काँग्रेसमध्ये खांदेपालट! पटोले आणि गायकवाडांची खुर्ची जाणार?

26 Jun 2024 19:07:29
 
Patole & Gaikwad
 
विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलीये पण काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह काही केल्या संपताना दिसत नाहीये. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडणं असो किंवा एकमेकांची उणीदुणी काढणं असो, काँग्रेस नेत्यांसाठी हे काही नवं नाही. पण आता तर त्यांनी एकमेकांविरोधात थेट म्यानातून तलवारीच बाहेर काढल्या आहेत. काँग्रेस नेत्यांकडून वारंवार पक्ष नेतृत्वावर शंका उपस्थित करणं, त्यांची अकार्यक्षमता दाखवून देणं आणि त्यांच्या कामाला कंटाळून थेट त्यांच्या हकालपट्टीची मागणी करणं सुरुच असतं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच त्यांच्या पक्षातील नेत्यांनी शंका उपस्थित केलीये. शिवाय आता वर्षा गायकवाडांचाही या यादीत समावेश झालाय. दरम्यान, आता मुंबई काँग्रेसमधील हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय. म्हणूनच वारंवार येत असलेल्या तक्रारींमुळे काँग्रेस आता महाराष्ट्रात आणि मुंबईत खांदेपालट करणार का? आणि यात नाना आणि ताईंची खुर्ची जाणार का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया.
 
नाना पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तर वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा. महाविकास आघाडी तयार झाल्यापासून नाना पटोले नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मग कधी ते 'महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ' असल्याचं सांगत वर्चस्व गाजवताना दिसतात, तर कधी 'आम्ही शोषित-पीडित लोकांना आमच्या पक्षात सामावून घेतलंय' असं म्हणून आपल्या मित्रपक्षांना डिवचताना दिसतात. शिवाय त्यांचे पक्षांतर्गत वादही काही कमी नाहीत. नाना पटोले विरुद्ध विजय वडेट्टीवार, नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि लोकसभेच्या जागावाटपावेळी पुढे आलेला नाना पटोले विरुद्ध वर्षा गायकवाड हे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्वपरिचित आहेत. याच वादातून म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे नाना पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय.
 
शिवाय लोकसभा निवडणूकीत नाना पटोले आपला मतदारसंघ असलेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघाव्यतिरिक्त राज्यात कुठेही प्रचार करताना दिसले नाहीत. एवढंच काय तर विदर्भातील महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांच्याही प्रचारात सहभागी होताना ते दिसले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ आहे, असं पटोले म्हणत असले तरी यात त्यांचं योगदान मात्र शून्य असल्याचं दिसून येतं. दुसरीकडे, प्रदेशाध्यक्षांसारख्या मोठ्या पदावर असताना नाना पटोले कायम उबाठा गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊतांसोबत भांडताना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये नानांच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकलेत.
 
काँग्रेसचं दुसरं नेतृत्व म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वर्षाताईंना मंत्रीपद देण्यात आलं होतं. पण, महाविकास आघाडीची सत्ता गेली त्यासोबतच त्यांचं मंत्रीपदसुद्धा गेलं. त्यानंतर वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यात आलं. तेव्हापासूनच पक्षातील काही नेते त्यांच्याविरोधात सक्रीय झालेत. त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून काँग्रेस नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी, संजय निरूपम यांनी पक्षाला रामराम ठोकला. आताही मुंबई काँग्रेसचे नेते भाई जगताप वर्षा गायकवाड यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाई जगताप आणि नसीम खान यांच्यासह मुंबई काँग्रेसमधील नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. एवढंच नाही तर वर्षा गायकवाडांना मुंबई उत्तर मध्य लोकसभेतून उमेदवारी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी स्टार प्रचारकपदाचा राजीनामाही दिला होता. त्यामुळे वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या खऱ्या पण त्यांचं मुंबईतील पक्ष संघटनेवर नियंत्रण नाही, हेच आतापर्यंत दिसून आलंय. आणि आता तर पक्षातील नेत्यांनी हे सिद्धही केलंय.
 
मुंबई काँग्रेसच्या १६ बड्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंना लिहिलेलं एक पत्र सोमवारी चांगलंच चर्चेत होतं. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आलीये. वर्षा गायकवाड आपल्याला विश्वासात घेत नाहीत, त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे, असं सांगत पक्षात काही संघटनात्मक बदल करण्याची मागणीही या पत्राद्वारे करण्यात आलीये. हे पत्र पाठवणाऱ्यांमध्ये चंद्रकांत हंडोरे, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप, नसीम खान, सुरेश शेट्टी, मधु चव्हाण, चरणसिंग सप्रा, झाकीर अहमद इत्यादींचा समावेश आहे.
 
दुसरीकडे, वर्षा गायकवाड आता खासदार बनल्यात. त्यामुळे दिल्लीत असताना त्यांना मुंबई काँग्रेसवर आपला होल्ड ठेवता येणार का? हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय नाना पटोले आणि वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर पक्षातील नेत्यांनीच टांगती तलवार ठेवलीये. हा प्रश्न आता थेट दिल्ली दरबारी गेल्याने वरिष्ठ नेते यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
 
 
 
Powered By Sangraha 9.0