पदार्थातील अणूच्या आत सूक्ष्म प्रोट्रॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन गतिमान असतात. प्रोट्रॉन व न्यूट्रॉनभोवती इलेक्ट्रान अति वेगाने फिरत असतात, असे शास्त्र सांगते- निर्जीव वस्तूच्या आतील सूक्ष्म घटकांना गती कोण देते, हे मात्र शास्त्रज्ञ सांगू शकत नाहीत. ईशतत्त्व सर्वच कोंदाटले आहे, असे जुने ज्ञान स्वामी सांगतात, ते याचे उत्तर आहे. अशा प्रकारच्या अनेक उदाहरणांनी भगवद्तत्त्व सिद्ध करता येते. पण, त्यासाठी भक्ती, विश्वास, भाव पाहिजे, श्रद्धेसाठी गाठी पुण्य असावे लागते.
समर्थांनी मागील श्लोकांतून जे पुरातन ज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते थोडक्या शब्दांत सांगायचे तर ‘अविनाशी आत्मा हे माझे खरे स्वरूप आहे. मी आनंदमय आहे, मी चैतन्याचा अंश असलो तरी मी चैतन्यमय आहे. ते माझे खरे स्वरूप असल्याने कधीही न संपणार्या आनंदासाठी माझ्या ठिकाणी नित्यप्राप्त आहे.’ असे ज्ञान आत्मसात श्रेष्ठी आजपर्यंत सांगत आले आहेत. परंतु, ते ज्ञान आत्मसात करता न आल्याने अज्ञानी जीव आहे तिथेच राहिले. अज्ञानी जीवांना हा ज्ञानाचा साठा, समर्थांच्या शब्दात ’जुने ठेवणे’ सापडत नाही, मिळत नाही. असे व्हावे? यासाठी स्वामींनी काही कारणे सांगितली आहेत. समर्थांनी सांगितलेले पहिले कारण असे की अज्ञानी माणूस सर्वकाळ देहबुद्धीने वावरतो.
‘मी देहच’ अशा ठाम समजुतीने त्याचे सर्व व्यवहार चाललेले असतात. आपण देहासाठी करीत असलेले कर्म खोटे आहे, हे त्या देहाहंकारी माणसाला कळत नाही, अज्ञानी जीव देहाच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाही. समर्थ पुढे सांगतात की, अज्ञानी जीवाच्या ठिकाणी देहबुद्धीचा जो निश्चय झाला आहे, तो पक्का आहे. स्वामींनी देहबुद्धी निश्चयाची ‘भ्रम’ म्हणून संभावना केली आहे. एखादी वस्तू आहे तशी न दिसता, वेगळी भासणे आणि ती भासमान अवस्था खरी आहे, असे मानून तेच सत्य असे ठामपणे सांगत सुटणे, याला व्यवहारात ‘भ्रम’ असे म्हणतात. देहाला आत्म्यासारखा मानून देह हेच माझे खरे स्वरूप आहे, असे सांगणे हा भ्रमाचा एक प्रकार आहे, असे स्वामी म्हणाले. भ्रामक देहबुद्धीने खोट्या कल्पनांच्या मागे धावल्याने खरा आनंदाचा साठा जवळ असूनही तो अज्ञानी जीवरांना सापडत नाही.
पुरातन ज्ञानाचा अर्थात ’जुने ठेवणे’ न मिळण्यामागे समर्थांनी दोन कारणे सांगितली आहेत (1) अज्ञानी जीवांचा देहबुद्धीचा पक्का निश्चय आणि (2) देहबुद्धीच खरी मानल्याने आत्म्याचे गुण देहावर लादल्याने निर्माण झालेला भ्रम. आता अज्ञानी जीव तसेच का राहिले, याचे आणखी एक कारण स्वामी मांडत आहेत. ते म्हणजे, आत्मतत्त्व प्रत्येक वस्तूत पुरेपूर भरलेले असूनही कमनशिबी (अभागी) जीवाला ते दिसत नाही. व्यवहारातील प्रत्येक वस्तू तो केवळ बाह्यांगाने बघत असल्याने त्या वस्तूतील ब्रह्मतत्त्व न जाणल्याने प्रत्येक वस्तूला तो केवळ पाषाण म्हणजे क्षुल्लक समजतो. अशा माणसाला ज्ञानाची दृष्टी येणार कशी? ते शक्य नाही. अशा अज्ञानी जीवाला समर्थांनी ‘अभागी’ म्हटले आहे. वर्षानुवर्षे हा अज्ञानी जीव देहबुद्धी, अहंकार, मीपणा या भ्रमात वावरत असल्याने त्याच्या वाट्याला ज्ञानाचे भाग्य आले नाही, त्यामुळे तो अभागी ठरला. समर्थ पुढील श्लोकातून, हाच भाव प्रकट करीत आहेत-
पुढे पाहतां सर्व ही कोदलेंसे।
अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे।
अभावें कदां पुण्य गाठी पडेना।
