांतून आत्म, अनात्म, भक्तिप्रेमाचे आत्मज्ञान सार्‍या लोकांना सांगितले, असं असलं तरी लोकांनी ते आत्मसात केलेले दिसत नाही, येथे एक तर्कनिष्ठ शंका समर्थांच्या मनात येते. आजवर अनेक सत्पुरुष, संत, महात्मे यांनी आपल्या तपश्चर्येतून, साधनेतून गवसलेले ज्ञान, कोणताही आडपडदा न ठेवता जनसामान्यांसाठी सांगत आले आहेत. त्याने या जगातील लोक ज्ञानी व्हायला हवे होते. पण, तसे तर दिसत नाही. येथील अज्ञानी जीव आहे तिथेच आहेत, असे स्वामींनी या श्लोकाच्या पहिल्या भागात सांगितले आहे. श्रेष्ठांनी आपले आत्मज्ञान लोकांना स्पष्टपणे सांगितले आहे, तरी जीव अज्ञान तैसेचि गेले? असे का व्हावे? याची कारणे काय आहेत, हे आता समर्थ श्लोकाच्या पुढील भागात सांगत आहेत. ते समर्थविचार पुढील लेखात सविस्तरपणे पाहता येतील. (क्रमशः)
सुरेश जाखडी


Powered By Sangraha 9.0