लोकसभा निवडणूकीनंतर आता 'या' राज्यात होणार विधानसभा निवडणूक

    03-Jun-2024
Total Views |
 J&K
 
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने सोमवार, दि. ३ मे २०२४ मोठी घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची तयारी लवकरच सुरू होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोग लवकरच जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात निवडणूक प्रक्रिया सुरू करेल.
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजीव कुमार यांना जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या नियोजनाबाबत प्रश्न विचारण्यात आले. निवडणूक आयुक्त म्हणाले की, 'आम्ही लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करू, जम्मू-काश्मीरमधील मतदारांच्या मतदानामुळे आम्ही खूप उत्साहित आहोत. जम्मू आणि काश्मीरमध्ये चार दशकांतील सर्वाधिक मतदान ५८.५८ टक्के आणि काश्मीर खोऱ्यात ५१.०५ टक्के झाले.
 
जम्मू-काश्मीरमधून लोकसभेत पाच खासदार निवडून जातात. केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू, उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग-राजौरी हे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये, कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरची पहिलीच लोकसभा निवडणूक होती. राज्यात सध्या राष्ट्रपाती शासन लागू आहे. सप्टेंबरच्या आधी राज्यात निवडणूक घेण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत.