नालंदा विद्यापीठ! इतिहास आणि वैशिष्ट्ये

25 Jun 2024 19:04:04
 
Nalanda University
 
"नालंदा हे फक्त एक नाव नाही तर ती एक ओळख आहे, एक सन्मान आहे. नालंदा हे मूळ आहे, मंत्र आहे. पुस्तके आगीत जळली तरी ज्ञानाचा नाश होऊ शकत नाही, या वस्तुस्थितीची नालंदा ही घोषणा आहे. नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल," हे उद्गार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचं उद्‌घाटन केलंय. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलीये. तर नालंदा विद्यापीठाचा इतिहास आणि पंतप्रधान मोदींनी उद्धाटन केलेल्या नवीन विद्यापीठाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, हे जाणून घेऊया.
 
बुधवार दि. १९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं उद्धाटन केलंय. नालंदा विद्यापीठाची स्थापना पाचव्या शतकात झाली होती. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने या विद्यापीठाची स्थापना झाली होती. मात्र, इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने आक्रमण करून नालंदा नगरी पूर्णपणे उध्वस्त केली आणि नालंदा विद्यापीठही जाळून टाकले. एकेकाळी नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे शैक्षणिक केंद्र होते. नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिलं निवासी विद्यापीठ मानलं जातं. नालंदा विद्यापीठ परिसरात अनेक स्तूप, विहार आणि मंदिरे होती. या विद्यापीठात एकेकाळी १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत होते. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी १५०० हून अधिक शिक्षक होते. विद्यार्थ्यांची त्यांच्या गुणवत्तेवर निवड करण्यात येत होती. विशेष म्हणजे याठिकाणी विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि शिक्षण मोफत होते. या विद्यापीठात केवळ भारतातीलच नाही तर जपान, चीन, इंडोनेशिया, तुर्की यासह अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत होते. इथे प्रामुख्याने वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, बौद्ध तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र अशा विषयांचे शिक्षण येथे दिले जायचे.
 
प्राचीन आणि मध्ययुगीन मगध काळात नालंदा हे प्रसिद्ध बौद्ध मठ होते. हे जगातील बौद्ध धर्माचे सर्वात मोठे शिक्षण केंद्र होते. १८१२ मध्ये बिहारमधील स्थानिक लोकांना याठिकाणी काही बौद्धिक शिल्प सापडले. त्यानंतर अनेक परदेशी इतिहासकारांनी त्याचा अभ्यास केला आणि या विद्यापीठाबद्दल माहिती मिळाली. या विद्यापीठात सुमारे ३०० खोल्या, ७ मोठ्या खोल्या आणि अभ्यासासाठी ९ मजली ग्रंथालय होते. या ९ मजली ग्रंथालयात ९० लाखांहून अधिक पुस्तके ठेवण्यात आली होती. इतिहासकारांच्या मते, नालंदा विद्यापीठात इतकी पुस्तके होती की, बख्तियार खिलजीने जेव्हा विद्यापीठाला आग लावली तेव्हापासून जवळपास तीन महिने ती जळत राहिली. सुमारे १६०० वर्षांपूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ हे जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानलं जातं.
 
नालंदा विद्यापीठाच्या विनाशाच्या ८०० वर्षांनंतर आता एनडीए सरकारने याठिकाणी नवीन बांधकाम करून या विद्यापीठाची नवनिर्मिती केलीये. जवळपास १ हजार ७५० कोटी रुपये खर्चून हा नवीन कँपस बांधण्यात आलाय. नालंदा विद्यापीठाला ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, चीन, इंडोनेशिया आणि थायलंडसह इतर १७ देशांचा पाठिंबा आहे. २०१६ मध्ये नालंदाच्या अवशेषांना संयुक्त राष्ट्र वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यानंतर २०१७ मध्ये या विद्यापीठाचं बांधकाम सुरु करण्यात आलं.
 
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसची खासियत काय आहे ते जाणून घेण्याआधी नव्या विद्यापीठाची विशेष बाब म्हणजे प्राचिन विद्यापीठाचे अवशेष असलेल्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर हा नवा विद्यापीठ परिसर उभारण्यात आलाय. नव्या नालंदा विद्यापीठाच्या प्रांगणात दोन शैक्षणिक ब्लॉक असून यातील ४० वर्गखोल्यांची एकूण आसन क्षमता सुमारे १९०० इतकी आहे. यामध्ये प्रत्येकी ३०० आसन क्षमता असलेले दोन सभागृह आहेत. इथे सुमारे ५५० विद्यार्थी क्षमता असलेले वसतिगृह आहे. या प्रांगणात आंतरराष्ट्रीय केंद्र, सुमारे २००० लोकांना सामावून घेणारे ॲम्फी थिएटर, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधा उपलब्ध आहेत.
 
मुख्य म्हणजे, नालंदा विद्यापीठाचे हे प्रांगण ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ करणारे हरित प्रांगण आहे. हे प्रांगण सौर ऊर्जा संयंत्र, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे संयंत्र, १०० एकर जलसाठा आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह स्वयंपूर्ण आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0