"आम्ही शोषित, पीडित लोकांना आमच्या पक्षात सामावून घेतलंय," हे वक्तव्य आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं. मोठा भाऊ आणि लहान भाऊ या वादानंतर आता नाना पटोलेंनी पुन्हा एकदा उबाठा आणि शरद पवार गटाला डिवचलंय. लोकसभा निवडणूकीत राज्यात सर्वात जास्त जागा मिळाल्यानंतर नाना पटोलेंनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना डिवचणं सुरु केलंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. तर लोकसभेच्या निकालानंतर नाना पटोले आणि काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु केलीये का? शोषित आणि पीडित असे शब्द वापरून ते उबाठा आणि शरद पवार गटाला कमीपणा दाखवू इच्छितात का? आणि नाना पटोलेंच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे १३ जागांवर विजय मिळाला. मात्र, निकाल जाहीर होताच काँग्रेसने आता महाविकास आघाडीमध्ये दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचं दिसतंय. नाना पटोले नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर हुरळून गेलेल्या नाना पटोलेंनी मित्रपक्षांना डिवचण्याची मालिका सुरू केलीये. नाना पटोले सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अशाच एका दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "उबाठा आणि शरद पवारांचा पक्ष भाजपने फोडलाय. तरीही आम्ही अशा शोषित पीडित लोकांना सामावून घेतलं आहे. हे आमचं काम आहे. अजूनही आमची हीच भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही निवडणूका लढवू," असं म्हणत त्यांनी उबाठा आणि शरद पवार गटाला डिवचलंय.
लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासून पटोलेंनी आतापर्यंत मित्रपक्षांना टोचणारी अनेक वक्तव्य केलीत. सर्वात आधी त्यांनी विधानसभेला १५० जागा जिंकण्याची घोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करत, लहान भावांनी लहान भावांसारखं वागावं, असा खोचक टोला लगावला. आणि आता उबाठा आणि शरद पवार गटाला थेट शोषित पीडित अशी उपमा देत पटोलेंनी मित्रपक्षांना कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यावर नाना पटोले लहान आहेत, असं म्हणत संजय राऊतांनीही त्यांना जोरदार चिमटा काढला. त्यामुळे महाविकास आघाडीतील ही वर्चस्वाची लढाई पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आलीये.
दुसरीकडे, एका कार्यकर्त्याने चक्क नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय धुतल्याचा व्हिडीओही माध्यमांवर व्हायरल झालाय. नाना पटोलेंनी सोमवारी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी ज्याठिकाणी पालखी थांबली होती त्या चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानाच्या प्रांगणात पावसामुळे प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे नाना पटोलेंनी चिखलातूनच मार्ग काढत पालखीचे दर्शन घेतलं. त्यानंतर तिथून ते आपल्या गाडीजवळ परत आले. यावेळी एका कार्यकर्त्याने नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय धुतले. यावरुन नाना पटोलेंवर जोरदार टीका करण्यात येतीये. या कृतीमुळे नाना पटोले काय सिद्ध करु पाहताहेत, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येतोय.
गेल्या काही वर्षात काँग्रेसची देशभरात वाताहत झालीये. हिंदुवुरोधी भूमिका, जातपात आणि भावनिक राजकारण यामुळे काँग्रेस सध्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. शिवाय मागच्या काही दिवसांत राज्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. यासाठीही राज्याचं नेतृत्व म्हणजेच नाना पटोलेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे पटोलेंच्या नेतृत्वावर कायमच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान, आता लोकसभेच्या विजयाने अतिउत्साहीत झालेले नाना पटोले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना डावलू पाहाताहेत का? आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ते महाविकास आघाडीमध्ये वर्चस्व प्रस्थापित करु इच्छितात का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताहेत. पटोलेंच्या अशा वक्तव्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का? आणि लोकसभेच्या विजयाने हुरळून गेलेली काँग्रेस विधानसभेत मित्रपक्षांशी मनमानी करणार का?