काँग्रेस मोठा भाऊ! मविआचं जागावाटप ठरलं?

25 Jun 2024 19:10:37
 
MVA
 
लोकसभा निवडणूक संपली. आता लवकरच विधानसभा निवडणूकांचं बिगुल वाजेल. मात्र, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकीमध्ये जागावाटपाला विलंब होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीने आतापासूनच तयारी सुरु केलीये. महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपाचं प्राथमिक सुत्र ठरलं असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे जागावाटपाचं सुत्र नेमकं काय आहे? लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार? आणि या जागावाटपात सर्वांचं समाधान होणार की, आघाडीत बिघाडी होणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. 
 
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या तर महायूतीला १७ जागा मिळाल्या. त्यामुळे लोकसभेतील विजयाने हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभेचीही तयारी सुरु केल्याचं समजतंय. लोकसभेत महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि विशेषत: मुंबईतील जागांबाबत वाद निर्माण झाला होता. हा वाद निवडणूक होईपर्यंत कायम राहिला. शिवाय सांगलीत उबाठा गटाच्या मनमानीमुळे काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढले आणि विजयीही झाले. या विजयानंतर मात्र, अपक्ष लढलेले विशाल पाटील आता महाविकास आघाडीतच असल्याचा दावाही करण्यात आला. असो...
 
हा झाला लोकसभेचा वाद. मात्र, आता नुकतीच महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आम्ही विधानसभेतही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढणार असल्याचं मविआतील नेत्यांनी जाहीर केलं. दरम्यान, यावेळी महाविकास आघाडीने विधानसभेतील जागावाटपाची चाचपणी केल्याची चर्चा आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या जागावाटपात उबाठा गटाने सर्वाधिक म्हणजे २१ जागा लढवल्या. तर काँग्रेसने १७ आणि शरद पवार गटाने १० जागा लढवल्या होत्या. त्यानंतर आता विधानसभेत हा जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असणार? याबद्दल सर्वांना उत्सुकता लागलीये.
 
माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तीन प्रमुख पक्षांनी समसमान जागा घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जातंय. जागावाटपात मतभेद होऊ नये यासाठी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाने प्रत्येकी ९६ जागांवर लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती पुढे आलीये. परंतू, प्रत्येकाला ९६ जागा मिळाल्यास काँग्रेसचं काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचं मानलं जातं. शिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वारंवार आपल्या वक्तव्यातून आपणच मोठा भाऊ असल्याचं जाहीरही केलंय. त्यामुळे तिन्ही पक्षांना समसमान जागा मिळाल्यास काँग्रेसला न्याय मिळणार का? हा मोठा प्रश्न आहे.
 
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेने सर्वाधिक म्हणजेच ५६ जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ आणि काँग्रेस पक्षाने ४४ जागा जिंकल्या होत्या. मात्र, २०१९ च्या निवडणूकीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची यूती होती. पण आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलीये. सद्यस्थितीत यातला एक गट महाविकास आघाडीसोबत तर दुसरा गट महायूतीसोबत आहे. त्यामुळे यावेळीच्या निवडणूकीत विजयी जागांचंही विभाजन होणार हे स्पष्ट आहे. शिवाय यावर्षीच्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजेच १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला. तर उबाठा गटाने २१ पैकी ९ आणि शरद पवार गटाने १० पैकी ८ जागा जिंकल्या. त्यामुळे विधानसभेत काँग्रेस नक्कीच जास्त जागा मागण्याची शक्यता वर्तवली जातीये. पण, महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार, विधानसभेत जर प्रत्येक पक्षाला ९६ जागा मिळाल्या तर काँग्रेसला याचा किती फायदा होणार? असा प्रश्न आहे.
 
दुसरीकडे, माध्यमांमधून पुढे आलेल्या अन्य एका माहितीनुसार, या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. काँग्रेस पक्ष १०० ते १०५ जागांवर लढू शकतो तर उबाठा ९० ते ९५ आणि शरद पवार गट ८० ते ८५ जागांवर लढण्याची शक्यता वर्तवली जातीये. परंतू, लोकसभेत तब्बल १० पैकी ८ जागा जिंकल्याने शरद पवार गटाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलाय. त्यामुळे विधानसभेत ते जास्त जागा मागू शकतात. याशिवाय लोकसभेत सांगलीच्या जागेवर अडून बसलेला उबाठा गटही काँग्रेसपेक्षा कमी जागा लढण्यास तयार होणार नाही. असं झाल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडीत जागावाटपावरून वितुष्ट निर्माण होणार का? आणि यातून तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतील का?
 
 
 
Powered By Sangraha 9.0