जुने ठेवणें मीपणें आकळेना॥139॥
या खोट्या ’मी’चा, मीपणा, त्याचा अहंकार जीवाच्या ठिकाणी असल्याने त्याला पुरातन काळापासून उपलब्ध असलेले ज्ञान प्राप्त होत नाही. ते ज्ञान त्याला अनुभवता येत नाही. अज्ञानी जीवाला आत्मस्वरूप ज्ञान त्याला अनुभवता जाणवत नाही. आत्मज्ञान त्याला मिळत नाही. समर्थ या श्लोकात सांगतात की, वस्तुतः आत्मस्वरूप म्हणजे चैतन्य या विश्वातील प्रत्येक घटकात, चराचरात ठासून भरलेले आहे. त्याच्याशिवाय रिकामी जागा दाखवता येणार नाही. स्वामी हा विचार मांडताना ’कोंदलेसे’ असा शब्दप्रयोग करतात. ‘कोंदलेसे’ याचा अर्थ इतके खच्चून भरलेले की, आता त्यात आणखी काही भरता येणार नाही. हे चैतन्य अनुभवास येण्याची वेगळी दृष्टी असावी लागते. ज्याच्याजवळ अशी दृष्टी नाही, त्याला सर्व वस्तू दगड आहेत, पाषाण आहेत, असे वाटत असते. संतांनी अविनाशी, निर्गुण, निराकार देवाच्या मूर्तीत पाहायला आपल्याला शिकवले. संत तुकाराम महाराज विठोबाला सर्वस्व मानतात, ते म्हणतात-
वेद अनंत बोलिला। अर्थ इतका चि साधिला।
विठोबासी शरण जावे। निजनिष्ठा नाम गावें।
सकळ शास्त्रांचा विचार। अंती इतका चि निर्धार।
अठरा पुराणीं सिद्धान्त। तुका म्हणे हा चि होता॥
देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना देवाची मूर्ती कशाची घडवली आहे, हे न दिसता त्यातील परमेश्वरी भाव, ब्रह्मतत्त्व, चैतन्य याची अनुभूती आली तर ते खरे देवदर्शन होय. पण, अभागी माणसाला देवाच्या मूर्तीतील ईशतत्त्व न दिसता, त्या मूर्तीतील पाषाण दिसतो. देहबुद्धीच्या प्रभावाने चर्मचक्षूंना जे दिसते, तेच सत्य असा भ्रम त्याच्या ठिकाणी असतो. त्यामुळे देवप्रतिमेतील चैतन्याची जाणीव त्याला होत नाही. स्वामी त्यांना अभागी म्हणजे भाग्यहीन म्हणतात.
माणसाने भोळा भाव न ठेवता विज्ञाननिष्ठ असले पाहिजे, अशी भाषा सर्वत्र ऐकायला मिळते. विज्ञाननिष्ठा हे बुद्धीचे लक्षण मानले जाते. ज्ञान विश्वासाला, श्रद्धेला किंमत नसते, नीट विचार केला तर विज्ञान हे एक भौतिकशास्त्र आहे. भौतिकशास्त्राचे नियम अतींद्रिय ज्ञानाला लावता येत नाही. त्यामुळे आत्मज्ञानाचा किंवा अतींद्रिय ज्ञानाचा विचार, प्रश्न विज्ञाननिष्ठतेने सोडवता येणार नाही. भौतिक विज्ञानाची मर्यादा समजल्यावर आत्मतत्त्व चराचरांत कोंदाटले आहे, याचा प्रत्यय येतो. एक साधे वैज्ञानिक उदाहरण देऊन हा प्रश्न उकलता येतो. सजीव प्राण्याच्या ठिकाणी असलेली जिवंतपणाची जाणीव ही आंतरिक चैतन्यामुळे येते. तेथे हालचाल आहे. पण, निर्जीव वस्तूच्या अंतरंगात हालचाल संभवते का? डोळ्यांना तर ते दिसत नाही.
परंतु, विज्ञानाने, शास्त्रज्ञांनी ते सिद्ध केले आहे. पदार्थातील अणूच्या आत सूक्ष्म प्रोट्रॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन गतिमान असतात. प्रोट्रॉन व न्यूट्रॉनभोवती इलेक्ट्रान अति वेगाने फिरत असतात, असे शास्त्र सांगते- निर्जीव वस्तूच्या आतील सूक्ष्म घटकांना गती कोण देते, हे मात्र शास्त्रज्ञ सांगू शकत नाहीत. ईशतत्त्व सर्वच कोंदाटले आहे, असे जुने ज्ञान स्वामी सांगतात, ते याचे उत्तर आहे. अशा प्रकारच्या अनेक उदाहरणांनी भगवद्तत्त्व सिद्ध करता येते. पण, त्यासाठी भक्ती, विश्वास, भाव पाहिजे, श्रद्धेसाठी गाठी पुण्य असावे लागते. परमेश्वराविषयी अविश्वास असल्याने हे पुण्य पदरात पडत नाही आणि अशा अभाग्याला आपल्या जवळ असलेले पुरातन श्रेष्ठ ज्ञान प्रत्ययास येत नाही.
7738778322