चीन आणि फिलीपिन्स यांच्यातील द्विपक्षीय संबंधांमध्ये 1990 पासून लक्षणीय प्रगती झाली खरी. मात्र, आता दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. “आम्हाला युद्धजन्य स्थिती नको आहे, पण कोणत्याही जुलमी सत्तेपुढे आम्ही झुकणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चीनला नुकतेच फटकारले. ही वेळ येण्यामागचे कारण म्हणजे, अलीकडेच फिलीपिन्स नौदल आणि चिनी तटरक्षक दल यांच्यात दक्षिण चीन समुद्रात झालेली हिंसक चकमक.
2020 साली गलवान खोर्यात भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीप्रमाणेच, चीनने फिलीपिन्सच्या नौदलाला घेरले आणि कुर्हाडी आणि चाकूने हल्ला केला. वास्तविक 2021 सालच्या कायद्यानुसार, चीनने आपल्या तटरक्षक दलाला वेळ आल्यास परदेशी जहाजांवर धोकादायक हल्ले करण्याची परवानगी दिली आहे आणि यामुळेच येथील तणाव वाढला आहे.
‘द्वितीय थॉमस शोल’ नामक एका जागेजवळ चीन आणि फिलीपिन्स या दोन्ही देशांच्या नौसैनिकांंमध्ये चकमक झाली. हे ठिकाण पलवानपासून सुमारे 200 किमी अंतरावर आणि चीनच्या भूमीपासून साधारण एक हजार किमी अंतरावर आहे. चिनी नौदलाने फिलीपिन्सच्या अनेक नौैसैनिकांना यावेळी जखमी केले. शिवाय दोन बोटींचेही नुकसान केले. इतकेच नव्हे, तर या चकमकीत फिलीपिन्सच्या एका खलाशाला अंगठा गमवावा लागला होता. चिनी तटरक्षक दलाने फिलीपिन्सच्या बोटी आणि शस्त्रास्त्रांचे नुकसान तर केलेच, परंतु ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी बरीचशी उपकरणेही चोरून नेली. चीन आपल्या भूमीपासून हजारो किमी दूर असलेल्या सागरी क्षेत्रावरही अशाप्रकारे दहशत माजवत असल्याचे दिसते. यावरून अमेरिका आणि युरोपीय संघासह अनेक देशांनी चीनचा निषेध केला. चीनने मात्र या चकमकीसाठी उलट फिलीपिन्सलाच जबाबदार धरले.
अलीकडच्या काही महिन्यांत चीन आणि फिलीपिन्स जहाजांमधील वाढत्या संघर्षांच्या मालिकेतील ही घटना तितकीच गंभीर आहे. कारण, बीजिंगने रणनीतीदृष्ट्या स्थित जलमार्गावर आपले दावे वाढवले आहेत.त्यामुळे अमेरिका, युरोपियन युनियन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर पाश्चात्य आणि द. आशियाई राष्ट्रांच्या चिंतेत भर पडली आहे. बीजिंगने गेल्या आठवड्यात 2021च्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार चीनचा दावा आहे की, त्यांच्या तटरक्षक दलाला त्यांच्या हक्काच्या समुद्रात परदेशी जहाजांवर प्राणघातक हल्ले करण्याची परवानगी आहे.
एकूणच चीनबद्दल फिलीपिन्सचा सरासरी विश्वासाचा दृष्टिकोन नकारात्मकच. चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 साली गलवान खोर्यातील सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये असाच हिंसक संघर्ष झाला होता. या चकमकीत चिनी लष्कराने ‘कोल्ड वेपन्स’ श्रेणीतील शस्त्रास्त्रांचा वापर केला. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने भारतीय सैनिकांवर दगड, काठ्या, खिळे, लोखंडी रॉड इत्यादींनी क्रूर हल्ला चढवला होता. चीनकडे बुलेट, बॉम्ब आणि इतर आधुनिक शस्त्रास्त्रांचा तुटवडा आहे, असे मुळीच नाही. चीनचे संरक्षण बजेट हे अमेरिकेच्या संरक्षण बजेटच्या एक तृतीयांश आहे. असे असूनही चीन कधी काटेरी तार, चाकू तर कधी कुर्हाडी अशा शस्त्रांचा वापर का करतो? हे यानिमित्ताने जाणून घेणे महत्त्वाचे.
दक्षिण चीन समुद्रात जे काही घडते, ते थेट अमेरिकेशी संबंधित आहे. कारण, अमेरिकेचा फिलीपिन्सशी अनेक दशके जुना परस्पर संरक्षण करार आहे. 1951 साली अमेरिका आणि फिलीपिन्स दरम्यान झालेल्या करारात दोन्ही देशांवर तिसर्या देशाकडून हल्ला झाल्यास दोन्ही देश एकमेकांचे संरक्षण करतील, यावर भर देण्यात आला. म्हणजे, दक्षिण चीन समुद्रात कोठेही फिलीपिन्सच्या नौसेनेवर चीनकडून शस्त्रांनी हल्ला झाला, तर अमेरिका तो स्वतःवरचा हल्ला मानेल. जर येथे जीवंत दारूगोळा वापरला गेला असता, तर अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांना हस्तक्षेपासाठी पाचारण करण्यात आले असते. म्हणजेच, जिनपिंग यांच्या सुरक्षादलांनी जाणूनबुजून असा हल्ला केला, की ज्यामुळे फिलीपिन्सचे नुकसान होईल आणि अमेरिकन हल्ल्याचा संभाव्य धोकाही टळेल. यावरून ‘ड्रॅगन’चं शेपूट वाकडं ते वाकडंच, हे स्पष्ट होतं!