सांगली : यावेळीच्या निवडणूकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल पुढे आला आहे. सांगली लोकसभेतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. विशाल पाटलांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांच्या विजयामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये उबाठा गटाकडे गेली होती. उबाठा गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या जागेवर विशाल पाटील लढण्यास उत्सुक होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. तर भाजपकडून याठिकाणी संजयकाका पाटील उमेदवार होते. म्हणजेच सांगलीमध्ये यावेळी तिरंगी लढत होती.
दरम्यान, विशाल पाटील यांनी ५ लाख ४७ हजार ४५९ मतांनी विजयी झाले आहेत. विजयानंतर विशाल पाटील यांनी सांगलीत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी माझ्या पाठीशी होते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे विशाल पाटील आता पुन्हा काँग्रेसमध्ये जातील की, अपक्ष राहतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.