मुंबई : मुंबई पदवीधरसाठी निवडणूकीसाठी 'भाजप'तर्फे दै. 'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण रविंद्र शेलार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दि. २६ जून रोजी होणाऱ्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी भाजपतर्फे आज विधान परिषदेचे उमदेवार जाहीर करण्यात आलेले आहेत. मुंबई पदवीधरसाठी किरण शेलार यांची लढत थेट उबाठा गटाच्या अनिल परब यांच्याविरोधात होणार आहे.
जन्मभूमी आणि कर्मभूमी ही मुंबई असलेल्या किरण शेलार यांचे बालपण बीडीडी चाळीत गेले. वरळीतील मराठा हायस्कूल, वरळी येथे शालेय शिक्षण पार पडले. मास्टर्स ऑफ आर्ट्स (जर्नलिजम) मधून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पार पडले. मराठी पत्रकारितेचा २४ वर्षे अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. यासह मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ओळखले जाते. मुंबईतील सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे.
त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1980 रोजी वरळीतील बीडीडी चाळीत झाला. त्यांनी ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘साप्ताहिक विवेक’ या नामांकित प्रकाशनांसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. दोन दशकांच्या त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी सामाजिक, पर्यावरण आणि महाराष्ट्रातील गावांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम केले आहे. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (स्वयंसेवक) असलेले किरण रवींद्र शेलार संघाचे द्वितीय वर्ष शिक्षित आहेत. मराठी पत्रकारिता, पर्यावरण व वन्यजीव संवर्धन, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान आहे.