(Mohanji Bhagwat at Siddheshwar)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : “किशोरवयीन मुलांकडून मादक पदार्थांचे सेवन कमी वयात वाढत असल्याचे दिसते आहे. सध्याच्या परिस्थितीत पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव कुटुंब संस्थेसाठी घातक ठरत आहे.”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. गुरुवार, दि. २७ जून रोजी सरसंघचालकांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान, सोलापूर येथे शिवयोग समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.
सरसंघचालक पुढे म्हणाले की, सुशिक्षित कुटुंबांमध्ये मूल्यांचा अभाव असल्याने अशा प्रवृत्ती सर्रास सर्वत्र दिसतात. या संकटावर मात करायची असेल तर अशा परंपरेतून चालत आलेली श्रद्धा आणि संस्कार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. प्रत्येक कुटुंबात संवाद वाढवून कुटुंबाचे प्रबोधन करण्याची नितांत गरज आहे.
यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सी.ए. सुनील इंगळे यांनी सरसंघचालकांचे स्वागत केले. अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी देवस्थानच्या उपक्रमांची व ग्रामदैवत मेळ्याची माहिती दिली. गुरुराज हब्बू, राजेश हब्बू यांनी शिवयोग समाधीविषयी माहिती दिली. सरसंघचालकांचा हब्बू पुजारी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.